येवल्यातील ८० हजारांवर विहिरी कोरड्याठाक

पहिल्यांदा अशा प्रकारे भयानक दुष्काळ पडला असून, विहिरी पूर्णपणे आटल्या आहेत. १९७२ च्या दुष्काळावेळेसदेखील पिण्यासाठी पाणी गावात उपलब्ध होते. परंतु या दुष्काळात विहिरींनी तळ गाठल्याने दोन महिन्यांपासून जनावरांसह माणसाचे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होतायेत. - पुंजाबा वैद्य, शेतकरी, ममदापूर, ता. येवला, जि. नाशिक
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

येवला, जि. नाशिक : ब्रिटिशकालीन अवर्षणप्रवण अन् दुष्काळी असलेल्या येवल्यातील दुष्काळाची तीव्रता यंदा भयानक आहे. उत्तर-पूर्व भागात भरपावसाळ्यातही विहिरी कोरड्याठाक राहिल्याचे चित्र यंदा होते. आजमितीस तालुक्यातील सुमारे ९९ हजार ते १ लाख विहिरींपैकी ८० हजारांवर विहिरी कोरड्याठाक झाल्या आहेत. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

राज्यातील जे ९४ अतितीव्र टंचाईग्रस्त तालुके आहे, त्यात येवल्याचे नाव अगदी वरती असून, तालुका तर दुष्काळाचे माहेरघरच बनले आहे. या वर्षी तर भरपावसाळ्यातही धो-धो पावसासाठी नागरिकांच्या नजरा कोरड्याच राहिल्या. रिमझिम सरीवरच पावसाळा संपला आणि पर्जन्याची नोंद झाली फक्त २७९ मिमी म्हणजे केवळ ६० टक्के झाली. येथील भूजलपातळी ९ मीटरपर्यंत खालावली असून, पाण्याच्या पाख्या कोरड्याच राहिल्याने हजारो विहिरींना भर पावसाळ्यातही पाणी आले नाही. पश्चिम भागातील पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात थोड्याफार विहिरींना पाणी होते, त्याही फेब्रुवारीच्या दरम्यान कोरडया झाल्या. अर्थात या भागातील १० ते २० टक्के विहिरी आज पाण्याची गरज भागवताना दिसतात. पण उत्तर-पूर्व भागातील डोंगराळ पट्ट्यात मात्र ९५ टक्के विहिरी कोरड्याच असल्याचे चित्र आहे. 

असा आहे अंदाज तालुक्याच्या अवर्षणप्रवण उत्तर-पूर्व भागात असंख्य तर पालखेड लाभ क्षेत्रात मात्र कमी प्रमाणात विहिरी आहे. गावोगावी साधारणतः एका शेतकऱ्याकडे एक ते पाचपर्यंत विहिरी असून, या हिशेबाने सायगाव, जळगाव नेउरसारख्या गावात हजार ते दोन हजार तर अंदरसूल, नगरसूल, राजापूरसारख्या मोठ्या गावांत दोन ते तीन हजारांपर्यंत विहिरी असल्याचाही एक अंदाज पाहणीतून पुढे आला आहे. तरीही सरासरी एका गावात ८०० विहिरी गृहीत धरल्या. तर तालुक्यातील १२४ गावांतील विहिरींची संख्या ९९ हजार २०० होते. यातील बोटावर मोजण्याइतक्या म्हणजे १५ ते १७  हजार विहिरींनाच तुरळक प्रमाणात पाणी आहे. उर्वरित ८० ते ८२ हजार विहिरी मात्र कोरड्याठाक असल्याचाही अंदाज व्यक्त होत आहे.

तालुक्याच्या पावसाचे वेगवेगळे आकड्यांमुळे यंदा पूर्ण दुष्काळ जाहीर करण्यापासून तालुका वंचित राहिला आहे. शासनाच्या अधिकृतरीत्या नोंदीत ५ मंडळांची एकत्रित सरासरी ४५९ मिमी असून, पडलेला पाऊस २७९ मिमी इतकाच असल्याचे वास्तव आहे. पण जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र सरासरी पर्जन्यमान ४८८ मिमी दाखवून पडलेला पाऊस ४३७ मिमी व टक्केवारी ८९.५१ मिमी दाखवली आहे. हास्यास्पद म्हणजे हे आकडे फक्त येवला शहराचे असून, यालाच तहसील व जिल्हाधिकारी प्रशासनाने तालुक्याची सरासरी म्हटले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com