बागायती कोल्हापूरचा दुष्काळग्रस्तांना आधार 

दुष्काळग्रस्त भागात पाणीगाड्यांचे वाटप
दुष्काळग्रस्त भागात पाणीगाड्यांचे वाटप

कोल्हापूर : पाणीटंचाईमुळे दूरवरून पाणी आणण्यासाठी दुष्काळग्रस्त भागातील महिलांना कष्ट सहन करावे लागतात. त्यांचे कष्ट कमी करण्यासाठी येथील उडान फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. कल्पक पद्धतीने बनविलेल्या पाणी वाहून नेणाऱ्या सुमारे तीन हजार पाणी गाड्यांचे (गाडा स्वरुपातील पाण्याचे कॅन) वाटप राज्यातील दुष्काळग्रस्त भागात करण्यात आले आहे. 

अनेक युवकांनी एकत्र येत स्थापन केलेली उडान ही संस्था शहरातील बेवारस मनोरुग्ण यांचे पुनर्वसन करण्याचे काम करते. हे काम करीत असतानाच पुण्यातील एका व्यक्तीचे नातेवाईक हरविल्याची माहिती त्यांना मिळाली. या नातेवाइकाला काही तासांमध्ये शोधून दिल्याने त्या व्यक्तीने संस्थेला मदत देण्याची तयारी दाखविली. परंतु वेळ आल्यानंतर व सामाजिक कामासाठीच तुमची मदत वापरू असे सांगत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला सांगितले.

संस्थेने दुष्काळग्रस्तांसाठी काही तरी करावयाचे ठरविले. यातूनच पाणीगाड्याची कल्पना सुचली. महिलांना डोक्‍यावरून पाणी आणताना बरेच कष्ट करावे लागतात. हे गाडे त्यांना वाटप केल्यास त्यांचे कष्ट कमी होतील असा विचार आल्यानंतर याबाबतची कार्यवाही सुरू झाली. पुणे स्थित कंपनीशी संपर्क साधून त्या दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने सुमारे तीन हजार पाणीगाडे खरेदी करण्यात आले. यासाठी तब्बल पंचवीस लाख रुपयांचा निधी जमविण्यात आला. 

पाणीगाडे कोल्हापुरात न आणता परस्पर नांदेड, बीड, धुळे, यवतमाळ, बुलढाणा नाशिक आदी जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींना देण्यात आले. सोशल मीडियावरून याबाबतचे आवाहन केल्यानंतर ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे मागणी नोंदविली. यानुसार हे गाडे मोफत वितरीत करण्यात आले.  प्रत्येक गरजूसाठीच हे गाडे दिले जावेत, यासाठी पारदर्शी यंत्रणा वापरल्याचे संस्थेचे अध्यक्ष भूषण लाड यांनी सांगितले.

या कामासाठी चेतन घाटगे, रोहन माने, मोनू सूर्यवंशी, रेखा उगवे, प्रसाद पोवार, राहुल राजशेखर, निखिल पोतदार, सोनाली राजपूत, पूजा कांबळे, स्मिता गिरी, सुजाता जाधव आदीसह संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतल्याचे श्री. लाड यांनी सांगितले. 

असा आहे पाणी गाडा  ४५ लिटर क्षमतेचा हा ड्रम आहे. यामध्ये पाणी भरल्यानंतर त्याला लोखंडी आकडा लावला जातो. या आकड्याच्या सहाय्याने हा ड्रम ओढत घरी नेला जाऊ शकतो. टिकाऊ व दणकट असल्याने जमिनीवरून ओढत नेले तरी या ड्रमला कोणताच धोका पोचत नाही. सहजपणे तो ओढला जाइल अशी रचना केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com