agriculture news in Marathi, what is option for Glyphosate, Maharashtra | Agrowon

‘ग्लायफोसेट’ला पर्याय काय?
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

‘ग्लायफोसेट’ बिनानिवडक प्रकारातील तणनाशक आहे. पानांतील हरितलवक ते नष्ट करत असल्यामुळे उभ्या पिकांतील तण नियंत्रणासाठी त्याचा वापर करता येत नाही. धुरे, बांध, पिके नसलेली जमीन आदी ठिकाणी वापर अपेक्षित आहे. श्रीलंका देशात चहामळ्यात वापराची शिफारस आहे. काही पिकांत लव्हाळी आदी तणांच्या नियंत्रणासाठी नॅपसॅक पंपाच्या नोझलला हूड लावून पिकाच्या पट्ट्यामध्ये अत्यंत काळजीपूर्वक त्याची फवारणी केली जाते. 
- डॉ. डब्लू. एन. नारखेडे, कृषिविद्या विभाग प्रमुख,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी 
 

पुणे ः ग्लायफोसेट मानवी आरोग्य व पर्यावरणाला कितपत सुरक्षित आहे, हा मुद्दा चर्चेत आला असला तरी मजूरटंचाईवर सद्यस्थितीत दुसरा पर्याय नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा उपयोग किंवा गरज महत्त्वाची वाटते आहे. मजूरटंचाई, वाढता मजूर खर्च, हवामान आदी बाबींनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसमाेर तण नियंत्रणासाठी ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाला दुसरा ठोस पर्याय काय, हा प्रश्न उभा ठाकला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याचा अभ्यास महत्त्वाचा असल्याच्या मुद्यावर विविध घटकांचे एकमत आहे. 

तणनाशक शेतकऱ्यांसाठी गरजेचेच
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी म्हणाले, की मी स्वतः शेतकरी अाहे. त्यामुळे तणांच्या नियंत्रणासाठी आम्हाला तणनाशकांची अत्यंत गरज आहे. एकतर मजूर वेळेवर उपलब्ध होत नाहीत. मजूरीही महाग आहे. त्याच्या कितीतरी कमी किमतीत तणनाशकामुळे काम होऊन जाते. ‘ग्लायफोसेट’ किंवा कोणतेही तणनाशक असो, मानवी आरोग्य, पर्यावरण, जिवाणू यांना ते सुरक्षित आहे, याची खात्री केल्याशिवाय त्याला संमती मिळणार नाही हे निश्चित आहे. ‘ग्लायफोसेट’ हे कर्करोगाला पूरक आहे, असा कोणताही पुरावा भारतात मिळाल्याचे एेकिवात नाही. अमेरिकेसारख्या देशात जिथे शौचकुपासाठी वापरावयाचे पाणीदेखील पिण्याच्या पाण्याएवढेच स्वच्छ असावे, अशी काळजी घेतली जाते. त्या देशातील सरकार आपल्या नागरिकांच्या आरोग्याबाबत असे बेफिकीर असतील यावर सहज विश्वास बसत नाही.  अमेरिकेतील दिवाणी न्यायालयातील निकाल ज्युरींच्या (न्यायालयातील पंच) मतांवर जास्त अवलंबून असतात. उच्च न्यायालयात निकालांची तपासणी शास्त्रीय निकषांवर झाल्यानंतरच ‘ग्लायफोसेट’ घातक आहे किंवा नाही हे सिद्ध होऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.  

जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील दिलेला ताजा अहवाल विचारात घेणे महत्त्वाचे ठरेल. ‘ग्लायफोसेट’मुळे कर्करोग होणे असंभवनीय असल्याचे त्यात म्हटले आहे. 
   
अनेक वर्षांपासून वापरतोय 
मालेगाव-नेरळ (ता. कर्जत, जि. रायगड) येथील प्रयोगशील शेतकरी शेखर भडसावळे म्हणाले, की माझ्या शेतात गेल्या १० वर्षांपासून ‘ग्लायफोसेट’ वापरत आहे. माझे कोल्हापूर येथील मित्र प्रताप चिपळूणकरदेखील २० वर्षांपासून त्याचा वापर करीत आहेत. देशातील मोठे भाजीपाला निर्यातदार ३० वर्षे त्याचा वापर करीत आहेत. आमच्यापैकी कोणालाही कोणत्याच प्रकारचा त्रास, अपाय त्यापासून जाणवलेला नाही. आमच्यापैकी कोणीही ‘ग्लायफोसेट’चा वापर पीक उभे असताना करीत नाही. फक्त मुख्य पीक काढून घेतल्यानंतरच तो होतो. सात वर्षे ‘ग्लायफोसेट’ वापरलेल्या शेतांतील तांदूळ व वाल यांची पुण्यातील मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमधून ७००० रूपये प्रति नमुना याप्रमाणे ‘ग्लायफोसेट’सह २०१ निकष (पॅरामीटर्स) तपासून घेतले. सर्व काही अटी व नियम पातळीत आहेत. हेच खऱ्या अर्थी विषमुक्त अन्न होय. 

