नरनाळा किल्ल्याचा विकास करणार ः बच्चू कडू

नरनाळा किल्ल्याचा विकास करणार ः बच्चू कडू
नरनाळा किल्ल्याचा विकास करणार ः बच्चू कडू

अकोला ः पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील नरनाळा किल्ल्यासह परिसराचा विकास करून ग्राम पर्यटन संकल्पना राबविण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले. अकोट तालुक्यातील शहापूर येथील वन विभागाच्या विश्रामगृहात नरनाळा किल्ल्याचा पर्यटन विकास करण्यासाठी त्यांनी आढावा बैठक घेतली, त्या वेळी ते  बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अकोट येथील उपवन संरक्षक (वन्यजीव) टी. बेऊला, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे,  पुरातत्व विभागाचे संरक्षक सहायक संतोष महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गिरीश जोशी, उपविभागीय अधिकारी अकोट रामदास सिद्धभट्टी, उपवनसंरक्षक विजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शेगाव-नरनाळा-चिखलदरा पर्यटन मार्ग विकसित करण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री कडू म्हणाले की,  अमरावती जिल्ह्यातील गावीलगड किल्ला व नरनाळा किल्ला, असा मार्ग तयार करण्यात यावा; जेणेकरून शेगाव येथील धार्मिक स्थळाला भेट दिल्यानंतर पर्यटक नरनाळा किल्ल्याला भेट देऊन चिखलदरा येथे जाऊ शकतील. यासाठी नरनाळा किल्ला विकास कार्यक्रमासह वन विभाग, पर्यटन विभाग, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभाग यांनी संयुक्तरीत्या अंदाजपत्रक सात दिवसांच्या आत तयार करावे. पुरातत्व विभागासह वन विभागाने नरनाळा किल्ल्याच्या महाकालीव्दारावर विकास करावा. प्रेक्षकांसाठी प्रेक्षकगृह, दुर्बीण स्पॉट, लायटिंग व साउंड शो, पोपटखेड धरणावर नौकाविहार, शक्कर तलावर कृत्रिमरीत्या धबधबा, नौगज तोफ ते खालपर्यंत स्काय वॉक, राणीमहल ते महाकाली गेटपर्यंत ठिकठिकाणी बांध टाकून पाणी अडविणे, यासारख्या सोई केल्या तर पर्यटकांचे आकर्षण वाढेल. नरनाळा किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडेल. नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शहानूर या आदिवासी गावाचा व्यक्तिगत व सामूहिक लाभाच्या योजना राबवून विकास करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. सुरुवातीला बच्चू कडू यांनी नरनाळा किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. शहानूर गाव पालकमंत्री दत्तक ग्राम योजनेत दत्तक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com