जुलै उजाडला तरी पाणीटंचाई सुरूच

जुलै उजाडला तरी पाणीटंचाई सुरूच
जुलै उजाडला तरी पाणीटंचाई सुरूच

पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर पुणे विभागातील जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे पाणी जमा होण्यास सुरवात झाली असून, टंचाई हळूहळू कमी होऊ लागली आहे. गेल्या आठवडाभरात विभागातील ८ तालुक्यांमधील टॅंकर पूर्णपणे बंद झाले आहेत. तर टंचाईची तीव्रता अधिक असलेल्या ३३ तालुक्यांमध्ये मात्र अद्यापही झळा कायम आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील ८८२ गावे ५ हजार ४१८ वाड्यांना १ हजार ९४ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.  मॉन्सून दाखल होण्यास झालेला उशीर, पूर्वमोसमीच्या सरींनी दिलेली ओढ, उन्हाचा वाढलेला चटका यामुळे यंदा जून महिन्यात टंचाईच्या झळा खूपच वाढल्या. २८ जून रोजी विभागातील ४१ तालुक्यांतील ९८९ गावे ५ हजार ८७५ वाड्यांना १ हजार २०४ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. जूनच्या शेवटच्या टप्प्यात विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये दमदार तर सोलापूर, सांगलीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने लहान मोठ्या बंधाऱ्यात पाणी साचले. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांनाही पाझर फुटू लागले आहेत. त्यामुळे टंचाई कमी होऊ लागली आहे. मात्र विभागातील टंचाई पूर्णपणे निवारण्यासाठी सातत्यपूर्ण पावसाची आवश्यकता आहे.  यंदा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह पुण्यातील मावळ आणि सांगलीतील पलूस, कडेगाव, वाळवा हे तालुके वगळता उर्वरित ४१ तालुक्यांमध्ये पाणीटंचाईच्या झळा वाढल्या. शनिवारपर्यंत (ता. ६) पुण्यातील भोर, मुळशी, वेल्हा, साताऱ्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, सातारा, सांगलीतील शिराळा या तालुक्यातील टॅंकर पूर्णपणे बंद झाले होते. उर्वरित ३३ तालुक्यांच्या टंचाईग्रस्त भागातील २० लाख ३० हजार ६७१ लोकसंख्या आणि १५ लाख ४४ हजार जनावरांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागात आहे. यासाठी ५०४ विहिरी आणि विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.   पावसाने ओढ दिलेल्या सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई भेडसावत आहे. तेथील ३३५ गावे १ हजार ९५० वाड्यांमध्ये ३८२ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे, तर सांगली जिल्ह्यातील १७८ गावे १२४१ वाड्यांना २२० टॅंकरने पाणी पुरविले जात आहे. साताऱ्यातील २२४ गावे १ हजार ६ वाड्यांना २५५ टॅंकरने, तर पुणे जिल्ह्यातील १४५ गावे १ हजार २२१ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी २३७ टॅंकर सुरू आहेत.   टंचाईग्रस्त भागात सुरू असलेल्या टॅंकरची तालुकानिहाय संख्या : पुणे - इंदापूर ६६, बारामती ४६, पुरंदर ३५, दौंड ३३, शिरूर २९, आंबेगाव १२, जुन्नर ११, हवेली ४, खेड १. सातारा - माण ११९, फलटण ४९, खटाव ४४, कारेगाव २९, वाई ७, खंडाळा २. सांगली - जत ११८, आटपाडी ३८, कवठेमहांकाळ २४, तासगाव १९, खानापूर १६, मिरज ५. सोलापूर - सांगोला ६१, मंगळवेढा ५८, करमाळा ५१, माढा ४२, मोहोळ ३३, दक्षिण सोलापूर ३१, माळशिरस २८, उत्तर सोलापूर २४,  बार्शी २३, पंढरपूर १७, अक्कलकोट १४. 

  • पुणे विभागात ३३ तालुक्यांमध्ये टंचाईच्या झळा कायम
  • ८८२ गावे ५ हजार ४१८ वाड्यांमध्ये तीव्र टंचाई 
  • १ हजार ९४ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू
  • पावसाने ओढ दिलेल्या सोलापुरात सर्वाधिक टंचाई 
  • विभागातील पाणीटंचाईची जिल्हानिहाय स्थिती
    जिल्हा गावे वाड्या एकूण टँकर्स
    पुणे १४५ १२२१ २३७
    सातारा २२४ १००६ २५५
    सांगली १७८ १२४१ २२०
    सोलापूर ३३५ १९५० ३८२
    एकूण ८८२ ५४१८ १०९४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com