परभणीतील प्रकल्पांमधील पाणीसाठा आरक्षित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी (प्रतिनिधी)ः जिल्ह्यात यंदा झालेल्या पावसाच्या तुटीमुळे प्रकल्पांच्या अनेक जलशयांमध्ये गत वर्षीच्या तुलनेत कमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे येत्या जुलैपर्यंत अनेक भागात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजनांअंतर्गत मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांतील तसेच गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांमधील ५६.४२ दलघमी पाणीसाठा जिल्हा प्रशासनातर्फे आरक्षित करण्यात आला आहे.

सद्यःस्थितीत २२ लघू तलावांपैकी ६ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. इतर तलावातील पाणीसाठा वाढता उपसा तसेच बाष्पीभवनामुळे घटत चालला आहे. त्यामुळे यंदा अनेक भागातील नागरिकांना लवकरच पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दरम्यान संभाव्य टंचाईग्रस्त पाहता आरक्षित पाणीसाठा जुलैपर्यंत उपलब्ध राहील यांची काळजी घ्यावी, असे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. मानवत तालुक्यातील १९ गावे, गंगाखेड तालुक्यातील ४ आणि परभणी तालुक्यातील १० गावांतील पाणीपुरवठा योजनांसाठी जायकवाडी धरणातील ०.२८९ दलघमी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. निम्न दुधना प्रकल्पातील ३३.४४६ दलघमी पाणीसाठा मानवत, सेलू, पाथरी तालुक्यातील ५७ गावे तसेच नगर परिषदा अंतर्गतच्या पाणीपुरवठा योजनांसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे.

येलदरी धरणातील ७.४८९ दलघमी पाणीसाठा जिंतूर नगरपालिका तसेच परभणी महापालिका आणि जिंतूर तालुक्यातील ३८ गावांसाठीच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी आरक्षित केला आहे. सिध्देश्वर धरणातील ०.४४१ दलघमी पाणीसाठा वस्सा १२ गावे पाणीपुरवठा योजना तसेच पूर्णा तालुक्यातील १२ गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी राखीव केला आहे. करपरा मध्यम प्रकल्पांतील २.७९६ दलघमी पाणीसाठा कुपटा १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी तर मासोळी मध्यम प्रकल्पांतील ३.४१५ दलमघी पाणीसाठा गंगाखेड तालुक्यातील ३ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी तसेच नगर परिषदेसाठी राखीव आहे.

गोदावरी नदीवरील ढालेगाव येथील उच्च पातळी बंधाऱ्यातील १.५८३ दलघमी पाणीसाठा पाथरी तालुक्यातील १४ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी व नगर परिषदेसाठी आरक्षित आहे.

मुद्दगल बंधाऱ्यातील २.००६ दलघमी पाणीसाठा सोनपेठ, पाथरी तालुक्यातील १० गावे तसेच सोनपेठ नगर परिषदेसाठी, मुळी बंधाऱ्यातील १.०६४ दलघमी पाणीसाठा गंगाखेड तालुक्यातील ७ गावांसाठी राखीव आहे. डिग्रस बंधाऱ्यातील ३.७१८ दलघमी पाणीसाठा पालम, पूर्णा, तालुक्यातील २० गावे तसेच पालम नगर पंचायतीसाठी राखीव आहे. पेडगाव लघू तलावातील ०.००९५ दलघमी पाणीसाठा पेडगाव, जांब, पान्हेरा, मोहपुरी, मांडाखळी, पाळोदी, सावळी, सावरगाव खुर्द या गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी, झरी तलावातील ०.००८५ दलघमी पाणीसाठा पाथरी तालुक्यातील ७ गावांसाठी तर पिंपळदरी तलावातील ०.००२३ दलघमी पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com