लोकांच्या कामात येईल त्या अधिकाऱ्याला आडवा करेन ः डॉ. सावंत

लोकांच्या कामात येईल त्या अधिकाऱ्याला आडवा करेन ः डॉ. सावंत
लोकांच्या कामात येईल त्या अधिकाऱ्याला आडवा करेन ः डॉ. सावंत

पुणे : ‘‘लोकांचे काहीही काम सांगितले की सरकारी अधिकारी ब्रिटिशकालीन नियमांवर बोट ठेवतात. देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे झाली तरीदेखील ब्रिटिशांच्या कामकाजाची ‘फ्रेम’ हटलेली नाही. पाऊस पडल्याचे खोटे आकडे सांगतात. मग दुष्काळातील गावांनी काय मरायचे का? शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे कर्जसुद्धा वाटत नाहीत. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. हे मला चालणार नाही. मी पुन्हा मंत्री होणारच आहे. लोकांच्या कामात जो अधिकारी येईल त्याला आता आडवा केल्याशिवाय थांबणार नाही,’’ असा इशारा राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिला. 

आदर्शगाव भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने जलसंधारणमंत्र्यांनी आपल्या भाषणातून केलेली तुफान तलवारबाजी पाहून अधिकारी अवाक् झाले. विशेष राज्याच्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना लोकसेवेचे प्रशिक्षण देणाऱ्या पुण्यातील यशदामध्येच डॉ. सावंत यांनी प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरले, तेव्हा येथे उपस्थितआदर्श गावांमधील ग्रामस्थ वारंवार टाळ्या वाजवून जलसंधारणमंत्र्यांच्या भाषणास प्रतिसाद देत होते. 

‘‘मी जातो तेथे ब्रेकिंग न्यूज बनत असते. माझा स्वभावच तसा आहे. माझा राजकारणातील प्रवास फक्त तीन वर्षांचा आहे. त्यात मी आमदार आणि मंत्रीही झालो. मात्र, बाहेर राहून आणि शासनात राहून काय काम करता येते ते मी अनुभवतो आहे. लोकहिताचे काम सांगितले की अधिकारी लगेच सांगतात, की हे काम नियमांच्या फ्रेममध्ये बसत नाही. मला सांगा की शासन म्हणजे कोण आणि कॅबिनेट मंत्री म्हणजे कोण, कोणती आली नियमाची फ्रेम? माझ्या मते ग्रामीण भागातील जनतेला जे वाटते तेच कॅबिनेट किंवा प्रशासनाच्या कामात उतरले पाहिजे. तुम्ही सकारात्मक नसाल तर जनताच तुम्हाला पायउतार करते,’’ असे जलसंधारणमंत्री म्हणाले. 

‘‘मी पाच साखर कारखाने चालवतो. पण, शेतकऱ्यांची एफआरपी पेंडिंग ठेवलेली नाही. जलयुक्त शिवाराला पर्याय ठरलेली साडेपाचशे किलोमीटर जलसंधारणाची कामे स्वतः राबविली आहेत. आम्ही करतो म्हणूनच बोलतो. मी राजकारणी नाही. दरवेळी फ्रेम आणि नियम सांगितले जातात. लोकांचे हित असल्यास ती फ्रेम तोडायला हवी. पाऊस नसलेल्या ठिकाणी १०० नी २०० टक्के पाऊस दाखवतात. मग कशी मदत मिळेल शेतकऱ्यांना? गावात वर पाऊस होतो तर खाली कोरडे असते. मग इतरांनी काय मरायचे का,’’ असे सवाल डॉ. सावंत यांनी उपस्थित केले. ‘सिंहासन’ चित्रपटातील निळू फुलेंसारखीच माझी अवस्था झाली आहे, असेही जलसंधारणमंत्र्यांनी या वेळी सांगून टाकले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com