भोपोली येथे रानभाज्यांचा १८ला मेजवानी उत्सव

भोपोली येथे रानभाज्यांचा १८ला मेजवानी उत्सव
भोपोली येथे रानभाज्यांचा १८ला मेजवानी उत्सव

मुंबई: सेंद्रिय शेतीची माहिती व प्रात्यक्षिक, वारली कलेचे नमुने, लोकसंगीत, लोकनृत्याची बहार आणि रानभाज्यांची मेजवानी असा भरगच्च फुलोरा 'रान-उत्सव' या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या शहरी नागरिकांना अनुभवता येणार आहे. डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने येत्या १८ ऑगस्ट रोजी भोपोली (ता. विक्रमगड, जि. पालघर) येथे या रान-उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  धोधो कोसळणारा पाऊस जरा उसंत घेऊन स्थिरावला की लागलीच सुरू होते श्रावण महिन्याची लगबग. पालघर आणि आजूबाजूच्या आदिवासी भागात तर हा श्रावण महिना खासच! महिनाभर रोजचे ८-८ तास शेतात वाकून आवणी (लावणी) करून आलेला थकवा दूर करण्यासाठी सोबतीला असतात पारंपारिक  लोकगीते, तारप्याचे सूर आणि त्यावर थिरकणारी पावले! हातभर लांबीची भाताची रोपे आनंदाने श्रावणसरी झेलत असतानाच घराघरात मात्र बेत रंगतात ते चुलीवरच्या गरमागरम भाकरीचे आणि रानात उगवणाऱ्या रानभाज्यांचे.  पावसात जंगलात आपसूकच रुजून येणाऱ्या, विविध गुणधर्मांनी युक्त अशा भाज्या, कंद, फळे, फुले या आदिवासींनी शोधून काढल्या आणि जपल्याही. याच भागातून जन्म घेतलेली वारली कला आता जगाच्या कानाकोपऱ्यात स्थिरावली. तारपा, ढोल, गौरी अशी लोकनृत्ये आज महाराष्ट्राची लोकनृत्ये म्हणून लोकांना भावतात. मुंबईपासून फक्त ८० किलोमीटरवर असणारा हा निसर्गसमृद्ध भाग शहरी गोतावळ्यापासून मात्र अगदीच वेगळा राहिला आहे. इथले राहणीमान वेगळे, खानपान वेगळे, भाषा वेगळी, भूषा वेगळी आणि प्रश्नही वेगळे.  डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट गेल्या ३२ वर्षांपासून या भागात आरोग्यसेवेचे काम करत आहे. शहरी लोकांना या जीवन संस्कृतीचा अनुभव घेता यावा, आदिवासी लोकजीवन जवळून पाहता यावे आणि संस्थेच्या कामाचा परिचय व्हावा यासाठी ढवळे ट्रस्टच्या वतीने एकदिवसीय रान-उत्सव आयोजित करण्यात आला आहे. सेंद्रिय शेतीची माहिती व प्रात्यक्षिक, वारली कलेचे नमुने, लोकसंगीत, लोकनृत्याची बहार आणि रानभाज्यांची मेजवानी असा भरगच्च फुलोरा या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे.  येत्या १८ ऑगस्ट रोजी, डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट परिसर, भोपोली, तालुका विक्रमगड जिल्हा पालघर येथे या रान-उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून ८४२२९२८०६२, ७७२००१६३९२, ७७२००१६३९७, ९८३३४३७३४३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com