गडकरींनी ‘त्या’ पत्रात पंतप्रधानांना काय सांगितले?

गडकरींनी ‘त्या’ पत्रात पंतप्रधानांना काय सांगितले?
गडकरींनी ‘त्या’ पत्रात पंतप्रधानांना काय सांगितले?

पुणे : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या वादग्रस्त व्यवस्थापकीय संचालकांच्या बदलीस कारणीभूत ठरलेल्या ‘त्या’ पत्राची चर्चा अजूनही सुरू आहे. हे पत्र केंद्रीय मंत्र्याने थेट पंतप्रधानांना पाठविले होते. नवे ‘एमडी’ झालेले बी. श्रीनिवास यांच्याकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  केंद्रातील वजनदार मंत्री असलेले नितीन गडकरी हे प्रशासनकुशल लोकप्रतिनिधी समजले जातात. शक्यतो कोणत्याही ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या बदलीबाबत थेट पंतप्रधानांकडे त्यांनी कधी साकडे घातल्याची चर्चा कृषी खात्यात नाही. मात्र फलोत्पादन मंडळाचे (एनएचबी) एमडी डॉ. एम. अरिझ अहमद यांचे नाव घेऊन कारवाईची थेट लेखी मागणी श्री.गडकरी यांनी पत्रात केल्याचे दिसते. यावरून एनएचबीमध्ये किती टोकाचा गोंधळ सुरू आहे याचा अंदाज बांधता येतो.  मंत्री गडकरी या पत्रात म्हणतात, “केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. ग्रीन हाउस मन्युफॅक्चरर्स असोसिएशनकडून निवेदनात मांडल्या गेल्या आहेत. देशातील शेतकऱ्यांना मंडळाकडून अनुदान मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत.” अनुदान वाटपाची एनएचबीची प्रक्रिया डॉ. अहमद आल्यानंतर डळमळीत झाल्याचे या पत्रातून स्पष्ट होते. “अनुदानाची प्रक्रिया गेल्या वर्षीपर्यंत सुरळीतपणे सुरू होती. मंडळाची अनुदान वाटपाची प्रक्रिया व त्यासाठी लागणारे कागदपत्रे देखील सुटसुटीत होते. मात्र २०१८ पासून ही पध्दत किचकट बनविण्यात आली आहे,” असे गडकरी यांनी म्हटले आहे.  डॉ. अहमद यांच्यावर थेट शरसंधान करताना या पत्रात म्हटले आहे, की मी आणखी एका समस्येकडे  लक्ष वेधू इच्छितो. अनुदानाबाबतचे प्रस्ताव थकीत   आहे त्याला मंडळाचे एमडी डॉ. अहमद यांचा हेकेखोरपणा जबाबदार आहे. त्यांना या पदावरून   बदली हवी असल्याने ते शेतकऱ्यांचा छळ करीत  आहेत. शेतकऱ्यांना छळणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.” मुंबईमधील गौतम चोकसी यांनी देखील  एनएचबीच्या आडमुठे कारभाराबाबत गडकरी  यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीचा  उल्लेख देखील त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. “चोकसी यांचे अनुदानाचे प्रकरण बंद करून ठेवण्यात आले आहे. ते पुन्हा उघडण्याची गरज आहे. या पत्रासोबत पाठवित असलेल्या निवेदनातील मुद्दे     लक्षात येता शेतकऱ्यांना होत असलेल्या समस्येचा अंदाज येईल,” असे पत्रात नमूद करण्यात आलेले   आहे.  सूत्रांच्या म्हणण्यानुसार गडकरी यांनी सदर पत्र तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना पाठविले होते. मात्र या अधिकाऱ्याचे कारनामे पंतप्रधानांकडे पोहोचविण्यासाठी पत्राची प्रत पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांना देण्यात आली.  दरम्यान, मंत्री गडकरी यांनी थेट तक्रार करून देखील एनएचबीच्या एमडीची बदली होण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी गेला. केंद्र शासनाने डॉ. अहमद यांच्या बदली पत्रात त्यांच्याविषयीच्या नकारात्मक कामाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. “आसामच्या आयएएस केडरचे डॉ. अहमद आहेत. आसाम शासनाने त्यांना परत बोलावले आहे. त्यामुळे त्यांची एनएचबीतून आसामला बदली करण्यात आली आहे,” असे या बदली आदेश पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com