आगामी विधानसभा लढणार नाही ः आमदार गणपतराव देशमुख

आगामी विधानसभा लढणार नाही ः आमदार गणपतराव देशमुख
आगामी विधानसभा लढणार नाही ः आमदार गणपतराव देशमुख

सोलापूर ः ‘‘आता माझे वय झाले असून, श्रवणदोष आहे. डोळ्यांनाही व्यवस्थित दिसत नाही. वयपरत्वे एका टप्प्यावर थांबणे मला आवश्‍यक वाटते. माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण देशामध्ये माझ्याप्रमाणे ९३ वर्षांची कोणतीही व्यक्ती निवडणूक लढवत नसावी, मी पुन्हा निवडणूक लढवू नये, नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणूक मी लढवणार नाही,’’ अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगोल्यात पत्रकारांशी बोलताना दिली. आपल्यानंतर आपला वारस कोण असेल, या प्रश्‍नावर वेळ आली की कळेल; पण पक्षाचे कार्यकर्तेच ते ठरवतील, असेही ते म्हणाले.

त्यामुळे कार्यकर्ते काहीसे अस्वस्थ झाले आहेत; पण त्यांची समजूत स्वतः आमदार देशमुख काढत आहेत. गेल्या निवडणुकीवेळीही आमदार देशमुख यांनी थांबण्याचा निर्णय घेतला होता; पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ते लढले आणि जिंकलेही. यंदाही तेच उमेदवार असतील, याचदृष्टीने कार्यकर्ते कामाला लागले आहेत; पण यंदा आपल्या निर्णयावर आपण ठाम आहोत, आता थांबले पाहिजे, अशी मनोमन इच्छा असल्याचे आमदार देशमुख सांगत आहेत. माझ्यानंतर योग्य उमेदवार देण्यापेक्षा माझ्या हयातीतच सक्षम उमेदवार देऊन त्यास विजयी करून शेकापचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, शेकापचा उमेदवार ठरविण्यासाठी गावागावांतील, वाड्यावस्त्यांवरील कार्यकर्त्यांची मते विचारात घेतली जातील. आपण कोणाचेही नाव पुढे करणार नाही. कार्यकर्ते जो उमेदवार देतील, त्यास निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. 

शेकापचा उमेदवार कोण? विधिमंडळाच्या इतिहासात सर्वाधिक ५२ वर्षे आमदार म्हणून देशमुख यांची कारकीर्द राहिली आहे. विधिमंडळातील विविध कामकाज समित्यांवर त्यांनी काम केले आहे. आघाडीच्या काळात मंत्रिपदही त्यांनी उपभोगले आहे. विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. एक अभ्यासू आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर अगदी पोटतिडकीने या वयातही ते सातत्याने प्रश्‍न मांडत असतात. आमदार देशमुख यांच्या या निर्णयाने कार्यकर्ते अस्वस्थ झाले असले, तरी त्यांच्यानंतर शेकापचा उमेदवार कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com