अकोल्याच्या पश्चिमेकडे जोरदार पावसाची हजेरी

नगर : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात घाटघर व रतनवाडीसह अन्य भागात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे.
West of Akola The presence of heavy rain
West of Akola The presence of heavy rain

  नगर : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात घाटघर व रतनवाडीसह अन्य भागात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. गुरुवारी (ता.२२) सकाळपर्यंत चोवीस तासांत रतनवाडी येथे सव्वा आठ इंच (२०७ मिलिमीटर), तर घाटघरला साडे आठ इंच (२१२) व पांजरे येथे सव्वा आठ इंच (२१० मि.मी) पावसाची नोंद झाली. जोरदार पावसाने भंडारदरा, मुळा व निळवंडे धरणात पाण्याची जोरदार आवक होत आहे. भंडारदरा धरणात चोवीस तासांत जवळपास पाऊण टीएमसी पाणी आले आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात आज दिवसभर रिमझिम सुरू होती.

जिल्ह्यात यंदा बहुतांश भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अजूनही धरण क्षेत्रामध्ये फारसा पाऊस झालेला नाही. अकोले तालुक्यातील पश्‍चिम आदिवासी भागात तीन- चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणात पाण्याची आवक होत आहे.

भंडारदरा धरणात तब्बल सहा टक्के, तर निळवंडे आणि मुळा धरणात दोन टक्के पाणीसाठा वाढला आहे. कोतुळ जवळ मुळानदी १६७५० क्युसेकने वाहत होती. रतनवाडी येथे २०७, घाटघरला २१२, पांजरे येथे २१०, भंडारदरा येथे १९०, वाकी येथे १६०, निळवंडे येथे १६ मि.मी पाऊस झाला.

भंडारदरा परिसरात डोंगरावरून धबधबे कोसळू लागले आहेत. काही ठिकाणी भातआवणीच्या कामांना वेग आला आहे. कृष्णावंती नदीला पूर आला आहे. वाकी प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहे. रंधा धबधबा कोसळू लागला आहे. मुळा पाणलोटात हरिश्चंद्रगड, आंबीत, पाचनई, कुमशेत परिसरात संततधार सुरू आहे. आंबीत, पिंपळगाव खांडपाठोपाठ कोथळे धरण ‘ओव्हर-फ्लो’ झाले आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात बुधवार रात्रीपासून संततधार सुरू होती.

‘नांदूर माध्यमेश्वर’तून गोदावरीत ६,३१० क्युसेक विसर्ग

दरम्यान गुरुवारी सकाळी १० वाजता नाशिक जिल्ह्यातील नांदूर माध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात ६,३१० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात मान्सून कालावधीत प्रथमच पाणी सोडण्यात आले. त्यामुळे कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील नदी लगतच्या गावातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com