गांडूळांविषयी अनुभव 
श्री. भडसावळे म्हणतात, की माझ्या सात वर्षांच्या संशोधनामध्ये असे आढळले आहे, की कोणत्याही पडीक जागेवर किंवा शेतामध्ये गांडूळे यायला पाहिजे असतील तर ‘ग्लायफोसेट’ फवारावे. सुमारे १५ दिवसांच्या आत तेथे गांडूळ येतात. हे निष्कर्ष मी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठ, रोम येथील एफएओ. स्वित्झर्लंडमधील झुरिक, थायलंडमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत वेगवेगळ्या वेळी शास्त्रज्ञांसमोर मांडून त्यांना पटवून दिले आहेत. आपणही हा साधा प्रयोग करून पाहू शकता. पडीक माळरानावर जेथे एक ते दीड फूट गवत किंवा तण उगवले आहे परंतु तेथे गांडूळ नाहीत किंवा अत्यल्प आहेत अशा ठिकाणी १-२ गुंठे जागेवर योग्य प्रमाणात ‘ग्लायफोसेट’ फवारावे. फवारलेल्या जागी १५ दिवसांनी विपुल प्रमाणात गांडूळे येतात. शेजारच्या न फवारलेल्या ठिकाणी गांडूळांचे प्रमाण विशेष करून जाणवत नाही.  

‘एसआरटी’ तंत्र वापरणाऱ्यांना झाले फायदे 
‘एसआरटी’ हा सर्वसमावेशक शेती तंत्र पद्धतीचा वापर करणाऱ्या आम्हा दोन हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पुढील समान गोष्टी आढळून आल्या आहेत. जमिनीच्या सेंद्रिय कर्बात जलद व निश्चित वाढ, जमिनी मऊ होऊन वर्षभर मृदगंध येऊ लागला. शेतीतील कष्ट कमी होऊन, हमखास कोणत्याही परिस्थितीत उत्पादन वाढवणारी व आनंददायी अशी सहज प्रवृत्ती निर्माण झाली. आमच्या शेतातील काठेमाठ, घोळू, हरळी, रेशीमफुल, आंबटढोल (पोपेटी), लव्हा, अमरवेल, कॉंग्रेस गवत आदी चिवट तणे हद्दपार झाली. ‘ग्लायफोसेट’वर जगभर बंदी आणण्यासाठी एकाएकी जोर होताना दिसत असलेले प्रयत्न हे फार मोठ्या स्वार्थापोटी जन्मलेले षडयंत्र आहे, असे माझे ठाम मत आहे. ‘ग्लायफोसेट’वर बंदी घालून तत्सम दुसरे उत्पादन कैकपटीने अधिक किंमतीला विक्रीसाठी आणण्याचा हा प्रयत्न असावा.

पर्यावरणाला हानिकारक 
भारतात ‘ग्लायफोसेट’चे लेबल क्लेम हे केवळ चहा बागेसाठी आहे. ‘ग्लायफोसेट’ फवारल्यास तलाव, नदी, विहिरीतील पाण्यात ते मिसळेल. त्यामुळे मानवी आरोग्यासह पर्यावरणालाही धोके निर्माण होऊ शकतील. या शक्‍यतेमुळेच सरकारी पातळीवर एचटी तंत्रज्ञानाच्या प्रसारास मान्यता दिली गेली नाही, असे नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांनी सांगितले.                    

दूरगामी परिणाम करणारे ‘ग्लायफोसेट’ 
राष्ट्रीय कीडनाशक माहिती केंद्र (नॅशनल पेस्टीसाईड इन्फाॅर्मेशन सेंटर) यांच्या अभ्यासात आढळले आहे की कांदा, गाजर, मुळा, पालक अशा शेतात ‘ग्लायफोसेट’चे अंश पिकांमध्ये सहज शिरकाव करतात. मानवात हे तणनाशक सहजपणे त्वचेतून आंतरप्रवाही होत नाही. परंतु लस किंवा तोंडावाटे शरीरात लवकर आंतरप्रवाही होते. त्याचे दूरगामी परिणाम पक्षी, मासे व अन्य प्राणीमात्रांवर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचे अवशेष जमिनीत अधिक काळ राहतात. जमिनीतील जिवाणूंचे प्रमाण कमी होऊन सेंद्रिय कर्बाची पातळी खालावली जाते. 

