सुकी नदीतील विहिरींत पाण्याचा पाझर

रावेर, जि. जळगाव : सुमारे सव्वा महिन्यापासून तालुक्यातील सर्वाधिक महत्त्वाची सुकी नदी खळाळून वाहत आहे. यामुळे सुकी पाणी वाटप सहकारी संस्थेने नदीपात्रात खोदलेल्या असंख्य विहिरीतून पाणी भूगर्भात झिरपत आहे.
Water seepage into wells in dry rivers
Water seepage into wells in dry rivers

रावेर, जि. जळगाव :  सुमारे सव्वा महिन्यापासून तालुक्यातील सर्वाधिक महत्त्वाची सुकी नदी खळाळून वाहत आहे. यामुळे सुकी पाणी वाटप सहकारी संस्थेने नदीपात्रात खोदलेल्या असंख्य विहिरीतून पाणी भूगर्भात झिरपत आहे. दोन्ही काठावरील सुमारे वीस गावांमधील साडेतीन हजार विहिरी आणि कुपनलिकांच्या भूगर्भातील पाणी पातळी किमान २५ फुटांनी उंचावली आहे. 

रावेर तालुक्याच्या मध्यातून सुमारे ३२ किलोमीटर वाहणारी सुकी ही मध्य प्रदेशातील शिवगुफा येथून उगम पावणारी सातपुड्यातील महत्त्वाची नदी आहे. यावर माजी विधानसभा अध्यक्ष ( कै ) मधुकरराव चौधरी यांनी दूरदृष्टीने गारबर्डी गावाजवळ प्रकल्प बांधला. यंदा  २३ जुलैला हा प्रकल्प पूर्ण भरला. तेव्हापासून नदीपात्रातून स्वच्छ पाणी खळाळून वाहत आहे.

या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन २००१ मध्ये सुकी पाणी वापर सहकारी संस्थेची स्थापना केली. उन्हाळ्यात आवश्यकतेनुसार प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. हे पाणी नदीपात्रात जिरून परिसरातील भूगर्भातील पाणी पातळी उंचावते, असा अनुभव आहे.

शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे निवृत्त उपविभागीय अभियंता के. पी. पाटील म्हणाले, ‘‘सातपुड्याच्या पायथ्यापासून पुढे नदीपात्रात १०-१५ किलोमीटरपर्यंत सुमारे १०० फूट खोल मुरूम, दगड, गोटे, रेती यांचा थर नैसर्गिकरित्या आहे. यास बझाडा झोन म्हटले जाते. यामुळे नदीपात्रात जितके पाणी वाहते त्याच्या आधिकाधिक पाणी भूगर्भात जिरते. अशा प्रकारची भौगोलिक रचना महाराष्ट्रात फक्त सातपुड्याच्या याच पट्ट्यात आहे. सुकी नदी या परिसरात उंचावरून वाहते. त्यामुळे परिसरातील शेतांचे गढूळ पाणी नदीपात्रात येत नाही. म्हणून नेहमी स्वच्छ पाणी खळाळून वाहते व आधिकाधिक पाणी जमिनीत जिरते.’’

अनेक गावांना लाभ

ही नदी पावसाळ्यात महिनाभर वाहिली तर दोन्ही काठावरील १० किलोमीटर पट्ट्यातील १५-२० गावांना त्याचा फायदा होतो. त्यात चिनावल, वाघोदा, कुंभारखेडा, लोहारा, वडगाव, निंभोरा, उटखेडा, दसनूर, खिरोदा प्र यावल, कोचूर, कळमोदा, गहुखेडा, रोझोदा, बलवाडी, आंदलवाडी, तांदलवाडी या नदी किनाऱ्यावरील गावांशिवाय मस्कावद, सुनोदा, गाते, खिर्डी, विवरा गावांतील भूगर्भातील पाणी पातळी वाढते. सुकी नदी पाणी वापर समितीने आतापर्यंत नदीपात्रात असंख्य विहिरी खोदल्या आहेत. यामुळे पाणी जिरण्याचे प्रमाण वाढते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com