का येताहेत चक्रीवादळे?

भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर, दक्षिणेकडील हिंदी महासागर तर पश्‍चिमेकडील अरबी समुद्र आहे. या ठिकाणी दरवर्षी कमी दाबा क्षेत्र आणि चक्रीवादळे तयार होतात.
cyclone
cyclone

भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर, दक्षिणेकडील हिंदी महासागर तर पश्‍चिमेकडील अरबी समुद्र आहे. या ठिकाणी दरवर्षी कमी दाबा क्षेत्र आणि चक्रीवादळे तयार होतात. मात्र त्यांची तीव्रता कमी-अधिक असते. समुद्रात पूर्वेकडून येणारे वारे आणि समुद्रातील २६.५ अंश सेल्सिअस तापमान कमी दाबाच्या क्षेत्रास पोषक ठरतात. वारे, तापमान आणि इतर हवामानाचे पोषक घटक असतात, तेव्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या प्रक्रियेत सातत्य राहिले, तर कमीदाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढते आणि पुढे त्याचे रूपांतर चक्रीवादळात होते. चक्रीवादळाची तीव्रता.. चक्रीवादळ ज्या मार्गावरून प्रवास करते, त्या मार्गावर परिस्थितीनुसार ते तीव्र किंवा क्षीण होत जाते. ते पाण्यावरून किंवा आर्द्रता असलेल्या, अति उष्ण प्रदेशावरून जात असेल तर वादळाची ताकद वाढत जाते. जेव्हा जमिनीवर किंवा थंड प्रदेशावर वादळ जाते किंवा त्याची सर्व शक्ती पावसाच्या किंवा अन्य रूपाने संपते तेव्हा ते शांत होते. चक्रीवादळासाठी किती कालावधी लागतो? चक्रीवादळ ही एक नैसर्गिक घटना आहे. चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी साधारणपणे आठ ते दहा दिवसांचा म्हणजेच किमान २४० ते २५० तासांचा कालावधी लागतो. चक्रीवादळाच्या निर्मितीची पूर्वकल्पना आपल्याला दहा-बारा दिवस अचूक मिळू शकते. वादळे ही समुद्रात किंवा सागरात निर्माण होतात आणि बाष्पाचा पुरवठा जोपर्यंत होतो आहे, तोपर्यंत ती जिवंत राहतात. जमिनीवर एकदा वादळ धडकले, की सागरी बाष्पाचा पुरवठा खंडित होतो. परिणामी, ते अत्यंत वेगाने अवघ्या काही मिनिटांत नष्ट होते. त्यामुळे वादळ धडकले तरी सागरी किनाऱ्यावर हानी होऊ शकते. चक्रीवादळाचे शास्त्र काय आहे? समुद्र सपाटीपासूनच्या चक्रीवादळाचा मधला दाब हा सामान्य दाबापेक्षा ४.५ ते ८.५ हेप्टापास्कल इतका कमी झाला, तर त्याला चक्रीवादळ म्हणतात. एखाद्या ठिकाणी तापमान जास्त झाले व इतर भागांत ढगाळ वातावरणामुळे वा अन्य कारणांमुळे तापमान कमी झाले, तर हा तापमानातील फरक भरून काढण्यासाठी हवा जोरात वाहू लागते. तेथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि खाली जमिनीवर किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली, तर वादळाचा जन्म होतो. वातावरणात उंचीवर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर उतरले तरी तिथल्या जमिनीवर किंवा तिथल्या पाण्याच्या पृष्ठभागावर वादळाची निर्मिती होते. समुद्रात, जलाशयात जेव्हा एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती वर्तुळाकार वारे फिरू लागतात आणि वाऱ्यांची गती ताशी ८३ ते ८७ किलोमीटर असते, तेव्हा फिरणाऱ्या हवेमुळे चक्रीवादळ तयार होते, असे हे वादळाचे साधे शास्त्र आहे. चक्रीवादळांची विविध नावांनी ओळख   हेन्री पिडिंग्टन (७ जानेवारी १७९७ - ७ एप्रिल १८५८) हा इंग्रज खलाशी व्यापारी व कॅप्टन होता. त्याने ‘कुकलोस’ या ग्रीक शब्दापासून ‘चक्रीवादळ’ असे शब्दाचे नामकरण केले. चक्रीवादळांना जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखण्यात येते. हिंदी महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना इंग्रजीत ‘सायक्लोन’, वेस्ट इंडिज बेटे आणि अटलांटिक महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना ‘हॅरिकेन’, तर चीनचा समुद्र आणि प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळाला ‘टायफून’ असे संबोधण्यात येते. ऑस्ट्रेलियात चक्रीवादळांना ‘विली-विलीस’ असे म्हटले जाते. जेव्हा वादळ जमिनीवर तयार होते तेव्हा त्याला ‘टोरनॅडो’ असे म्हणतात. वाटचालीचा अचूक वेध घेणे शक्य  वादळ ही अतिशय संथ गतीने पुढे सरकणारी ‘सिस्टीम’ असल्याने तिचा अचूक दिशेने होणाऱ्‍या वाटचालीचा वेध घेणे शक्य आहे. बिनचूक अंदाज देणारी रडार यंत्रणा, उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे, याखेरीज भूपृष्ठावरील निरीक्षणांवरूनही त्या भागात वारे कोणत्या दिशेने, कसे वाहत आहेत यावरून वादळाची बिनचूक माहिती मिळते. वादळाची पूर्वसूचना देण्यासाठी या तीनही माध्यमातून मिळालेली माहिती उपयोगी ठरते. सुपर कॉम्प्युटर (एचपीसी) सागरी भाग व जमीन तसेच इतर अडथळे यांच्या ‘गणितीय मॉडेल’च्या साह्याने दर काही सेकंदांत वादळाचे ‘अपडेट’ टिपता येतात. परिणामी, चक्रीवादळ धडकणार असल्यास त्याची अचूक सूचना देता येते. चक्रीवादळांमुळे होणारी विध्वंसकता चक्रीवादळांच्या वाऱ्याचा वेग त्याने केलेल्या विध्वंशाचे मुख्य कारण ठरते. वाऱ्याच्या वेगावरून त्याला मापन श्रेणी (कॅटेगरी) देण्यात येते. या वाऱ्यामध्ये असलेल्या बाष्पाच्या प्रमाणामुळे चक्रीवादळ जेथून प्रवास करते, तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे पूर येऊ शकतो. कमी दाबाच्या क्षेत्राचा विचार करता त्याची तीव्रता वाढल्यानंतर चक्रीवादळाची निर्मिती होते. समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती चोहोबाजूंनी येणाऱ्या वाऱ्यांमुळे वादळ तयार होते. वातावरणातील उष्ण व आर्द्र हवेचा सततचा पुरवठा हे चक्रीवादळाच्या निर्मितीचे प्रमुख कारण आहे. समुद्राचे पाणी जेवढे गरम होईल, तेवढे बाष्प तयार होते. एका अर्थाने गरम पाणी, बाष्प यातून निर्माण होणारी ‘ऊर्जा’ (एनर्जी) चक्रीवादळास कारणीभूत ठरते. मात्र ही चक्रीवादळे जमिनीवर आली, की त्यांना अपेक्षित ‘ऊर्जा’ मिळत नाही. परिणामी त्याचा वेग, तीव्रता कमी होते. हवामानाची अचूक माहिती बदलत्या हवामान काळात भौतिकशास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञ तसेच कृषी शास्त्रज्ञ यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यापुढे आर्थिक नियोजन करताना हवामानाबाबत फक्त अंदाजापेक्षा, कायमस्वरूपी सुधारण्याशिवाय पर्याय नाही. देशातील २७ आणि महाराष्ट्रातील ४ डॉप्लर रडारने हवामानाची अचूक माहिती सतत मिळत असते. त्याचा योग्य पद्धतीने वापर करून त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची गरज बनली आहे.