आईस्क्रीममध्ये आढळले अंश
नायकवाडी म्हणाले, की अमेरिकेतील प्रसिद्ध जेम ॲण्ड बेरी या आईस्क्रीम कंपनीच्या उत्पादनांमध्ये ‘ग्लायफोसेट’चे अंश आढळले. संपूर्ण अमेरिकेत त्याचे मोठे पडसाद उमटले. तेथील कृषी विभागाने (यूएसडीए) आयात होणाऱ्या प्रत्येक कच्च्या किंवा प्रक्रियायुक्त मालाची ‘ग्लायफोसेट’च्या अनुषंगाने चाचणी सक्तीची केली. तेथील शास्त्रज्ञ डॉ. स्टेफनी सेनेफ यांनी किडनी निकामी होणे, गर्भपात, वांझपणा, लठ्ठपणा, ऑटिझम, नैराश्य, अल्झायमर, पार्किन्सन आणि कर्करोग आदी रोगांसाठी हे तणनाशक कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. 

वापर काळजीपूर्वकच 
महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे म्हणाले, की आपल्याकडे ‘ग्लायफोसेट’चा वापर सरसकट क्षेत्रात न करता तो ठरावीक क्षेत्रात केवळ लव्हाळा, हराळी तणांच्या नियंत्रणासाठीच काळजीपूर्वक केला जातो. त्यातही पिकाच्या वाढीची महत्त्वाची अवस्था, हवामान या बाबीही लक्षात घेऊन त्याचा वापर करण्याकडे त्याचा कल असतो. अलीकडील काळात मजुरीची समस्या तीव्र झाली आहे. खर्चही वाढला आहे. ते वेळेवर उपलब्ध होणे दुरापास्त झाल्याने शेतकऱ्यांना तणनाशकाचा वापर करण्याशिवाय पर्याय नसतो.    

भारताला फायदेशीर नाही
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर म्हणाले, की अमेरिकेसारख्या देशात शेतकऱ्यांचे फार्म्स हजारो एकरवर असतात. तेथे ‘ग्लायफोसेट’ तणनाशकाला प्रतिकारक एचटी बियाणे तंत्रज्ञान फायदेशीर असेलही; परंतु कमी जमीनधारणा असलेल्या व मिश्रपिकांचा ‘पॅटर्न’ असलेल्या भारतासारख्या देशात हे तंत्रज्ञान उपयोगाचे नाही. या तंत्राद्वारे उत्पादकतेबरोबर उत्पन्नही वाढायला हवे; परंतु आपल्याकडे बीटीबाबत तसे का झाले नाही? या वर्षी कपाशीची अडीच, तीन क्‍विंटल प्रतिएकर एवढीच उत्पादकता मिळाली आहे. सरळ वाणांचीदेखील इतकीच किंवा यापेक्षा जास्त उत्पादकता मिळते अशी निरीक्षणे आहेत.

सेंद्रिय शेतीत मनाई  
सेंद्रिय क्षेत्रातील तज्ज्ञ व प्रमाणीकरण अधिकारी प्रशांत नायकवाडी म्हणतात, की सेंद्रिय क्षेत्रातील आयफॉम ही आंतरराष्ट्रीय संस्था तसेच भारतीय सेंद्रिय राष्ट्रीय  कार्यक्रमाच्या मानकांप्रमाणे (एनपीअोपी) ‘ग्लायफोसेट’ किंवा अन्य रासायनिक तणनाशक वापरण्यास मनाई आहे. नाशिक जिल्ह्यात  येवला तालुक्यात ‘ग्लायफोसेट’चा वापर ज्या शेतात केला तेथे कांदा घेतल्यानंतर मुळे फुटतात त्या जागी तडकल्याचे आढळले आहे. ‘ग्लायफोसेट’चे अंश कांदा पिकाच्या पेशीत जाऊन पेशीभित्तिका तडकल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

