ऊसदराची कोंडी फोडणार कोण?

ऊसदराची कोंडी फोडणार कोण?
ऊसदराची कोंडी फोडणार कोण?

कोल्हापूर : शेतकरी संघटनांनी ऊसदरासाठी आंदोलन सुरू केले असले तरी तोडी बंद झाल्याने ऊस शिवारे शांत झाली आहेत. हे आंदोलन तातडीने मिटविण्यासाठी अद्यापही शासन, कारखाने व शेतकरी संघटनांच्या पातळीवरून कोणत्याच हालचाली सुरू झालेल्या नाहीत. सध्या दिवाळीच्या धामधुमीमुळे या प्रश्‍नी चर्चा करण्याबाबत शिथिलता आली आहे.  प्रत्येक घटक आपापल्या पातळीवरून बैठका घेऊन शांत आहे. यामुळे हा प्रश्‍न कधी सुटणार याबाबत सध्या तरी अनिश्‍चितता आहे. सध्या तरी सरकारच्या भूमिकेकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. एफआरपी बदलाबाबत केंद्रीय स्तरावरून प्रयत्न झाले तरच हा तिढा सुटण्याची शक्‍यता असल्याने आता मध्यस्तीसाठी राज्य सरकार काय करणार याकडे उस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.  ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व शेतकरी संघटनांच्या ऊस परिषदा झाल्या. बहुतांशी संघटनांनी एकरक्कमी एफआरपीबरोबरच जादा रकमेचीही मागणी केली. यानंतर सुरू असणाऱ्या कारखान्यांच्या तोडी बंद केल्या. कारखानदारांनी तिरकी चाल खेळत स्वत:हून कारखाने बंद ठेवण्याची घोषणा केल्याने आक्रमक आंदोलनाच्या मूडमध्ये असणाऱ्या शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांना शांत बसावे लागले. यानंतर तोडी बंद झाल्याने शिवारे शांत झाली आहेत परंतु मूळ प्रश्‍न बाजूलाच आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटना वगळता इतर शेतकरी संघटनांनी दरवाढीची मागणी केली खरी; पण ऊसतोड बंद करण्यासाठी या संघटना अजूनपर्यंत आग्रही राहिल्या नाहीत. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मात्र तातडीने तोडी बंद करून आंदोलन सुरू केले. स्वाभिमानी व रयत वगळता इतर संघटना पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून दरवाढीची मागणी करणार आहेत. थोड्या फार प्रमाणात आंदोलनाची धग जाणवत असली तरी हा प्रश्‍न तातडीने सोडविण्याबाबत तातडीने प्रयत्न सुरू नसल्याचे चित्र आहे. कारखानदारांनी हा चेंडू सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. शेतकरी संघटनांचेही सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. सध्या दिवाळीची धामधूम सुरू असल्याने हा प्रश्‍न दिवाळीनंतरच मार्गी लागेल अशी शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com