साताऱ्यातील धरणांमध्ये ९९ टक्‍क्‍यांवर पाणीसाठा

साताऱ्यातील धरणांमध्ये ९९ टक्‍क्‍यांवर पाणीसाठा
साताऱ्यातील धरणांमध्ये ९९ टक्‍क्‍यांवर पाणीसाठा

सातारा : जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने धरणे तुडंब भरून वाहिली आहे. सध्या तारळी धरणाचा अपवाद वगळता इतर धरणांत ९९ टक्केवर पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम- बलकवडी ही प्रमुख धरणे आहेत. मॉन्सून लांबल्याने जिल्ह्यातील धरणे भरणार की नाही अशी चिंता निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीस जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. प्रामुख्याने जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्राचा पावसाचा जोर अधिक होता. कमी कालवधीत जास्त पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. 

पावसाला विलंब झाल्याने धरणे भरण्यास प्राधान्य दिले. यामुळे पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन करताना धरण व्यवस्थापनास तारेवरची कसरत करावी लागली. कोयना धरण हे वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या धरणाचे ऑगस्ट महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात दरवाजे १६ फूट वर उचलून एक लाख २२ हजार ४७५ क्युसके पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यामुळे कोयना नदीस महापूर आल्याने कराड, पाटण तालुक्यांत अनेक गावांतील शेती पाण्याखाली गेल्या कोट्यवधींच्या नुकसानीला समोरे जावे लागले आहे. 

यानंतर पावसाचा जोर कमी-जास्त होईल त्यानुसार पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीसही पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे दहा फुटांवर उचलण्यात आले होते. कोयना धरणातून १०७ व इतर प्रमुख दहा टीएमसीवर पाणी विनावापर सोडावे लागले आहे. उरमोडी धरणातील पाणी माण, खटाव तालुक्यात सोडल्याने येथील टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. सध्या तारळी धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व प्रमुख धरणांत ९९ टक्के पाणी उपलब्ध आहे. यामध्ये कोयना धरणात ९९.८९, धोम धरणात १००, कण्हेर ९९.९८, धोम-बलकवडी १००, उरमोडी ९९.९९ व तारळी ९४.९४ टक्के एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे.

प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये   कोयना-१०४.९४, धोम-१३.५०, कण्हेर-१०.१०, धोम-बलकवडी ४.०८, उरमोडी-९.९०, तारळी-५.५५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com