आता ही संकटे सोसण्याची सहनशक्ती संपली ! 

आता हे संकटाचं सलग तिसरं वर्ष. नोटाबंदी, कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी, तर मागच्या वर्षी कोरोनामुळे विक्रीच झाली नाही. झाली तर पडत्या दरात. यंदा दोन पैसे होतील अशी अपेक्षा होती.
आता ही संकटे सोसण्याची सहनशक्ती संपली ! 
आता ही संकटे सोसण्याची सहनशक्ती संपली ! 

नाशिक ः आता हे संकटाचं सलग तिसरं वर्ष. नोटाबंदी, कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी, तर मागच्या वर्षी कोरोनामुळे विक्रीच झाली नाही. झाली तर पडत्या दरात. यंदा दोन पैसे होतील अशी अपेक्षा होती. मात्र अवकाळी पावसाने होतं ते सार मातीमोल केलं, उभं राहायचं कसं, स्वतःला अन् कुटुंबाला सावरायचं कसं, आता ही संकटं सोसण्याची सहनशक्तीच संपली, अशा शब्दांत वाजगाव (ता. देवळा) येथील द्राक्ष उत्पादक जगन्नाथ देवरे यांनी आपली व्यथा मांडली. 

महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाच्या माहितीप्रमाणे सप्टेंबर महिन्यांत एकूण क्षेत्रांपैकी १० टक्के बागांच्या छाटण्या पूर्ण झाल्या होत्या. त्याअनुषंगाने ५८३६ हेक्टर क्षेत्रावरील बागा काढणीयोग्य असून, अधिक प्रमाणावर माल निर्यातक्षम होता. सध्या सरासरी ७० रुपयांचा दर शेतकऱ्यांच्या पदरी पडत होता. मात्र गुरुवार ते शनिवार दरम्यान झालेल्या पावसामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची समस्या वाढली आहे. त्यामुळे हे ९०० कोटींवर गेल्याची प्राथमिक माहिती आहे. तर नंतरच्या छाटण्यांमध्ये हे नुकसान आहे, हे नुकसान पुन्हा मोठेच आहे. सध्या मालाला तडे जाऊ लागल्याने हा निर्यातक्षम माल स्थानिक बाजारातही विकला जात नसल्याची स्थिती आहे. नुकसान वाढते असल्याने आता व्यापारी जोखीम नको म्हणून सौदे करण्यास तयार नाहीत. परिणामी, हातात येईल ते दोन पैसे कसे मिळतील यासाठी शेतकरी माल पट्ट्यावर पाठवीत आहेत. मात्र हाती काय येईल हे बाजार ठरविणार अशी स्थिती असल्याने, शेतकऱ्यांचा खर्चही वसूल होणार नाही, असे चित्र आहे. 

