पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार हेक्टरने घटले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी हंगामात गव्हाच्या पेरण्यांना उशिरा सुरवात झाली. त्यामुळे गव्हाच्या पेरणी क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत ४१ हजार ४४४ हेक्टरने घट झाली आहे. पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ६३ हजार ८५४ हेक्टर असून त्यापैकी अवघ्या २२ हजार ४१० हेक्टरवर म्हणजेच ३५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या बागायती भागातील गव्हाचे पीकवाढीच्या अवस्थेत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, पुरंदर, बारामती, जुन्नर, खेड हे तालुके गव्हाच्या उत्पादनासाठी ओळखले जातात. दरवर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात याभागातील शेतकरी गव्हाची पेरणी करतात. त्यासाठी आॅक्टोबर महिन्यात तयारी केली जाते. यंदा पावसाळ्यात शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, खेड या तालुक्यांत कमी पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा तयार झाला नाही. परिणामी बहुतांशी शेतकऱ्यांनी कोरड्या जमिनीत पेरणी केल्यानंतर पाणी दिले आहे. त्यामुळे गव्हाची उगवण बऱ्यापैकी झाली. त्यातच अनुकूल थंडीमुळे बागायती भागातील गव्हाची स्थिती बरी आहे. सध्या हे पीकवाढीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी गहू ओंब्यांच्या अवस्थेत आहे. जिरायती भागातील गव्हाची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. 

जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा हे तालुके भात पिकासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु, अनेक शेतकरी भाताची काढणी केल्यानंतर पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू लागवडीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे या भागात गव्हाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ होऊ लागली आहे. यंदा भोरमध्ये ११९०, मावळात ४९०, मुळशीत २३० तर वेल्हे तालुक्यात २२० हेक्टरवर गव्हाची पेरणी झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सर्वाधिक गव्हाची पेरणी जुन्नर तालुक्यात झाली आहे. या तालुक्यात सुमारे ४८१० हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. येत्या एक ते दीड महिन्यांत काही भागातील गहू काढणीस येईल.    

तालुकानिहाय झालेली गव्हाची पेरणी (हेक्टर)
तालुका  पेरणी क्षेत्र
हवेली  ५९० 
मुळशी  २३०
भोर ११९०
मावळ  ४९०
वेल्हे २२०
जुन्नर ४८१० 
खेड ११३०
आंबेगाव ५२०
शिरूर १४००
बारामती १६८०
इंदापूर २७२०
दौंड ४०६०
पुरंदर ३३७०
एकूण २२,४१० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com