ठाकरे सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा !

ठाकरे सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा !
ठाकरे सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा !

मुंबई: उद्धव ठाकरे सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर सोमवारी (ता.३०) पार पडला. विधानभवनाच्या प्रांगणात महाविकास आघाडीच्या ३६ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यामध्ये २६ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अवघ्या दीड महिन्यात दोनदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. नव्या विस्तारात राष्ट्रवादीच्या वाट्याला १४, शिवसेनेला १२, तर काँग्रेसच्या वाट्यातील १० मंत्र्यांनी शपथ घेतली. 

अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, आदित्य ठाकरे यांच्यासह ३६ मंत्र्यांचा शपथविधी झाला. मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांनी प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला असला, तरी ठाकरे सरकारवर पश्चिम महाराष्ट्राचाच वरचष्मा दिसून येतो. तसेच ग्रामीण भागाला झुकते माप देतानाच अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांना संधी देत नव्या-जुन्यांची सांगड घालण्यात आली आहे. सर्व जाती-धर्माच्या आमदारांना सरकारमध्ये स्थान देण्याचा प्रयत्न करतानाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने चार मुस्लिम आमदारांनाही मंत्रिपदाची संधी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये तीन महिला आमदारांनाही मंत्रिपदी संधी मिळाली आहे. 

दरम्यान, फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलेल्या पाच दिग्गजांना शिवसेनेने नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. तसेच या वेळी शिवसेनेने विधान परिषदऐवजी विधानसभेतील आमदारांना मंत्रिमंडळात प्राधान्य देत गेल्यावेळची चूक दुरुस्त केल्याचे बोलले जाते.  विस्तारामध्ये राष्ट्रवादीला १० कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदे मिळाली आहेत. शिवसेनेला ८ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदे तर काँग्रेसला ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रिपदे मिळाली आहेत. आतापर्यंत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे मुख्यमंत्र्यांसह १५, उपमुख्यमंत्र्यांसह १६ आणि १२ इतके मंत्री दिसणार आहेत. शिवसेनेने मागील सरकारमध्ये मंत्री असलेले एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, संजय राठोड, दादा भुसे या मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. 

किंबहुना संजय राठोड, दादा भुसे यांना कॅबिनेटपदी बढती दिली आहे. तर गेल्या सरकारमधील मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ. तानाजी सावंत आणि राज्यमंत्री दीपक केसरकर, रवींद्र वायकर यांना शिवसेनेने वगळले आहे. गेल्या सरकारमधील विजय शिवतारे, जयदत्त क्षीरसागर यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने विधान परिषदेतील आमदार अॅड. अनिल परब यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे, तर सुभाष देसाई यांना यापूर्वीच मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यामुळे विधान परिषदेतील दोन आमदारांचा समावेश शिवसेनेने मंत्रिमंडळात केल्याचे दिसून येते. तर काँग्रेसने विधान परिषदेचे आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांना राज्यमंत्रिपदाची संधी दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये विधान परिषदेतील फक्त हे तीनच आमदार आहेत. शिवसेनेने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही कॅबिनेट मंत्रीपदी काम करण्याची संधी दिली आहे. त्यानिमित्ताने मंत्रिमंडळात वडील आणि मुलगा एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे. काँग्रेसने वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रिपदी तर राष्ट्रवादीने तरुण आमदार आदिती तटकरे यांना राज्यमंत्रिपदी संधी दिली आहे. शिवसेनेने एकाही महिलेला संधी दिलेली नाही. 

मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांनी प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला असला तरी ठाकरे सरकारवर पश्चिम महाराष्ट्राचाच वरचष्मा दिसून येतो. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक तेरा मंत्री, पाठोपाठ अकरा मंत्री मुंबईसह कोकणातील आहेत. त्याशिवाय मराठवाड्यातील सहा, विदर्भ आठ आणि उत्तर महाराष्ट्रातील चार मंत्री ठाकरे सरकारमध्ये काम करताना दिसणार आहेत. 

