जत तालुक्यात डाळिंब, द्राक्ष बागांना टॅंकरद्वारे पाणी

वर्षभर टँकरने बागांना पाणी देतोय. पाणी उपलब्ध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. जवळपास कुठेच पाणी नाही. त्यामुळे शासनाने म्हैसाळ योजना किंवा कर्नाटकमधील तुबची बबलेश्ववर योजनेतून पाणी द्यावे - विठ्ठल चव्हाण, द्राक्ष उत्पादन शेतकरी, उमदी, ता. जत.
द्राक्ष, डाळिंब बागांना टॅंकरव्दारे पाणीपुरवठा
द्राक्ष, डाळिंब बागांना टॅंकरव्दारे पाणीपुरवठा

सांगली  : जत तालुक्याच्या पूर्व भागात यंदाच्या हंगामात डाळिंब व द्राक्ष बागांना सुरवातीपासूनच टँकरने पाणी द्यावे लागत आहे. पूर्वी २० हजार लिटर पाण्याचा टँकर अडीच हजार रुपयांना मिळायचा, तोच टॅँकरचा दर सध्या साडेचार हजार रुपये झाला आहे. दर वाढला असला, तरी बागांना टॅँकरच्या पाण्यामुळे आधार मिळाला आहे. द्राक्ष उत्पादकांना वर्षभर एकरी एक ते दोन लाख रुपये उत्पादन खर्च येतो. या खर्चात टॅँकरमुळे दुपटीने वाढ झाली आहे. 

अद्यापही पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एकरी खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. द्राक्ष, डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत. उत्पादन काहीच मिळणार नसल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. जत तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र ४ हजार ८७० हेक्टर, डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५९ हेक्टर आहे.तालुक्यात गेल्या वर्षी पाऊस झाला नसल्याने द्राक्ष, डाळिंब बागा अडचणीत आल्या आहेत. या वर्षी पाणी कमी असल्याने पावसाच्या भरवशावर द्राक्ष व डाळिंब बागांचा बहर धरला होता; परंतु परतीचा पाऊस न झाल्याने कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सध्या दरीबडची, सिद्धनाथ, उमदी परिसरांतील शेतकरी टॅँकरचे पाणी देऊन बागा जगवत आहेत.

पूर्व भागातील उमदी, सिद्धनाथ परिसरातील बागायतदार बेदाणा, द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन घेतात. तर दरीबडची परिसरात दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. पाणी नसल्याने डाळिंब व द्राक्ष बागा अडचणीत आल्या आहेत. तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे, परंतु पूर्व भागातील ६५ गावे अद्याप पाण्यापासून वंचित आहेत. तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या पाण्याची व चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे भूजलपातळी खालावली आहे. सध्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथून टॅँकरने पाणी आणून बागांना दिले जात आहे. दरीबडची परिसरातील शेतकऱ्यांना टॅँकर भरायलाही पाणी नाही. कूपनलिका, तलाव शेजारी असलेल्या विहिरीतून पाणी भरले जात आहे. त्यामुळे बागा जगवणे जिकिरीचे बनले आहे.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना वर्षभर एकरी एक ते दोन लाख रुपये उत्पादन खर्च येतो. टॅँकरमुळे या खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. पाणी पुरेसे नसल्याने उत्पादन व उत्पन्न घटत आहे. बेदाण्याला बाजारात कमी दर मिळत आहे. यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com