बहुमतावेळी भाजपचा पराभव करू : शरद पवार

We will defeat BJP in time of proving majority : Sharad Pawar
We will defeat BJP in time of proving majority : Sharad Pawar

मुंबई : राज्यपालांनी भाजपला बहुमत स्पष्ट करण्यासाठी ३० तारखेपर्यंतची मुदत दिली आहे. त्यादिवशी त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही. त्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करू. सरकारचे नेतृत्व शिवसेनेने करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही सोबत राहू, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. २३) व्यक्त केला. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या एकत्रित बैठकीनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही पत्रकार परिषद झाली. या वेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 

या वेळी शरद पवार म्हणाले, आम्ही तीनही पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार आहोत. आमच्याकडे संख्याबळ आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही अपक्ष आमदार असे मिळून आमच्याकडे १६९-१७० च्या जवळपास आमदार आहेत. अजित पवारांनी जे केले ते योग्य नाही. अजित पवारांचा निर्णय शिस्तभंगाची कारवाई करावी असा आहे. अजित पवारांवर कारवाई करावी लागेल, होईलही. मात्र, हा निर्णय कुणी एक व्यक्ती घेणार नाही, पक्षाच्या शिस्तभंग समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल. जे आमदार गेले आहेत आणि जे जाणार असतील त्यांनी आपल्या देशात पक्षांतर बंदी कायदा आहे हे लक्षात ठेवावे. अशा सर्व आमदारांचे विधिमंडळ सदस्यत्व जाण्याची शक्यता आहे. जनमानस पाहता राज्याचा सर्वसामान्य माणूस यांना कधीही पाठिंबा देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

आम्ही माहिती घेतल्यानंतर अजित पवारांसोबत १० ते ११ आमदार असल्याची माहिती आहे. हा प्रकार घडल्यानंतर काही आमदारांनी आमच्याशी संपर्क करायला सुरुवात केली. प्रत्येक पक्षाने आपल्या आमदारांच्या सह्या घेऊन पत्रे तयार ठेवली होती. माझ्याकडे देखील तशी यादी होती. यातील एक यादी अजित पवारांनी कार्यालयातून घेतल्या. त्याच यादी त्यांनी राज्यपालांना दिल्या असाव्यात. कार्यालयीन उपयोगासाठीच्या सह्यांच्या आधारे सरकार स्थापन झाले असेल, तर राज्यपालांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यावर ५४ सह्या होत्या. मात्र, त्या कार्यालयीन कामासाठी होत्या, पाठिंब्यासाठी नाही. तरीही त्यांनी राज्यपालांना पाठिंबा असल्याचे भासवत ते पत्र सादर केले असावे, अशी शक्यताही पवारांनी बोलून दाखवली.

अजित पवार असा निर्णय घेतील असे वाटले नव्हते. मला कुटुंबाची काळजी वाटत नाही. १९८० मध्ये ५८ आमदार निवडून आले होते. त्या वेळी अनेक आमदार सोडून गेले, माझ्यासह केवळ सहाजण शिल्लक राहिले. त्या वेळी सोडून गेलेले सर्व आमदार पराभूत झाले, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘देशात लोकशाहीच्या नावाने जो कारभार सुरू आहे, तो चुकीचा आहे. जे नवे हिंदुत्व आले आहे त्याचे हे काम आहे. शिवसेना जे करते ते उघड करते, ते आमदार फोडून करतात. बिहारमध्ये त्यांनी लालू आणि नितीशचे सरकार फोडले आणि सरकार पाडले. त्यांच्या मी पणा विरोधातली ही लढाई आहे. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. पाठीवर वार केल्यावर महाराजांनी काय केले होते ते त्यांनी समजून घ्यावे,’’ असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला.

इतिहासातली काळी घटना ः अहमद पटेल

गुपचूप अंधारामध्ये राष्ट्रपती राजवट  उठवून शपथविधी उरकणे ही महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या शाईने लिहिली जाणारी घटना आहे, असे सांगत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष आजही एकत्र आहेत, पुढे एकत्र राहतील आणि बहुमत सिद्ध करताना आज बनवलेल्या सरकारचा पराभव करतील, असे काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी स्पष्ट केले. 

राज्यात भाजपबरोबर जाऊन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी पहाटे सरकार स्थापन केले. या घडामोडी संदर्भात काँग्रेसने आपली आज भूमिका स्पष्ट केली. 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी दुपारी दोन वाजता काँग्रेसची पत्रकार परिषद झाली. त्यात बोलताना पटेल म्हणाले, की राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे याची कोणतीही खातरजमा केली नाही. चुपचाप आणि रात्रीच्या अंधारात नव्या सरकारला शपथ दिली. महाराष्ट्र राज्य भारतीय संविधानात आस्था असणारे राज्य आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिका 

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने केंद्र आणि राज्य सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात शनिवारी (ता. २३) याचिका दाखल केली आहे. या याचिकेत शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४, कॉंग्रेस ४४, इतर ८ असे मिळून १६२ संख्याबळ आमच्याकडे आहे. आमची महाविकास आघाडी शनिवारी सत्तास्थापनेसाठी दावा करणार होती, मात्र त्या आधीच अवैध पद्धतीने भारतीय जनता पक्षाने घटनेच्या नियम १४ची पायमल्ली करून सरकार स्थापन केले. याविरोधात आम्हाला न्याय द्यावा, असे म्हटले आहे.

सुप्रिया सुळे भावूक 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंब फुटल्याची भावना आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सद्वारे व्यक्त केली. त्यानंतर काही वेळातच त्यांनी आपले दुसरे स्टेटसदेखील टाकले. यात त्यांनी अजित पवारांच्या या निर्णयावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. आयुष्यात तुमच्यावर विश्वास कोण ठेवेल? माझ्या आयुष्यात कधीही इतकी फसवणूक झाल्याचे वाटले नाही, पाठराखण केली, प्रेम दिले त्याबदल्यात परत काय मिळाले? असा सवालही त्यांनी  व्यक्त केला आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com