ओल्या हळदीपासून २४ तासांत पावडर

औरंगाबाद येथील सुशील सर्जेराव शेळके यांच्या ‘एस ४ फूड्स’साठी ‘ॲग्री इंडिया हॅकाथॉन’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये ‘काढणीपश्‍चात, अन्न तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धन’ या गटात पुरस्कार जाहीर झाला आहे.
ओल्या हळदीपासून २४ तासांत पावडर
ओल्या हळदीपासून २४ तासांत पावडर

अकोला ः औरंगाबाद येथील सुशील सर्जेराव शेळके यांच्या ‘एस ४ फूड्स’साठी ‘ॲग्री इंडिया हॅकाथॉन’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये ‘काढणीपश्‍चात, अन्न तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धन’ या गटात पुरस्कार जाहीर झाला आहे.   ॲग्री इंडिया हॅकाथॉन स्पर्धेत पाच वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सहा हजार स्टार्टअप सहभागी होते. त्यातून दुसऱ्या फेरीत २०० स्टार्टअप पोहोचले, तर तिसऱ्या फेरीत पोचलेल्या ६० स्टार्टअप पैकी २४ स्टार्टअपची निवड करण्यात आली. या २४ स्टार्टअपमध्ये ‘काढणीपश्‍चात, अन्न तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धन’ या गटामध्ये फुलंब्री, जि. औरंगाबाद येथील एस. ४ फूड्‍सचे संचालक सुशील शेळके यांचा समावेश आहे. पुसा कृषी, आयएआरआय यांच्या मार्फत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत या विजेत्यांना एक लाख रुपये पुरस्कार दिला जाणार आहे. सोबतच या स्टार्टअपच्या वाढीसाठी इनक्युबेटर प्रक्रिया आणि उद्योग विकासाच्या अन्य बाबींसाठी २५ लाख रुपयांपर्यंतचे साह्य वेगवेगळ्या मार्गाने उपलब्ध होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. संजय भोयर व सहकारी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या ओल्या हळदीपासून २४ तासांमध्ये काप किंवा भुकटी बनवण्याच्या तंत्रज्ञानावर आधरित हा उद्योग आहे. शेतीमाल संशोधन केंद्रामध्ये विकसित या तंत्रज्ञानाला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाल्यामुळे कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, संशोधकांचे मनोबल उंचावले आहे.   प्रतिक्रिया... २०१४-१५ मध्ये करार करून सदर तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यानंतर २०१७ मध्ये औरंगाबादमध्ये डॉ. संजय भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग सुरू केला. दोन हंगाम पूर्ण क्षमतेने उद्योग चालवत असून, यंदा तिसरा हंगाम सुरू आहे. राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाकडे अनुदानासाठी केलेला अर्ज केवळ तांत्रिक कारणामुळे फेटाळला गेला होता. मात्र या स्पर्धेतील पुरस्कारामुळे आनंद झाला आहे.  - सुशील शेळके, ८०८७१४६६५४ पारंपरिक हळद प्रक्रियेमध्ये बॉयलरमध्ये हळद शिजवून पुढे सूर्यप्रकाशात १५ ते २० दिवस वाळवली जाते. परिणामी, त्यातील कुरकुमीनचे प्रमाण कमी होते. नव्या तंत्रज्ञानामध्ये स्वच्छ केलेल्या हळदीचे काप वाफेशी प्रत्यक्ष संपर्क येऊ न देता प्रक्रिया केली जाते. त्यानंतर नियंत्रित तापमानात ड्रायरमध्ये वाळवले जाते. त्यानंतर त्याची भुकटी केली जाते. ओली हळद ते भुकटी ही प्रक्रिया केवळ २४ तासांत पार पडते. या प्रक्रियेद्वारे तयार भुकटीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ४ ते ६ टक्क्यांपर्यंत राहते.  - डॉ. संजय भोयर, ९९२१९५८९९९  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com