सोलापुरातील पीकविम्याच्या लाभासाठी राज्य समितीकडे शिफारस करणार

सोलापुरातील पीकविम्याच्या लाभासाठी राज्य समितीकडे शिफारस करणार
सोलापुरातील पीकविम्याच्या लाभासाठी राज्य समितीकडे शिफारस करणार

सोलापूर  : पीकविमा हप्ता भरलेला असूनही तांत्रिक कारणामुळे विमा हप्ता कंपनीकडे जमा झाला नाही, अशा प्रकरणातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळावा, अशी शिफारस राज्य समितीकडे करण्याचा निर्णय जिल्हा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच ज्या बॅंका आणि विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. त्यांनी व्याजासह रक्कम संबंधित शेतकऱ्यांना द्यावी, अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, असे आदेशही या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.

सांगोला आणि पंढरपुरातील शेतकऱ्यांच्या पीकविम्याप्रश्‍नी गेल्याच महिन्यात २७ जूनला `ॲग्रोवन`मध्ये यासंबंधीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. तसेच संबंधितांना योग्य तो अहवाल देण्याची सूचना केली होती. त्यानंतर यावर निर्णय घेण्यासाठी ही बैठक झाली. प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारित फळ पीक विमा योजना या दोन्हींचा आढावा या वेळी घेण्यात आला. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, अग्रणी बॅंक व्यवस्थापक संतोष सोनवणे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, शेतकरी प्रतिनिधी गोरख घाडगे, उदय नान्नजकर आदी उपस्थित होते.

विमा हप्ता भरताना महा ई सेवा केंद्रावर अंतिम मुदतीवेळी  जास्त गर्दी होते. यामुळे अनेक वेळा वेबसाईट बंद पडणे, कनेक्‍टिव्हीटीअभावी महा ई सेवा केंद्र व्यवस्थित न चालणे अशा तांत्रिक अडचणी उद्भवतात, यामुळे शेतकऱ्यांचा विमा हप्ता महा ई सेवा केंद्राकडून कपात केला जातो. मात्र, विमा कंपनीकडे जमा होत नाही. यामध्ये शेतकऱ्यांचा काहीही दोष नाही. अशा शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळावा, याबाबत राज्यस्तरीय समितीस शिफारस करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. त्यावर अशी शिफारस केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.  

सांगोला येथील ४३५ शेतकऱ्यांनी भारतीय स्टेट बॅंकेकडे विमा हप्ता भरला होता. पण बॅंकेने तो वेळेत विमा कंपनीकडे सादर केला नाही. त्यामुळे सदरचे शेतकरी विमा लाभापासून वंचित राहिले होते. मात्र आता शेतकऱ्यांचे प्रस्ताव स्वीकारले असून, लवकरच विमा रक्कम देण्याचे आश्वासित केले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. मात्र शेतकऱ्यांना  विमा रक्कम न मिळाल्यास संबंधित बॅंक अधिकारी अथवा विमा कंपनी अधिकारी यापैकी जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सूचना डॉ. भोसले यांनी केली.

विमा हप्ता भरताना ज्या शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक चुकलेले आहेत त्यांनी बॅंक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करावे, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले. खरीप हंगाम २०१८ मध्ये सोलापूर जिल्ह्यात एकूण दोन लाख ४२ हजार ८८१ शेतकऱ्यांना २२५.२० लक्ष रुपये रक्कम वितरीत करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षाची पीक विमा योजनेची अंतिम मुदत २४ जुलैपर्यंत असून यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले.

बॅंकेची चूक, व्याजासहीत भरपाई द्यावी

सांगोला तालुक्‍यातील जगन्नाथ साळुंखे यांनी एचडीएफसी बॅंकेकडून डाळिंब पिकासाठी कर्ज घेतले होते. श्री. साळुंखे यांचा विमा हप्ता एचडीएफसी बॅंकेने भरणे अपेक्षित होते. बॅंकेने विमा हप्ता रक्कम कपात न केल्यामुळे संबंधित शेतकरी विमा रकमेपासून वंचित राहिले, यास एचडीएफसी बॅंक पूर्ण जबाबदार असून त्यांच्याकडून पीक विमा मंजूर रक्कम व्याजासहित साळुंखे यांना द्यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com