सोळा वर्षांच्या संघर्षानंतर `टेंभू`चे पाणी माणमध्ये

टेंभू योजनेतून  सोडलेले पाणी
टेंभू योजनेतून सोडलेले पाणी

दहिवडी, जि. सातारा  ः भीषण दुष्काळी स्थितीत टेंभू योजनेचे पाणी ओढ्यांमध्ये खळाळताना व बंधारे, तलाव भरलेले पाहताना माणदेशी जनतेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले असून, ‘‘आनंद पोटात माझ्या माईना रं माईना...’ अशी स्थिती येथील नागरिकांची झाली आहे.

२००३ मध्ये म्हणजेच सोळा वर्षांपूर्वी वरकुटे-मलवडीसह सोळा गावांतील ग्रामस्थांना घेऊन अनिल देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी दहिवडी तहसील कार्यालयासमोर सोळा दिवस केलेल्या आंदोलनाला यानिमित्ताने यश आले, असेही तालुक्‍यात बोलले जात आहे. माणच्या पूर्वेकडील विरळी, जमालवाडी, बागलवाडी, आटपाडकर वस्ती, कापूसवाडी, जळकी कापूसवाडी, कोरेवाडी, पानाडेवाडी, लांडेवाडी, काळचौंडी, शेनवडी, महाबळेश्वरवाडी, बनगरवाडी, वरकुटे-मलवडी, खरातवाडी व कुरणेवाडी या सोळा गावांचा कुठल्याही पाणी योजनेत समावेश नव्हता. येथे भीषण दुष्काळी स्थिती असतानाच आपल्याच जिल्ह्यातील पाण्याने लगतच्या सांगली जिल्ह्यातील कालवा भरून वाहत होता. त्या पाण्याकडे पाहण्याशिवाय माणवासीयांपुढे पर्याय नव्हता. पण, हे पाणी मिळाले तरी आपला दुष्काळ हटेल, अशी येथील जनतेची भावना होती.

त्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. सतत संघर्ष करण्यात आला; पण त्यात यश आले नाही. अनिल देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी सोळा गावांसाठी पाण्याची मागणी केली. ती मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. २७ मार्च २०१८ ला माणमधील सोळा गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टेंभूचे पाणी देण्याच्या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर तेरा महिन्यांत ही योजना पूर्णत्वास गेली. सध्या हे पाणी ओढ्यामधून खळाळत, बंधारे भरत, महाबळेश्वरवाडीच्या तलावाच्या दिशेने निघाले आहे. या पाण्यामुळे काळचौंडी व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 

योजनेची वैशिष्ट्ये 

  • प्रथमच सांगलीतून सातारा जिल्ह्यात पाणी
  •  टंचाई निधीतून योजना पूर्णत्वास 
  •  फक्त तेरा महिन्यांत योजना पूर्णत्वाकडे  
  • सोळा गावांचा पाणी प्रश्न मिटविण्यात यश 
  • चार किलोमीटर लांबीच्या पाइपमधून कोरेवाडी येथे पाणी. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com