टॅंकरमुक्तीसाठी ‘वॉटरग्रिड’ ठरेल फायेदशीर : सी. ए. बिराजदार

टॅंकरमुक्तीसाठी ‘वॉटरग्रिड’ ठरेल फायेदशीर : सी. ए. बिराजदार
टॅंकरमुक्तीसाठी ‘वॉटरग्रिड’ ठरेल फायेदशीर : सी. ए. बिराजदार

सोलापूर : ‘‘जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुधारण्यासाठी ‘वॉटरग्रिड’ची योजना राबवावी. या योजनेमुळे टॅंकरमुक्त होण्याचे स्वप्न साकार होऊ शकते’’, असे मत जलसंपदा खात्याचे निवृत्त सचिव सी. ए. बिराजदार यांनी रविवारी (ता. २८) येथे व्यक्त केले. 

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सोलापूर शाखेतर्फे ‘भूपृष्ठावरील जलसाठे’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी बिराजदार बोलत होते. जलतज्ज्ञ डॉ. अप्पासाहेब पुजारी अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी कार्यशाळेचे समन्वयक ‘सकाळ’चे मुख्य उपसंपादक रजनीश जोशी यांनी प्रास्ताविक केले. माजी खासदार धर्मण्णा सादूल, प्रतिष्ठानचे स्थानिक अध्यक्ष माजी आमदार युन्नुस शेख, महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संजय धनशेट्टी, स्थानिक सचिव दिनेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

बिराजदार म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या ४३ लाख लोकसंख्येला वर्षभर पिण्यासाठी १० टीएमसी पाण्याची गरज आहे. तालुक्‍याच्या मध्यवर्ती भागात ‘वॉटरग्रिड’ करून त्यातून विविध गावांना पाणी देता येते. त्यातून महसूलही उभा राहतो. केवळ जलसंधारणातून टॅंकरमुक्ती शक्‍य नाही. टॅंकरच्या खर्चात ‘वॉटरग्रिड’ उभे राहू शकते. मराठवाड्यात ‘गोदावरी’वरून असा प्रयोग होत आहे. राजस्थान व तेलंगणात ही योजना यशस्वी झाली आहे.’’

या कार्यशाळेत जलसंपदा खात्याचे निवृत्त प्रधान सचिव सुरेश सोडल, निवृत्त कार्यकारी अभियंता सु. स. देशमुख, माजी प्राचार्य डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, गोवर्धन बजाज, नरेंद्र कल्याणशेट्टी, प्रा. सोमनाथ हुनसिमरद, गोविंद काळे आदी उपस्थित होते. 

‘सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा - समस्या, कारणे व उपाय’ या विषयावर अभियंता संजय धनशेट्टी यांनी मांडणी केली. ‘उजनी धरण आणि भीमा नदीचे जलप्रदूषण, कारणे व उपाय’ यावर रजनीश जोशी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘अप्पर भीमा क्षेत्रातून धरणात जमा होणाऱ्या रासायनिक व मलमूत्रमिश्रित पाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांनी संघटित व्हावे.’’  

डॉ. पुजारी म्हणाले,‘‘ झाडाची फक्त पांढरी मुळेच पाणी शोषतात. त्यांच्यापर्यंत  पाणी पोचवणे आवश्‍यक आहे. गरजेनुसार मुळांनीच ते शोषले पाहिजे, यासाठी त्याच्या अवतीभवती ते उपलब्ध करून दिल्यास पाणीबचत होते.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com