राज्यात पाणीटंचाईचा आलेख वाढताच

टॅंकर
टॅंकर

पुणे: उन्हाचा चटक्याबरोबरच राज्यात पाणीटंचाईचा आलेखही वाढताच आहे. टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी धावणाऱ्या टॅंकरमध्ये दररोज भर पडत आहे. राज्यातील ४ हजार ६१५ गावे, ९ हजार ९५९ वाड्यांमधील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ५ हजार ८५९ टॅंकर धावत असल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. राज्यात तब्बल २८ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले आहे.  उत्तर महाराष्ट्रात, मराठवाडा, पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये टंचाईचा विळखा वाढला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून, तेथे ७३४ गावे, २७१ वाड्यांसाठी १ हजार ११० टॅंकर सुरू आहेत, तर बीड जिल्ह्यातील ६३१ गावे, ३२९ वाड्यांमध्ये ८९६ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील ५२६ गावे २ हजार ९९७ वाड्यांना ७७६ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे.  गतवर्षी २१ मे रोजी राज्यातील २७ जिल्ह्यांमधील टंचाईग्रस्त असलेल्या १ हजार ४०५ गावे १ हजार ४७ वाड्यांमध्ये १ हजार ४७० टॅंकरने पाणी द्यावे  लागले होते. यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद,  जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, उत्तर महाराष्ट्रातील नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, सांगली आणि सोलापूर, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्यातही टॅंकर सुरू करावा लागला आहे. 

सहा जिल्ह्यात एकही टॅंकर नाही राज्यातील तीव्र टंचाई असताना पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापाही टॅंकर सुरू करावा लागला नसल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने स्पष्ट केले आहे. उन्हाच्या चटक्यामुळे या भागातही पाणीसाठा कमी होत असून, पावसाला उशीर झाल्यास काही ठिकाणी टंचाई भासण्याची चिन्हे आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com