मराठवाड्यात पाणीटंचाई कायम, टँकर सुरू

मराठवाड्यात पाणीटंचाई कायम, टँकर सुरू
मराठवाड्यात पाणीटंचाई कायम, टँकर सुरू

बीड, उस्मानाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील ८८७ गावे, वाड्यांना अजूनही पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. ही पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाने १०४० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. 

मराठवाड्यातील तेरा जिल्ह्यांत अपेक्षेच्या ५० टक्‍केही पाऊस बरसला नाही. शिवाय ७६ पैकी ७२ तालुक्‍ंयात पावसाने अपेक्षापूर्ती केली नाही. त्यामुळे नदी, नाल्यांना, पर्यायाने प्रकल्पांमध्ये व विहिरींना पाणीच आले नाही. त्यामुळे मराठवाड्यात अर्धा पावसाळा लोटूनही पाणीसंकट कायम आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १० गावे, वाड्यांमधील १६ हजार लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी ७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

जालना जिल्ह्यातील ८८ गावे, १८ वाड्यांमधील १ लाख ९० हजार ४६७ लोकांना भीषण जलसंकटाला समोरे जावे लागत असून, त्यांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाला ९८ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४६८ गाव व १०९ वाड्यांमधील ११ लाख ८३ हजार ५६४ लोकांची तहान अजूनही टॅंकरशिवाय भागत नाही. त्यासाठी तब्बल ६९३ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील ५६ गाव व ७ वाड्यांमधील १ लाख ५५ हजार ६१३ लोकांची तहान भागविण्यासाठी ६४ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील १२४ गाव व ७ वाड्यांमधील ४ लाख १४६ लोकांची तहान भागविण्यासाठी १७८ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गत आठवाड्याच्या तुलनेत पाणीटंचाईग्रस्तांची संख्या व टॅंकरच्या संख्येत घट दिसत असली, तरी भरपावसाळ्यात टॅंकर सुरू राहण्याची वेळ सातत्याने येत असल्याने मराठवाड्याच्या चिंतेत भर पडली आहे. 

२५९४ विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यातील पाणीटंचाईचा   सामना करणाऱ्या जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या चार जिल्ह्यांतील २५९४ विहिरींचे टॅंकर व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील ७५, बीडमधील ६५८, लातूरमधील ८७५, तर उस्मानाबादमधील ९८६ अधिग्रहित विहिरींचा समावेश आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com