येलदरी, मासोळी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात

पाणीसाठ्यात घट
पाणीसाठ्यात घट

परभणी : वाढते तापमान, बाष्पीभवन, उपसा आदी कारणांनी उपयुक्त पाणीसाठा संपत चालल्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघू सिंचन प्रकल्प तळ गाठत आहेत. पूर्णा नदीवरील येलदरी धरण तसेच गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा संपला असून केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे.

लघू तलावांमध्ये केवळ ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. वाढत्या तापमानासोबत जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावरील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत चालले आहे. चार तालुक्यांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी १० टॅंकर सुरू आहेत. ५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी येलदरी धरणातून त्याखालील सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आल्याने येलदरीमध्ये आता मृत पाणीसाठा उरला आहे. सिध्देश्वर धरणामध्ये २७.०५, निम्न दुधना धरणांमध्ये ४२.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. दोन मध्यम प्रकल्पांपैकी मासोळी (ता. गंगाखेड) धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपला असून करपरा (ता. जिंतूर) मध्यम प्रकल्पात २३ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे.

२२ लघू तलावांपैकी टाकळवाडी, जोगवाडा, बेलखेडा, चिंचोली, आडगांव, दहेगांव हे सहा तलाव कोरडे पडले आहेत. नखातवाडी, तांदुळवाडी, कोद्री, देवगांव, वडाळी, केहाळ, भोसी या सात तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. केवळ नऊ तलावांमध्ये ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. यामध्ये पेडगांव तलावात ११, आंबेगावमध्ये ९, झरीमध्ये ७७, राणीसावरगांवमध्ये २, पिंपळदरीमध्ये १०, चारठाणामध्ये ५, कवडामध्ये १०, मांडवीमध्ये ६, पाडाळीमध्ये ३६ टक्के पाणीसाठा आहे.

पाणीटंचाईची समस्या गंभीर झालेल्या चार तालुक्यांतील ९ गावांना १० टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये पालम तालुक्यात ६, पूर्णा तालुक्यात २, जिंतूर, गंगाखेड तालुक्यात प्रत्येकी १ टॅंकरचा समावेश आहे.

पाणीटंचाईवरील उपाय योजना अंतर्गंत पूर्णा, पालम, गंगाखेड, पाथरी, सेलू, जिंतूर या सहा तालुक्यांतील ५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १२३ विंधन  विहिरींच्या विशेष दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. ३८ नळ योजनांची विशेष दुरुस्ती कामे, ५ तात्पुरत्या पूरक नळ योजना, १५ नवीन विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com