लातूर, नांदेड, कोल्हापूरमध्ये वाऱ्यासह पावसाच्या सरी

लातूर, नांदेड, कोल्हापूरमध्ये वाऱ्यासह पावसाच्या सरी
लातूर, नांदेड, कोल्हापूरमध्ये वाऱ्यासह पावसाच्या सरी

पुणे : उन्हाचा चटका वाढला असतानाच लातूर, नांदेड, उस्मानाबाद, कोल्हापूर जिल्ह्यांत रविवारी (ता. ६) पावसाचे ढग गोळा झाले होते. दुपारनंतर उकाड्यात वाढ हाेऊन लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, नांदेडमधील मुखेड, बिलोली, धर्माबाद, कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यामध्ये जोरदार वाऱ्यासह पूर्वमाेसमी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच तापमानात वाढ झाल्याने राज्यातील लातूर, नांदेड, उस्मानाबादसह पुणे, नगर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, वाशिम जिल्ह्याच्या काही भागांत दुपारनंतर ढग गोळा झाले होते. नांदेड जिल्ह्यातील सागरोळी (ता. बिलोली) परिसरात धर्माबाद तालुक्याच्या काही भागात, तसेच लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील किल्लारी परिसरात पाऊस पडला.  कोल्हापूरमधील आजरा, चंदगड, भुदरगड, कागल, गडहिंग्लज, सिंधुदुर्गमधील सावंतवाडी तालुक्यात दाट ढग गोळा झाले होते.  विदर्भात दोन दिवस वाहत असलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली होती. सातत्याने हंगामातील उच्चांकी पातळीवर असलेल्या चंद्रपूर आणि नागपूर येथे शुक्रवारी (ता. ४) तापमान ४० अंशांच्या खाली उतरले होते. विदर्भ, मराठवाड्यातही तापमानाचा पारा काहीसा घसरला होता. रविवारी (ता. ६) तापमानात पुन्हा वाढ होत विदर्भ, मराठवाड्यात तापमान ४३ अंशांच्या वर गेले आहे. अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळमध्ये ४४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. रविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारपर्यंत विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  रविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.६, नगर ४२.६, जळगाव ४३.०, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३४.५, मालेगाव ४३.६, नाशिक ३८.७, सांगली ३९.८, सातारा ४०.१, सोलापूर ४२.७, मुंबई ३४.०, अलिबाग ३६.२, रत्नागिरी ३३.०, डहाणू ३४.८, औरंगाबाद ४०.८, परभणी ४३.५६, नांदेड ४२.५, उस्मानाबाद ४१.५, अकोला ४४.२, अमरावती ४२.८, बुलडाणा ४१.१, चंद्रपूर ४५.०, गोंदिया ४४.१, नागपूर ४४.०, वर्धा ४४.०, यवतमाळ ४४.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com