नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

संग्रहित चित्र
संग्रहित चित्र

नगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यातच तब्बल १७८ टॅंकरने १४२ गावांतील तीन लाख लोकांना पाणीपुरवठा करावा लागत आहे. अजून उन्हाळा यायचा आहे. हिवाळ्यात एवढे टॅंकर सुरू झाले असल्याने हा आकडा यंदा आठशेच्या जवळ जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

नगर जिल्ह्यात यंदा पाऊस नाही. मुळा, भंडारदरा, निळवंडे, कुकडी, सीना अशी मोठी धरणे असल्याने बागायती जिल्हा म्हणून नगरकडे पाहिले जाते. मात्र यंदा जिल्ह्यात टंचाईची स्थिती अत्यंत गंभीर आहे. यंदा पाऊस झाला नसल्याने भंडारदरा, निळवंडे वगळता अन्य धरणे भरली नाहीत. नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात बऱ्यापैकी पाणी असले तरी, अन्य ग्रामीण भागातील लोकांना मात्र आतापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाथर्डी, पारनेर, संगमनेर, शेवगाव, कर्जत, जामखेड, नगर आणि कोपरगाव या आठ तालुक्‍यांत टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवण्यात येत आहे.

पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील २४६ गावांतील भूजलपातळी तीन मीटरने घटली आहे. पाणीपातळी वाढली नसल्याने टंचाईची तीव्रता वाढत आहे. चार वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यात सातशेच्या जवळपास टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदा त्यापेक्षा टंचाईची स्थिती जास्त गंभीर आहे. नोव्हेंबर महिन्यातच पावणे दोनशे टॅंकरने पाणी द्यावे लागत असल्याने मार्च- एप्रिलमध्ये हा आकडा आठशेच्या वर जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

टंचाईग्रस्त १७८ गावे आणि ७३६ वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टॅंकर सुरू करण्यात आले. टॅंकर सुरू करण्याची मागणीही वाढत आहे. यंदा टंचाईची सर्वाधिक तीव्रता पाथर्डी, पारनेर या तालुक्‍यांत आहे.  

तालुकानिहाय टॅंकर संख्या
पाथर्डी ७३
पारनेर ४४
संगमनेर २३
शेवगाव  २०
कर्जत १०
जामखेड
नगर 
कोपरगाव   १

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com