नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच

नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच

नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्‍लेषा, मघा व पूर्वा ही आठ नक्षत्र आता सरली. आठही नक्षत्रात शिवारात दमदार पाऊस पडेना... दुष्काळ हटेना... अशी स्थिती आहे. जिल्ह्यात आज घडीलादेखील चार तालुक्‍यांत ८३ चारा छावण्या सुरू आहेत. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ३८३ टॅंकरची वारी भर पावसाळ्यात सुरूच आहे. शुक्रवारी (ता. १३) उत्तरा नक्षत्र सुरू झाले. हस्त, चित्रा आणि स्वाती नक्षत्रे बाकी आहेत. पावसाच्या उत्तरा नक्षत्रात तरी पावसाने हजेरी लावावी अशी आशा आहे. 

पावसाळ्याचे साडेतीन महिने सरत आले. पावसाने मुळा, भंडारदरा जलाशय तुडुंब भरले. भीमा, प्रवरा, मुळा, गोदावरी दुथडी भरून वाहिल्या आहेत. मात्र, जिल्ह्याचा शिवार कोरडाच आहे. गतवर्षी जिल्ह्याच्या शिवारावर पावसाने रुसवा धरला. त्यामुळे टंचाईच्या परिस्थितीत फेब्रुवारीपासून गेल्या पाच महिन्यांत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ५११ छावण्यांना मंजुरी दिली. यापैकी जूनअखेर ५०४ चारा छावण्या प्रत्यक्ष सुरू होत्या. त्यात दाखल पशुधनाची संख्या तीन लाख ३६ हजार २०३ होती. 

आजमितीला जामखेड, कर्जत, पाथर्डी, शेवगाव चार तालुक्‍यांत ८३ चारा छावण्या सुरूच आहेत. त्यात ५० हजार ६८१ पशुधनाचा जगण्याचा संघर्ष अद्यापि सुरूच आहे. रोहिणी, मृग नक्षत्र अपवाद वगळता कोरडे गेले. त्यानंतर आर्द्रा नक्षत्रात पावसाची हजेरी लागली. आर्द्रानंतर पुनर्वसू, आश्‍लेषा आणि मघा नक्षत्रातदेखील दमदार पाऊस झाला नाही. जो झाला त्या हलक्‍या सरीमुळे काही प्रमाणात खरिपाच्या पिकाला संजीवनी मिळाली. आजही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनातर्फे ३८३ टॅंकर सुरू आहेत. ३५० गावे व दोन हजार ७० वाड्या-वस्त्यांवरील सात लाख ३२ हजार ४५ नागरिकांना टॅंकरचाच आधार आहे. 

तालुकानिहाय टॅंकर 

संगमनेर १८
राहुरी ०१
नेवासे ०५
राहाता ०५ 
नगर  २९ 
पारनेर ५९ 
पाथर्डी ५५ 
शेवगाव ३८
कर्जत  ६० 
जामखेड ८८ 
श्रीगोंदे २५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com