राज्यात गुरुवारपासून पावसाची शक्यता

राज्यात गुरुवारपासून पावसाची शक्यता
राज्यात गुरुवारपासून पावसाची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील कमी दबाचा पट्टा पोषक ठरल्याने राज्यात गुरुवारपासून पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कोकणातील भिरा येथे उष्णतेची लाट आली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरात श्रीलंका, कोमोरीन आणि मालदीव बेटांलगत ठळक कमी दबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे तमिळनाडू आणि केरळच्या दक्षिण किनारपट्टीलगत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची; तसेच मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्रादरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, मध्य महाराष्ट्रातील चक्राकार वाऱ्याची स्थिती यात मिसळून गेली आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने गुरुवारी (दि.१५) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे; तर शुक्रवारपासून संपूर्ण राज्यात हलका पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  सूर्य तळपू लागल्याने राज्यात दिवस आणि रात्रीच्या तापमानात वाढ होत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात रात्रीच्या (किमान) तापमानात मोठी वाढ झाली;. तर ढगाळ हवामान, वादळी पावसामुळे विदर्भातील दिवसाचे तापमान घटल्याचे दिसून आले. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात कमाल तापमान ३६ अंश; तर कोकणात अनेक ठिकाणी पारा ३४ अंशांच्या वर गेला आहे. विदर्भात मात्र कमाल तापमान ३२ ते ३५ अंशांच्या जवळपास असून, तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ७ अंशांनी घट झाली. सोमवारी (दि. १२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.१, जळगाव ३७.०, कोल्हापूर ३६.०, महाबळेश्वर ३१.३, मालेगाव ३७.४, नाशिक ३६.३, सातारा ३७.०, सोलापूर ३८.३, मुंबई ३४.८, अलिबाग ३४.६, रत्नागिरी ३४.७, डहाणू ३३.६, भिरा ४२.०, औरंगाबाद ३४.६, परभणी ३६.९, नांदेड ३८.०, अकोला ३१.०, अमरावती ३०.८, बुलडाणा ३५.२, ब्रह्मपुरी ३२.९, चंद्रपूर ३४.०, गोंदिया ३५.०, नागपूर ३५.०, वर्धा ३२.०, यवतमाळ २७.५. अकोला, अमरावती, यवतमाळमध्ये  रविवार ठरला थंड दिवस राज्यात उन्हाचा ताप वाढत असतानाच, विदर्भात रविवारी (दि. ११) असलेल्या ढगाळ वातावरणामुळे दिवसाच्या तापमानात घट झाली होती. अकोला, अमरावती, यवतमाळमध्ये रविवारचा दिवस थंड ठरला. रात्रीचे तापमान १० अंशांपेक्षा अधिक असेल आणि दिवसाच्या तापमानात सरासरीपेक्षा ४.५ ते ६.४ अंशांनी घट झाल्यास तो दिवस थंड मानला जातो; तसेच कमाल तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तो दिवस अतिथंड ठरतो. रविवारी यवतमाळ येथे दिवसाच्या तापमानात ७.७ अंशांनी घट होता राज्यातील दिवसभराचे सर्वांत कमी २७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. अकोला येथे ४ मिलिमीटर; तर यवतमाळमध्ये ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com