...असे आहेत वादळाचे प्रकार  वाऱ्याचा वेग ताशी १७ ते ३० किलोमीटर असल्यास लघुभार किंवा कमी दाबाचा पट्टा (लो प्रेशर), वाऱ्याचा वेग ताशी ३१ ते ३९ किलोमीटर असल्यास कमी दाब (डिप्रेशन), वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५९ किलोमीटर असल्यास खोल कमी दाबाचे क्षेत्र (डीप डिप्रेशन), वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ८९ किलोमीटर असल्यास चक्रीवादळ (सायक्लोनिक स्टॉर्म), वाऱ्याचा वेग ताशी ९० ते ११९ किलोमीटर असल्यास तीव्र चक्रीवादळ (सिव्हिअर सायक्लोनिक स्ट्रॉम), वाऱ्याचा वेग ताशी १२० ते २२० किलोमीटर असल्यास अतितीव्र चक्रीवादळ (एक्स्ट्रीम सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म), वाऱ्याचा वेग ताशी २२० किलोमीटरच्या पुढे असल्यास सुपर सायक्लोन अशा चढत्या क्रमाने विध्वंस वाढत जाणाऱ्या वादळांच्या अवस्था आहेत.

बंगालच्या उपसागरात तिसरे चक्रीवादळ  यंदा बंगालच्या उपसागरात पूर्वेकडून येणारे वारे आणि समुद्रातील भूपृष्टभागाचे तापमान व हवामानाचे इतर पोषक घटक असल्याने चालू वर्षी तिसरे चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळाची योग्य तीव्रता असल्याने त्याचे परिणाम देशातील विविध भागांवर झाले आहे.बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रीवादळाचे संकेत दक्षिण अंदमान समुद्रात आज (ता. ४) दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यांची तीव्रता वाढेल की नाही, त्यावर हवामान विभागाचे बारकाईने लक्ष आहे. येत्या चार ते पाच दिवसात अंदाज घेऊन त्याचे रोज अपडेट दिले जात आहेत. चक्रीवादळाचे महाराष्ट्रावर होणारे परिणाम 

  •  राज्यात सरासरी १६ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान
  •  येत्या चार ते पाच दिवसांत किमान तापमान सर्वसाधारण राहील
  •  चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात किमान तापमानात घट
  •   ढगाळ हवामान
  •   अवेळी पाऊस
  •   पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव  
  •   पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढण
  • दरवर्षी पाच चक्रीवादळे  साधारणत: वर्षभरात पाच चक्रीवादळे तयार होतात. काही वेळा यापेक्षा कमी अधिक स्वरूपातही चक्रीवादळे तयार झाले आहेत. यामध्ये बंगालच्या उपसागरात चार, तर अरबी समुद्रात एक अशी साधारणपणे संख्या असते.  चक्रीवादळाचा कालावधी  चक्रीवादळ सक्रिय झाल्यानंतर  साधारणपणे ४ ते ६ दिवस ते असते.  ...असे होते नुकसान

    चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग संभाव्य नुकसानीचे प्रमाण
    ताशी वेग हा ९० ते १२४ किलोमीटर घर, पिके व झाडे यांचे नाममात्र नुकसान होते.
    ताशी वेग १२५ ते १६४ किलोमीटर   लक्षात येण्याइतपत नुकसान होते
    ताशी वेग १६५ ते २२४ किलोमीटर घरांचे छप्पर उडते व वीजपुरवठा खंडित
    ताशी २२५ ते २७९ किलोमीटर मालमत्तेचे नुकसान
    ताशी २८० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त वेग     मोठ्या प्रमाणात जीवितहानी, मालमत्तेचे मोठे नुकसान

      दोन वेळा येतात चक्रीवादळे

    हंगाम महिने
    हिवाळा   ऑक्टोबर ते डिसेंबर
    उन्हाळा मार्च ते मे (मॉन्सून सक्रिय होईपर्यंत)

    चालू वर्षी तयार झालेली चक्रीवादळे 

    समुद्राचे नाव  चक्रीवादळाचे नाव  कालावधी
    बंगालचा उपसागर  अम्फान   १६ ते २१ मे २०२०
    अरबी समुद्र  निसर्ग १ ते ४ जून २०२०
    अरबी समुद्र  गती २१ ते २४ नोव्हेंबर २०२०
    बंगालचा उपसागर   निवार   २३ ते २६ नोव्हेंबर २०२०
    बंगालचा उपसागर   बुरेवी बुरेवी नोव्हेबर ते अजूनपर्यंत

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com