सुरुवातीच्या टप्प्यात छाटणी केलेल्या बागांमध्ये पाणी उतरण्याची, तर अनेक बागा काढणीयोग्य अवस्थेत होत्या. मात्र आता या सर्वच बागांमध्ये ५० टक्क्यांवर नुकसान दिसून येत आहे. मालाचा रंग, प्रतवारी, गोडी अशा गुणवत्तापूर्ण अवस्थेत असणाऱ्या बागा नुकसानीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मालाला तडे गेल्याने पाणी बाहेर येऊन बुरशी तयार व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संपूर्ण घड बाधित होत आहेत. बागांवर खर्च १०० टक्के झाला, त्यातच नुकसान वाढत असल्याने कष्टावर पाणी फिरले आहे. निर्यातक्षम बागांमध्ये घडांना कागदाचे वेष्ठण लावलेले होते. मात्र पावसाचे पाणी साचून घड भिजले. सुरुवातीला हे नुकसान दिसून येत नव्हते. मात्र आता कागद काढल्यानंतर नुकसान मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे.  व्यापाऱ्यांनी सौदे केले, माल घ्येण्यास नकार  विंचुरी गवळी (ता. नाशिक) येथील शेतकरी अशोकराव रिकामे यांच्या बागेला भेट दिली असता त्यांनी सांगितले, की गुरुवारी (ता. ७) सकाळी १२५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे बांगलादेश मार्केटसाठी सौदा झाला. मात्र दुपारनंतर पाऊस सुरू होऊन दुसऱ्या दिवशी हे नुकसान ३० टक्क्यांवर दिसून आले. त्यामुळे व्यवहार झाला, मात्र व्यापारी माल घ्यायला तयार नाहीत. मालावर बुरशी येण्यासह फळमाशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी, या गुणवत्तापूर्ण मालाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे द्राक्ष मणी खराब होऊन मणी गळ होण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. आता कुणी व्यापारी माल घेणार नसल्याने माल पट्टीवर पाठवून मिळेल तो भाव पदरात पडून घ्यावा लागणार, असे श्री. रिकामे यांनी सांगितले.  कर्ज फेडायचं कसं अन् पुन्हा उभ राहायचं कसं?  जिल्ह्यात हा फटका सर्वच भागांत दिसून येत आहे. निर्यातक्षम माल तयार झाला होता. सुरुवातीला हे नुकसान ३० ते ४० टक्के दिसून येत होते. मात्र ऊन पडल्यानंतर हे नुकसान ८० टक्क्यांपर्यंत दिसून येत आहे. त्यामुळे मजूर लावून हा माल निवडता येणार नसल्याची स्थिती आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे नुकसान सोसत आहोत. दोन दिवसांत गाड्या येऊन माल जाणार होता, मात्र पावसाने होत्याचं नव्हतं केलं. कर्ज काढले, त्यावर खर्च भागेना म्हणून पत्नीचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतलं, हंगाम उभा केला. आता सर्वच नुकसान झाल्याने कर्ज फेडायचं कसं अन् पुन्हा उभ राहायचं कसं, अशी हतबलता देवळा तालुक्यातील वाजगाव येथील द्राक्ष उत्पादक प्रदीप देवरे यांनी व्यक्त केली. 

कसमादे भागात सटाणा तालुक्यात अगोदरच क्षेत्र बाधित झाले आहे, अन् पुन्हा हे संकट द्राक्ष उत्पादकांवर आले आहे. अस्मानी संकटाने शेतकऱ्यांना संपूर्ण अडचणीत आणले. हा नुकसान झालेला माल बाजारात विक्रीच्या प्रतीचाही राहिलेला नाही. दरवर्षी अतिवृष्टी, अवकाळी पावसाचा मोठा फटका जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना बसत असल्याने, उत्पन्नाचे सर्व गणित बिघडले आहे. अधिक दरासाठी लवकर छाटण्या घेणाऱ्या द्राक्ष उत्पादकांसोबत नियमित छाटण्या घेणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे सर्वच पर्याय संपल्याचे चित्र आहे. त्यामुळे या संकटात नेमका मार्ग कसा काढायचा या विवंचनेत आहेत. सहन करण्याची क्षमताच संपली. द्राक्ष उत्पादक जिद्दी, कष्टाळू आहेच पण या संकटामुळे अडचणीत सापडले आहे.  द्राक्ष उत्पादनाची स्थिती (क्षेत्र ःहेक्टर)  ५८ हजार  लागवड क्षेत्र  १६८ लाख टन  अपेक्षित उत्पादन  २५ टन  हेक्टरी उत्पादकता 

प्रतिक्रिया  सरकार फलोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे कधीच पाहत नाही. पिकासाठी संरक्षण देत नाही. आजवर नुकसान झाल्यावर ना केंद्राने पाहिले ना राज्य सरकारने. द्राक्ष उत्पादक कायमच वाऱ्यावर सोडला आहे. त्यामुळे हवामान बदलात टिकाव धरणाऱ्या वाणांची गरज आहे. द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक चक्र थांबले आहे. सरकारने याकडे आता सकारात्मकरीत्या पाहण्याची गरज आहे.  - रवींद्र बोराडे, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com