देशात गव्हाची पेरणी वाढली

पेरणी
पेरणी

नवी दिल्ली ः देशातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती असूनही पोषक वातावरणामुळे यंदा गव्हाची पेरणी वाढली आहे. देशात गहू हे रब्बीतील महत्त्वाचे पीक आहे. यंदा गव्हाच्या पेरणीत ५८.७ टक्के वाढ झाली आहे. आतापर्यंत ९ लाख १४ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली असून, येत्या काही दिवसांत पेरणीला आणखी वेग येईल, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. महाराष्ट्रासह, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड या राज्यांमध्ये यंदा गव्हाची पेरणी घटली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात दुष्काळी स्थिती आहे. महाराष्ट्रात तर दुष्काळाचे स्वरूप भीषण आहे. तसेच हरियाना आणि पंजाब राज्यांमध्ये यंदा शेतकऱ्यांना न्यायालयाने खरिपातील भाताचे काड जाळण्यावर बंदी घातली आहे. त्याचाही काही प्रमाणात परिणाम पेरणीवर झाला आहे. सर्वाधिक फटका हा दुष्काळी स्थितीचा बसला असून, या भागांमध्ये रब्बीच्या पेरणीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. येत्या काळात पाऊस झाला तरच दुष्काळी भागात रब्बीच्या पेरण्या होतील, अन्यथा येथील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.  तरीही देशातील इतर भागांमध्ये विशेतः उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात पोषक वातावरण असल्याने यंदा गव्हाची पेरणी वाढली आहे. सध्या ९ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, ही पेरणी गेल्या पाच वर्षांतील सरासरी पेरणी क्षेत्र १ लाख ४३ हजार हेक्टरने अधिक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गव्हाच्या पेरणीत झालेली वाढ ही केंद्र सरकारने २०१८-१९ च्या हंगामात गव्हाच्या हमीभावात केलेल्या वाढीचा परिणाम आहे. केंद्राने यंदा गव्हाच्या हमीभावात गेल्या वर्षीच्या १७३५ रुपयांवरून १८४० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू पेरणीस प्रोत्साहन मिळाले आहे. मध्य प्रदेशात १७० टक्के पेरा यंदा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये गव्हाची पेरणीत मोठी वाढ झाली आहे. मध्य प्रदेश सरकारने यंदा गव्हाच्या प्रमाणित बियाणे खरेदीवर प्रतिक्विंटल ७५० रुपये अनुदान जाहीर केले आहे. आतापर्यंत मध्य प्रदेशात गव्हाच्या पेरणीत १७० टक्क्यांनी वाढ होऊन ५ लाख ८६ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे ,तर उत्तर प्रदेशात ३०.९ टक्क्यांनी वाढ होऊन १ लाख २३ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. तर हरियाना, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये पेरणीत मोठी घट झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com