प्रतिक्रिया
माझी २८ एकर शेती आहे. पाऊस पडून गेल्यानंतर तणांचा प्रादुर्भाव होतो. पावसाने उघडीप दिल्यानंतर डवरणी करावी लागते. त्यावर एकरी सरासरी एक हजार रुपयांचा खर्च होतो. मजुरांमार्फतदेखील तण काढण्याची वेळ येते. कपाशीसाठी एकरी सहा हजार रुपयांचा खर्च त्यासाठी होतो. हंगामात सात हजार रुपयांचा खर्च केवळ तण व्यवस्थापनावर शेतकऱ्यांना करावा लागतो. तणनाशकाचा वापर केल्यास हा खर्च खूप कमी होतो. तणनाशकाची किंमत व फवारणीसाठी मजूरीखर्च हा तुलनेने आटोक्यातील असताे. दिवसभरात एक मजूर सुमारे १५ पंप फवारतो. भांगलणीऐवजी तणनाशकाची फवारणी फायद्याची ठरते. 
- प्रकाश पुुप्पलवार, कापूस उत्पादक, खैरगाव देशमुख, जि. यवतमाळ

उसात ‘ग्लायफोसेट’चा वापर कमीच झाला आहे. ज्यावेळी खूप पाऊस येतो, तणांचा प्रादुर्भाव आटोक्याबाहेर जातो त्यावेळीच शेतकरी तणनाशकाचा पर्याय निवडतो. पूर्वी मोकळ्या जमिनीतील तण खांदून काढले जायचे. पण आता मजूरबळ मिळेनासे झाले आहे ही मोठी समस्या शेतकऱ्यापुढे आहे. अमेरिकेतील शेतकऱ्याला तणनाशकामुळे कर्करोग झाल्याबद्दल अमेरिकी कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागली हे आम्ही वाचले. हे तणनाशक खरोखरच घातक आहे काय याचा अभ्यास निश्चित करावा लागेल. 
- संजीव माने, प्रयोगशील ऊस उत्पादक, आष्टा, जि. सांगली  

‘ग्लायफोसेट’ मानवी आरोग्यास हानिकारक आहे, असे वाचले. आज इतक्या वर्षांनतर त्यावर बंदी घालावी का लागते आहे. आधी तंत्रज्ञान द्यायचं आणि मग त्यात चुका, नुकसान शोधायचं असं का? माझा अनुभव आणि माहितीनुसार हे तणनाशक केवळ हिरव्या वनस्पतीवरच कार्य करते. मातीत मिसळल्यानंतर ते अकार्यक्षम होते. त्याची गढूळ पाण्यासोबत फवारणी केली ते चांगल्या प्रकारे कार्यक्षम राहात नाही असा माझा अनुभव आहे. या तणनाशकाच्या तुलनेत अन्य तणनाशके महागडी आहेत. त्यामुळे ती बहुतेक शेतकऱ्यांच्या खिशाला परवडत नाहीत. मी हळदीसारख्या पिकात अत्यंत संरक्षित पद्धतीने या तणनाशकाचा वापर करतो. त्यामुळे मजूर खर्चात चांगलीच बचत होते. हे तणनाशक माझ्यासारख्या शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे वाटते. तज्ज्ञ त्याच्या परिणामांबाबत खातरजमा करतीलच.  
- विजय इंगळे, कापूस उत्पादक, चितलवाडी, जि. अकोला

इतर अॅग्रो विशेष
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
एफआरपीची जुळवाजुळव करताना यंदाही कसरतचकोल्हापूर : गेल्या वर्षी वेळेत साखर विक्री न...
स्वतःच्या गरजेनुसार यंत्रांची केली...बदलत्या काळात शेतीत मजुरांची संख्या कमी झाली....
व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल...पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम...
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक...नांदेड  ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात...
पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३...पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे...
पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी...अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने...
उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबकेकोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील...
राजू शेट्टीं थेट काश्‍मीरात;...कोल्हापूर : काश्मीरमधील सफरचंद, अक्रोड, केशर...
खरीप पिकांसाठी आठ हजार तर, फळबागांसाठी...मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने नुकसान...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा कायमपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात...
बांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...
पर्यावरण संवर्धन, लोक शिक्षणामध्ये ‘...अकोला, वाशीम जिल्ह्यांतील सुमारे तीस...
सत्ता अन् जीवन संघर्षराज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २२ दिवस...
नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस...
गडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा...गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या...
काटेकोर शेतीत द्राक्ष उत्पादक अग्रेसर:...पुणे : कष्ट व कौशल्याच्या बळावर कोणताही आकार आणि...
चीनमधील संत्रा खरेदीदारांचे शिष्टमंडळ...नागपूर ः चीनची बाजारपेठ मोठी असल्याने संत्रा...
रसायने, कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर...नवी दिल्ली: रसायने आणि कीडनाशकांचा अतिरेकी...