संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नियमांचे उल्लंघन करून विहिरी, बोअर घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार : बबनराव लोणीकर

मुंबई : भूगर्भातील पाण्याच्या उद्‍भवापासून पाचशे मीटर परिसरातील विहिरी आणि बोअरचे सर्वेक्षण करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी (ता. १) विधानसभेत दिली. 

राज्यातील विशेषतः पश्चिम विदर्भातील भूजलपातळीत वाढ व्हावी, यासाठी कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात आमदार संजय पोतनीस यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री लोणीकर बोलत होते.

ते पुढे म्हणाले, की राज्यात सातत्यपूर्ण भूजल उपलब्ध व्हावे, तसेच भूजलाचे स्रोत संरक्षित करण्यात यावेत, यासाठी भूजलाचे विकास व व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ राज्यात १ जून २०१४ पासून लागू करण्यात आला आहे. तसेच, राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणलोटाची कामे, साखळी सिमेंट नालाबांध, जुने अस्तित्वातील नालाबांध, जलस्रोतांतील गाळ काढणे, जलस्रोत बळकटीकरण, विहीर पुनर्भरण यांसारखी कामे होत आहेत. मात्र, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी राज्यात कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा मांडला.

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी पाण्याच्या उद्‍भवापासून पाचशे मीटर अंतरात विहीर आणि बोअर घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार का? असा सवाल केला. त्यावर मंत्री लोणीकर यांनी पाण्याच्या उद्‍भवापासून ५०० मीटर परिसरातील विहीर आणि बोअरचे सर्वेक्षण करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगितले. तसेच अधिवेशन झाल्यावर आठवडाभरात या विषयावर बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले.  

दरम्यान, राष्ट्रीय पेयजल योजनेतून राज्यातील सर्व प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर स्वयंचलित करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारल्याची माहिती मंत्री लोणीकर यांनी विधानसभेत दिली. जेऊर, कोर्टी, बोरगाव आणि कव्हे (करमाळा जि. सोलापूर) येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर स्वयंचलित करण्याबाबत आमदार नारायण पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.    प्लॅस्टिकबंदीची मुदत वाढणार नाही ः कदम राज्यातील प्लॅस्टिकबंदीची मुदत वाढणार नाही. राज्यात ८० टक्के प्लॅस्टिक गुजरातमधून येते. गुजरातमधे प्लॅस्टिक बंदीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत दिली. आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते.

या वेळी अजित पवार म्हणाले, की अचानक प्लॅस्टिक बंदीने नागरिक घाबरले होते. आता सर्रास प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे. रामदास कदम म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत प्लॅस्टिकविरोधी कारवाई थांबली होती. पुढील आठ दिवसांत कारवाईचे परिणाम दिसतील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com