स्वतः ईडीपुढे जाणार ः शरद पवार

स्वतः ईडीपुढे जाणार ः शरद पवार
स्वतः ईडीपुढे जाणार ः शरद पवार

मुंबई ः राज्य बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. निवडणूक प्रचारासाठी पुढील महिनाभर मी मुंबईच्या बाहेर असणार आहे, त्यामुळे मी स्वतःच येत्या शुक्रवारी २७ सप्टेंबरला मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर होणार आहे. त्यांचा पाहुणचार स्वीकारण्याची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे दिली.

राज्य बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने मंगळवारी (ता. २४) गुन्हा दाखल केल्यानंतर बुधवारी (ता.२५) शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज यांचे संस्कार असलेल्या महाराष्ट्रात आम्ही वाढलो. त्यामुळे दिल्लीच्या तख्तासमोर आम्ही झुकणार नाही. तसे महाराष्ट्राचे संस्कारही नाहीत. 

पवार म्हणाले, की ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांत माझेही नाव आहे. माझ्या आयुष्यातील हे दुसरे प्रकरण आहे. ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे हे काल संध्याकाळी कळले. त्यांच्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य करणार आहे. पुढील काही दिवस मी निवडणूक प्रचारासाठी मुंबईच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे. ईडीला मला काही प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल आणि मी उपलब्ध नसेल किंवा कोणत्या अदृश्य ठिकाणी गेलो तर, त्याआधीच येत्या शुक्रवारी, २७ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात मी स्वतःहून जाणार आहे. अधिकाऱ्यांना माझ्याकडून जी माहिती हवी आहे ती देईन. त्यांना जो काही पाहुणचार करायचा असेल तो स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असेही पवार म्हणाले. ईडीला सहकार्य करण्यासाठी माझे हात सदैव तत्पर असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्य सहकारी बँक ही राज्यातली महत्त्वाची बँक आहे. शेती उद्योगात अर्थसाह्य करण्याची भूमिका घेते. बँकेच्या संचालक मंडळामध्ये एका पक्षाचे नेते नव्हते. या बँकेत पक्षीय विचार बाजूला ठेवून काम करण्याची पद्धत आहे. या मंडळात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह अनेक पक्षांचे नेते होते. ५० संचालकांची निवड बिनविरोध झालेली आहे. माझ्यापुरते म्हणाल तर, मी कधीही संचालक राहिलेलो नाही. परंतु संस्थांचे प्रश्न माझ्याकडे आले तर केंद्र आणि राज्य सरकारशी बोलण्याची माझी भूमिका राहिली आहे, असेही पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. 

पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com