राज्यात जोरदार पावसाचा अंदाज

राज्यात जोरदार पावसाचा अंदाज
राज्यात जोरदार पावसाचा अंदाज

पुणे  : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला दिलासा मिळाला. शनिवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या आहेत. आज (ता.२३) राज्यात सर्वदूर पाऊस जोर धरणार असून, अनेक ठिकाणी मुसळधारेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.          

यंदा मॉन्सूनचे आगमन खूपच लांबल्याने दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला चांगल्या पावसाची ओढ लागली आहे. मृग नक्षत्र संपून सूर्याचा शनिवारी आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होताच मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांत पावसाला सुरवात झाली. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात हलका ते जोरदार पाऊस झाला. अनेक दिवसांच्या खंडानंतर पाऊस आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. याआधीच्या पावसात लागवड केलेल्या कपाशी पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे. खरिपाच्या रखडलेल्या पेरण्या सुरू होण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा जिल्ह्यात; तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. 

शनिवारी दुपारनंतर विदर्भ, मराठवाड्यात पावसाचे ढग जमा झाले होते.  वाशीम, अकोला, बुलडाणा, वर्धा, अमरावतीसह विदर्भात शनिवारी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. बारोळ (जि. वाशीम) येथे वादळी वाऱ्यासह तर राहेरी बु. (जि. बुलडाणा) येथे  दमदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या.

शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये स्रोत : (कृषी विभाग)  : कोकण : निझामपूर २३, देवली ३८, देवरुख ६५, नाटे ६५, पाचल ७१, मीतबंब ३९, सावंतवाडी ३७, बांदा ३८, आजगाव ७१, आंबोली २४, मदुरा २१, म्हापण ३६, तालवट ५८, भेडशी ४४.  

मध्य महाराष्ट्र : होटगी ३६, बार्शी २४, पांगरी २८, दुधनी ३५, मैंदर्गी २२, वर्ये ६५, शेंद्रे ३५, बामणोली ३५, किनई ३०, पुसेगाव ३०, बुध २८, ओझर्डे ३५, गडहिंग्लज २९, महागाव ५३.   

मराठवाडा : बीड ४०, पाडळी २२, पिंपळनेर २०, मांजरसुंबा २७, जातेगाव २०, माजलगाव ४०, कित्तीडगाव २२, दिदरूड ६२, केज २२, धारूर ४९, उस्मानाबाद शहर २४, उस्मानाबाद ग्रामीण ३४, जागजी २३, तुळजापूर २५, सावरगाव २१, मंगरूळ २०, आनाळा ४३, माणकेश्‍वर ४५.  विदर्भ : मलकापूर ५१, धानोरा २०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com