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने चार मुस्लिम आमदारांनाही मंत्रिपदाची संधी दिली आहे. महाविकास आघाडीचे सरकार अल्पसंख्याक समाजासोबत आहे हा संदेश या माध्यमातून तिन्ही पक्षांनी दिला आहे. शिवसेनेने अब्दुल्ल सत्तार यांना राज्यमंत्री, राष्ट्रवादीने हसन मुश्रीफ आणि नवाब मलिक यांना तर काँग्रेसने अस्लम शेख यांना कॅबिनेटपदी संधी दिली आहे. 

शंकरराव गडाख यांना शिवसेनेच्या स्वतःच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. २००९ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार म्हणून निवडून आलेले गडाख २०१९ मध्ये नेवासा मधून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. शिवसेनेने अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनाही राज्यमंत्रिपदी संधी दिली आहे. 

काँग्रेसचे नेते के. सी पाडवी यांनी शपथविधीनंतर मनोगत व्यक्त केल्यानंतर राज्यपाल श्री. कोश्यारी त्यांच्यावर भडकल्याचे पाहायला मिळाले. राज्यपालांनी त्यांना पुन्हा एकदा शपथ घ्यायला लावली. पाडवी हे १९९५ पासून सलग सातवेळा अक्कलकुवा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. 

शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पत्नी प्रतिभाताई पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व मंत्र्यांचे कुटुंबीय, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  पक्षनिहाय नवनियुक्त मंत्री आणि राज्यमंत्री -  राष्ट्रवादी काँग्रेस  अजित पवार (उपमुख्यमंत्री)ः बारामती (पुणे)  दिलीप वळसे पाटील : आंबेगाव (पुणे)  धनंजय मुंडे ः परळी (बीड)  अनिल देशमुख ः काटोल (नागपूर)  हसन मुश्रीफ ः कागल (कोल्हापूर)  राजेंद्र शिंगणे ः सिंदखेड राजा (बुलडाणा)  नवाब मलिक ः अणूशक्तिनगर (मुंबई)  राजेश टोपे ः उदगीर (लातूर)  जितेंद्र आव्हाड ः मुंब्रा कळवा (ठाणे)  बाळासाहेब पाटील ः कराड उत्तर (सातारा)  दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) ः इंदापूर (पुणे)  आदिती तटकरे (राज्यमंत्री) ः श्रीवर्धन (रायगड)  संजय बनसोडे (राज्यमंत्री)ः उदगीर (लातूर)  प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) ः राहुरी (अहमदनगर)  यापूर्वी जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 

शिवसेना  संजय राठोड ः दिग्रस (यवतमाळ)  गुलाबराव पाटील ः जळगाव ग्रामीण (जळगाव)  दादा भुसे ः मालेगाव बाह्य (नाशिक)  संदीपान भुमरे ः पैठण (औरंगाबाद)  अनिल परब ः मुंबई (विधान परिषद)  उदय सामंत ः रत्नागिरी (रत्नागिरी)  आदित्य ठाकरे ः वरळी (मुंबई)  शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) ः नेवासा (अहमदनगर)  अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) ः सिल्लोड (औरंगाबाद)  शंभूराज देसाई (राज्यमंत्री) ः पाटण (सातारा)  बच्चू कडू (राज्यमंत्री) (प्रहार जनशक्ती) ः अचलपूर (अमरावती)  राजेंद्र यड्रावकर (राज्यमंत्री) ः शिरोळ (कोल्हापूर)  यापूर्वी सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 

काँग्रेस  अशोक चव्हाण ः भोकर (नांदेड)  के. सी. पाडवी ः अक्कलकुवा (नंदुरबार)  विजय वडेट्टीवार ः ब्रह्मपुरी (चंद्रपूर)  अमित देशमुख ः लातूर शहर (लातूर)  सुनील केदार ः सावनेर (नागपूर)  यशोमती ठाकूर ः तिवसा (अमरावती)  वर्षा गायकवाड ः धारावी (मुंबई)  अस्लम शेख ः मालाड पश्चिम (मुंबई)  सतेज पाटील (राज्यमंत्री) ः कोल्हापूर (विधान परिषद)  डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) ः पलुस कडेगाव (सांगली)  यापूर्वी बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com