agriculture news in Marathi we lost father with crops in natural calamity Maharashtra | Page 2 ||| Agrowon

नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही गमावला

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा बापही गमावला. सरकार अशा वक्ती पाठीशी रायते, पण कोरोना हाये म्हणून सरकारच्या तिजोरीत पैसा नाई, अन् पैसा नाई म्हणून आमाले मदत नाई! सांगा आता जगावं तरी कसं? 

यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा बापही गमावला. सरकार अशा वक्ती पाठीशी रायते, पण कोरोना हाये म्हणून सरकारच्या तिजोरीत पैसा नाई, अन् पैसा नाई म्हणून आमाले मदत नाई! सांगा आता जगावं तरी कसं? आसवानी डबडबलेल्या डोळ्यांनी ही सारी परिस्थिती अतुल राठोड मांडत होते आणि उपस्थित सारेच निःशब्द झाले होते.

महागाव तालुक्यातील चिली ईजारा येथील विलास भोमसिंग राठोड यांच्याकडे माळपठारावरील अडीच एकर शेती. हेच या कुटुंबीयांचे उदरनिर्वाहाचे साधन. पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी असे कुटुंब. अतुल हा मोठा मुलगा. विलास हे पत्नीसह दिवस-रात्र ते शेतात राबत. मात्र ३ सप्टेंबर रोजी पत्नीसह शेतात काम करणाऱ्या विलास राठोड यांच्या अंगावर वीज कोसळली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. या घटनेत विलास राठोड ठार झाले तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. कारण खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी पैशाची सोय नव्हती.

नैसर्गिक आपत्तीत दगावलेल्या व्यक्तींना शासनाकडून मदत दिली जाते. परंतु सरकारची तिजोरी रिकामी असल्याचे कारण सांगत गेल्या महिन्याभरापासून शासकीय बाबूंनी त्यांना मदतीपासून वंचित ठेवले आहे. राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर दाद मागावी तर कोणाला ? असा सवाल हे कुटुंबीय आज उपस्थित करीत आहे. 

परतीच्या पावसामुळे आर्णी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. लोणी येथील इंद्रपाल चौधरी यांची सहा एकरावर कपाशी लागवड. परतीच्या पावसामुळे काही भागात बोंड सडली तर काही भागातील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. निसर्गाचा असा दुहेरी मारा तोंड दाबून सोशण्याशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

खरिपातील सोयाबीन, कापूस विकल्यानंतर त्या पैशावर घरातील चिमुकल्यांची दिवाळी साजरी होते. यावर्षी मात्र दिवाळी कशी साजरी करावी आणि लेकराला काय सांगावं अशी चिंता लागून असल्याची भावनिक प्रतिक्रिया आर्णी येथील निर्मला बाबूराव जाधव यांनी दिली. परतीचा पाऊस आणि गुलाबी बोंडअळी अशा दुहेरी संकटामुळे या भागातील शेतकऱ्यांचा कोंडमारा झाला आहे. शासनाने मदत न केल्यास आमची दिवाळी अंधारातच जाईल, असेही निर्मला जाधव यांनी सांगितले. 

सय्यद दिलशाद सय्यद गफार, सतीश प्रमोद राऊत यांच्यासह तालुक्यातील हजारावर शेतकऱ्यांसमोर आता उदरनिर्वाहासाठी पैसा कुठून आणावा? असा प्रश्न पडला आहे. कपाशीच्या लागवडीवर प्रति एकरी २२ ते २५ हजार रुपयांचा खर्च झाला. उत्पादकता आणि परिणामी उत्पन्न मात्र शून्य असल्याने या खर्चाची भरपाई देखील शक्य होणार नाही अशी स्थिती आहे.

एकरी सरासरी दहा क्विंटल कापसाची उत्पादकता होणाऱ्या या भागात काही शेतकऱ्यांना एकरी एक क्विंटलचा उतारा आला आहे. तर काही शेतकरी मात्र याबाबतीतही कमनशिबी ठरले. महागाव तालुक्यातील वागद इजारा येथील मनीष जाधव यांच्या शिवारातून पाण्याचे पाट वाहिले. पाण्याचा मारा झाडांना सोसवला नाही. परिणामी कपाशी कोलमडून पडली. आता एक क्‍विंटल उत्पादन देखील होईल किंवा नाही? अशी स्थिती या शिवारात निर्माण झाली आहे. 

नुकसानीचे सत्र सुरुच
जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे  २ हजार २३  हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ९ हजार १०७ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टी आणि पुरामुळे  नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. एका मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा  अधिक पावसाची नोंद झाल्यास त्याला अतिवृष्टी संबोधले जाते. संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश शासनाने दिले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती वर्तविली जात आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढाजळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले...
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळनवी दिल्ली  : दिल्ली पोलिसांनी परवानगी...
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशतनगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या...
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के...नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...