खानदेशात रब्बीसाठी प्रकल्पांमध्ये पाण्याचे आरक्षण केव्हा?

खानदेशात रब्बीसाठी प्रकल्पांमध्ये पाण्याचे आरक्षण केव्हा?
खानदेशात रब्बीसाठी प्रकल्पांमध्ये पाण्याचे आरक्षण केव्हा?

जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामाची शेतकरी तयारी करीत असून, विविध सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासंबंधी पाणी आरक्षित करण्याची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.  दरम्यान, सरकार स्थापन झालेले नसल्याने लोकप्रतिनिधींमध्येही समस्या सोडविण्यासंबंधी फारसा उत्साह दिसत नाही. पाणी आरक्षणासंबंधी उशीर होऊ नये यासाठी प्रशासन व कालवा समित्यांची बैठक मागील महिन्यात होणे अपेक्षित होते. जळगाव जिल्ह्यात गिरणा, वाघूर, हतनूर, धुळ्यात पांझरा, अनेर आणि नंदुरबारात दरा, सुसरी आदी प्रकल्पांमध्ये रब्बीसंबंधी सिंचनासाठी पाणी आरक्षित होईल, असे मध्यंतरी पाटबंधारे विभागातील सूत्रांनी सांगितले होते. जळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वादोन ते अडीच लाख हेक्‍टरवर, धुळ्यात एक लाख आणि नंदुरबारातही सुमारे ८० ते ८५ हजार हेक्‍टरवर रब्बी पिके असणार आहेत. यातील निम्मे क्षेत्राला सिंचनासंबंधी प्रकल्पांमधून पाण्याची व्यवस्था होण्याची गरज आहे. गिरणा धरणाच्या माध्यमातून पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव आदी भागातील २५ हजार हेक्‍टर, वाघूरच्या माध्यमातून भुसावळ, जळगावमधील सुमारे सात हजार हेक्‍टर क्षेत्रास तर हतनूरच्या माध्यमातून भुसावळ, यावल, रावेर व चोपडामधील मिळून सुमारे १८ हजार हेक्‍टर क्षेत्राला सिंचनाची सोय करता येऊ शकते.  धुळ्यात पांझरा प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे, शिंदखेडा, साक्री व अनेर प्रकल्पामुळे शिरपूर व जळगावमधील चोपडा तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये सिंचनासंबंधी व्यवस्था होणार आहे. या भागातील कोरडवाहू कापूस पिकासही दोन वेळेस सिंचनासाठी या प्रकल्पांमधून पाणी मिळावे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे कोरडवाहू कापूस पिकाच्या उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com