अरबी समुद्रात कमी तीव्रतेच्या वादळाचे संकेत

अरबी समुद्रात कमी तीव्रतेच्या वादळाचे संकेत
अरबी समुद्रात कमी तीव्रतेच्या वादळाचे संकेत

पुणे : अरबी समुद्राच्या अग्नेय भागात मंगळवारी (ता. १३) सकाळी तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप्रेशन) तयार झाले आहे. वायव्येकडे सरकत असलेल्या या प्रणालीचे गुरुवारपर्यंतच्या ४८ तासांमध्ये कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डीप्रेशन) रूपांतर होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. पावसाला पोषक स्थिती तयार होत असल्याने मंगळवारी दुपारी राज्यात ढगाळ हवामान तयार होऊ लागले अाहे. गुरुवारपासून राज्यात पावसाची शक्यता असून, शुक्रवार आणि शनिवारी सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र श्रीलंका अाणि मालदीवलगत ठळक झाले. त्यानंतर वायव्येकडे सरकणाऱ्या या प्रणालीची तीव्रता आणखी वाढतच आहे. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास अग्नेय अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली होती. मिनिकाॅय बेटांच्या अग्नेयेकडे ४८० किलोमीटर, थिरुअनंतपुरमपासून नैऋत्येकडे ३९० किलोमीटर आणि मालदिवच्या मालेपासून इशान्येकडे २९० किलोमीटर अंतरावर होते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात असलेला कमी दाबाचा पट्टा कर्नाटक किनाऱ्यापर्यंत विस्तारला होता. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली होती. यामुळे राज्यात ढगाळ हवामान तयार होत असून, पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  कोकणातील भिरा येथे उष्णतेची लाट कायम असून, मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे देशातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे विदर्भात कमी झालेले तापमान पुन्हा वाढले अाहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पारा ३६ अंशांच्या वर सरकला आहे. गुरुवारपासून पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने राज्याचे कमाल तापमान कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.   मंगळवारी (दि. १३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.६, जळगाव ३८.६, कोल्हापूर ३६.०, महाबळेश्वर ३१.८, मालेगाव ३८.६, नाशिक ३६.२, सांगली ३६.३, सातारा ३७.५, सोलापूर ३७.६, मुंबई ३३.२, अलिबाग ३२.८, रत्नागिरी ३६.४, डहाणू ३१.२, भिरा ४२.०, औरंगाबाद ३५.६, परभणी ३७.४, नांदेड ३६.५, अकोला ३७.६, अमरावती ३६.४, बुलडाणा ३६.२, ब्रह्मपुरी ३८.१, चंद्रपूर ३७.८, गोंदिया ३६.२, नागपूर ३७.०, वर्धा ३७.८, यवतमाळ ३६.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com