सोलापूर, सांगली, पुणे जिल्ह्यांतील पाणीटंचाई हटेना

सोलापूर, सांगली, पुणे जिल्ह्यांतील पाणीटंचाई हटेना
सोलापूर, सांगली, पुणे जिल्ह्यांतील पाणीटंचाई हटेना

पुणे : पावसाळा संपत आला तरी सोलापूर, सांगली, पुणे जिल्ह्यांत पाणीटंचाई भेडसावत आहे. ऐन पावसाळ्यात टॅंकर कायम असल्याने परतीच्या पावसानेही टंचाई हटण्याने चिन्हे दिसत नाहीत. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई भासत आहे. विभागातील तीन जिल्ह्यांच्या २० तालुक्यांमधील ३९० गावे २ हजार २६८ वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल ४३७ टॅंकर सुरू आहेत. 

उन्हाळ्यात टंचाईची तीव्रता वाढल्यानंतर मॉन्सूनच्या पावसाने टंचाई हळहळू कमी होऊ लागली आहे. मात्र, दुष्काळी तालुक्यात पावसाच्या दडीने पिण्याच्या स्रोतांना पाझर न फुटल्याने पाणीटंचाई कायम आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११ तालुक्यांत पाणीटंचाई वाढली आहे. जिल्ह्यातील २९१ गावे, १ हजार ५४३ वाड्यांमध्ये ३३१ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २३ गावे १८३ वाड्यांना २६ टॅंकरने आणि सांगलीतील ७५ गावे ५४२ वाड्यांना ८० टॅंकरने पाणी पुरविण्यात येत आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २७) विभागातील टंचाईग्रस्त भागातील सुमारे ९ लाख लोकसंख्या आणि ३ लाख ७५ हजार पशुधनाची तहान टॅंकरच्या पाण्याने भागात आहे. सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ६ लाख ६५ हजारांहून अधिक लोकसंख्या व ३ लाख ५३ हजारहून अधिक जनावरे, सांगलीतील सुमारे १ लाख ७५ हजार लोकसंख्या, २२ हजार जनावरांना, तर पुणे जिल्ह्यातील ५२ हजार जनतेला पाणी पुरविण्यात येत आहे. यासाठी २१७ विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या, तर कोल्हापूर व साताऱ्यात टंचाई भासत नसल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.  

टंचाईग्रस्त भागात टॅंकरची तालुकानिहाय संख्या : पुणे - इंदापूर १०, बारामती ७, दौंड ८, आंबेगाव १. सांगली - जत ५८, आटपाडी १५, कवठेमहांकाळ ३, तासगाव २, खानापूर २,  सोलापूर - मंगळवेढा ४९, करमाळा ४९, सांगोला ४८, माढा ४२, दक्षिण सोलापूर २८, बार्शी २६, मोहोळ २५, उत्तर सोलापूर २३, माळशिरस १७, अक्कलकोट १४, पंढरपूर १०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com