हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
बातम्या
खानदेशात कलिंगड, काकडी, पपई दरांवर दबाव
खानदेशात पपईला हंगाम अंतिम टप्प्यात असतानादेखील हवे तसे दर मिळत नसल्याची स्थिती आहे. फक्त केळीचे दर स्थिर आहेत. इतर फळांमध्ये कलिंगड, काकडीची काढणी अलीकडेच सुरू झाली आहे.
जळगाव ः खानदेशात पपईला हंगाम अंतिम टप्प्यात असतानादेखील हवे तसे दर मिळत नसल्याची स्थिती आहे. फक्त केळीचे दर स्थिर आहेत. इतर फळांमध्ये कलिंगड, काकडीची काढणी अलीकडेच सुरू झाली आहे. परंतु दर पुरेसे मिळत नसल्याची स्थिती आहे.
कलिंगड, काकडी लागवड खानदेशात वाढली आहे. ही लागवड जळगावमधील जामनेर, यावल, चोपडा, पाचोरा, एरंडोल आदी भागांत आहे. धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे भागांतही कलिंगड, काकडीचे पीक आहे. कलिंगडाची लागवड खानदेशात सुमारे तीन हजार हेक्टरवर झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकात आंतरपीक म्हणून काकडी, कलिंगडाची लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांच्या कलिंगडाची काढणी याच आठवड्यात सुरू झाली आहे. कलिंगडाची खरेदी थेट शिवारात किंवा शेतात खरेदीदार करतात. मध्य प्रदेश, जळगाव, धुळे भागातील खरेदीदार कलिंगड खरेदी करतात. पण कलिंगडास सुरुवातीलादेखील दर कमी म्हणजेच ३०० ते ४०० रुपये क्विंटल एवढे मिळत आहेत.
काकडीची आवक बाजारात होत आहे. काकडीलाही प्रतिकिलो १२ रुपये दर शेतकऱ्यांना मिळत आहे. दर कमी असल्याने खर्च व उत्पादनाचा ताळमेळ बसेल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कलिंगडाची काढणी तीनच दिवसांत एका क्षेत्रात पूर्ण होते. यामुळे दरांबाबत मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कलिंगडाची सध्या रोज १० ट्रक (एक ट्र ७ टन क्षमता) एवढी आवक होत आहे. जळगाव बाजार समितीत लहान व मोठ्या काकडीची आवक वाढत असून, लहान काकडीची रोज १० क्विंटल आवक होत आहे.
-----------------
चौकट
पपईला कमी दर
पपईचा हंगाम खानदेशात अंतिम स्थितीत आहे. परंतु पपईला थेट शिवार खरेदीत प्रतिकिलो पाच ते सहा रुपये दर मिळत आहे. उष्णता वाढल्याचे कारण देत खरेदीदार कमी दरांबाबत देत आहेत. परंतु उत्तरेकडे सध्या वातावरण बऱ्यापैकी थंड आहे. त्या भागात पपईला मागणी आहे. असे असताना शेतकऱ्यांना दर कमी का दिले जात आहेत, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. पपईची आवक कमी झाली आहे, असे सांगण्यात आले.