मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
अॅग्रो विशेष
कमी कालावधीत पक्व होणारे मधुर कलिंगड विकसित
बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने (आयआयएचआर) ६५ ते ७० दिवसांमध्ये विकसित होणारी गोड, कुरकुरीत स्वादाच्या कलिंगडाची जात विकसित केली आहे.
नाशिक : बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने (आयआयएचआर) ६५ ते ७० दिवसांमध्ये विकसित होणारी गोड, कुरकुरीत स्वादाच्या कलिंगडाची जात विकसित केली आहे. ‘अर्का श्यामा’ असे या जातीचे नाव आहे. लांब वाहतुकीसाठी किंवा निर्यातीसाठी देखील ती आदर्श ठरणारी आहे.
बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने (आयआयएचआर) भारतीय शेतकऱ्यांसाठी कलिंगडाची ‘अर्का श्यामा’ ही नवी जात उपलब्ध केली आहे. संस्थेच्या भाजीपाला विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ई. श्रीनिवास राव व सहकाऱ्यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.
डॉ. राव याबाबत म्हणाले, की खुल्या परागीभवन प्रकारातील (ओपन पॉलिनेटेड) ही जात असून, पुढील वर्षासाठी त्याचे बियाणे राखून ठेवून त्याचा वापर शेतकऱ्यांना करता येणार आहे. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ६५ ते ७० दिवसांत ही जात पक्व होते. फळाच्या वरचा भाग टणक असल्याने लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी तसेच निर्यातीसाठी ती उपयुक्त ठरू शकते. यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात ही जात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाली आहे. सध्या या वाणांचे बियाणे मर्यादित आहे. त्यामुळे गुणन करून अधिक प्रमाणावर बियाणे उत्पादन सुरू आहे.
लागवडीचा हंगाम
ऑक्टोबर- नोव्हेंबर ते जानेवारी व फेब्रुवारीच्या पंधरवड्यापर्यंत त्याचा अनुकूल लागवड हंगाम आहे. सध्या दक्षिण भारतासाठी या वाणाच्या लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. मल्चिंग पेपरवर त्याची लागवड करणे गरजेचे आहे. अन्य राज्यांत अद्याप त्याच्या चाचण्या झालेल्या नाहीत. मात्र इच्छुक शेतकरी प्रायोगिक स्तरावर त्याची चाचणी घेऊ शकतात. नजीकच्या काळात त्याचे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे, असे डॉ. राव यांनी सांगितले.
किफायतशीर दरात बियाणे
सध्या भारतात कलिंगडाच्या संकरित जाती उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती ४५ हजार रुपये प्रतिकिलोपासून पुढे आहेत. त्यामुळे कलिंगड लागवडीत ही खर्चिक बाब असते. भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था या वाणाचे बियाणे प्रति किलो १२ हजार रुपये दराने उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे, असेही डॉ. राव यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण संशोधनानंतर अर्का श्यामा हा वाण विकसित करण्यात आला आहे कलिंगड बीजोत्पादनात आत्मनिर्भर होणे हा संशोधनातील महत्त्वाचा उद्देश आहे.
- डॉ. ई. श्रीनिवास राव, प्रमुख शास्त्रज्ञ, भाजीपाला विभाग,
भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था, बंगळूर
‘अर्का श्यामा’ वाणाचे वैशिष्ट्य
- गडद हिरवा- काळा रंग
- ३ ते ४ किलो वजनाचे फळ
- फळाचा स्वाद गोड, कुरकुरीत
- लाल चुटूक रंगाचा गर
- लंबगोलाकार आकार
- टीएसएस- १२ टक्के
- 1 of 657
- ››