राज्य दुष्काळमुक्त करून शाश्‍वत शेतीकडे नेणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य दुष्काळमुक्त करून शाश्‍वत शेतीकडे नेणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य दुष्काळमुक्त करून शाश्‍वत शेतीकडे नेणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर : ‘महाग्रोटेक’ प्रकल्पाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने पीक पेरणी ते कापणीपर्यंत ड्रोन आणि उपग्रहाच्या साह्याने पिकांचे कीडनियंत्रण केले जाणार आहे. सध्या सहा जिल्ह्यांत सुरू असणारा हा प्रकल्प संपूर्ण राज्यात राबवून शेतीवरील संकट टाळण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. समाजाचे प्रत्येक प्रश्‍न सोडविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे सांगत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्‍वत शेतीकडे नेण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात बाजार समितीच्या वतीने आयोजित ‘कृषी पंढरी’ प्रदर्शनाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, मदत व पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी, आमदार प्रशांत परिचारक, सुरेश धस, बबनदादा शिंदे, विजय पुराणिक, सुधाकरपंत परिचारक, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप घाडगे, उत्तमराव जानकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, कल्याणराव काळे उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘शेतकऱ्यांना शाश्‍वत सिंचन उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यातील १९ हजार गावांत ६ लाखांहून अधिक जलसंवर्धनाची कामे झाली आहेत. मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत राज्यात १ लाख ६१ हजार शेततळी तयार झाली असून, दीड लाख सिंचन विहिरी खोदण्यात आल्या आहेत. या माध्यमातून राज्यात संरक्षित सिंचन व्यवस्था उभी राहिली असून, सन २०१२ मध्ये शंभर टक्के पाऊस पडून जेवढे उत्पन्न झाले होते, साधारण तेवढेच उत्पन्न गेल्या वर्षी अवघा ७० टक्के पाऊस पडूनही झाले आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळेच हे शक्य झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पीक विमायोजनेसाठी सोळाशे कोटी रुपयांचा विमा हप्ता भरून त्यांना तेरा हजार कोटी रुपयांची मदत झाली आहे.``

जलयुक्त शिवार योजनेमुळे उंबरठा उत्पादन वाढले असल्याने  काही शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अडचण झाली आहे. मात्र वाढलेली उत्पादकता लक्षात घेऊन यापुढे उंबरठा उत्पादन ठरविण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात येणार असल्याचे, त्यांनी सांगितले.

जलसंधारणाच्या कामांबरोबरच रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ‘पश्‍चिम महाराष्ट्रातील बंद पडलेल्या सर्व प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आली असून, येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण करण्यावर शासनाचा भर आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍नही वेगाने मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू असून, पंधरा वर्षांपासून उजनी प्रकल्पाच्या कालव्यातील बाधित असलेल्या ६ हजार प्रकल्पग्रस्तांना  सध्याच्या बाजारभावाप्रमाणे १८० कोटींची भरपाई देण्याचे काम शासनस्तरावर सुरू आहे.’

कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले, की कृषी खात्याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी  प्रयत्नशील असून, कृषी सहायकांना ग्रामपंचायतीमध्ये बसण्यासाठी जागा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पीकविम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचे शासनाचे धोरण आहे.

या वेळी आमदार प्रशांत परिचारक यांचे भाषण झाले. प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी तर आभार उपसभापती विवेक कचरे यांनी मानले. 

सोसायट्यांचे रूपांतर अॅग्री बिझनेसमध्ये करणार

शेतकऱ्यांच्या सर्व योजना डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) मध्ये आणत सर्व व्यवहार पारदर्शक केला आहे. या माध्यमातून भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न आहे. वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून राज्यातील १० हजार गावांतील विकास सेवा सोसायट्या बळकट करून त्यांचे ॲग्री बिझनेस सोसायट्यांमध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या माध्यमातून दलालांची शृंखला तोडून शेतकरीच स्वतःच्या शेतीमालाचा भाव ठरवणार असल्याचे, त्यांनी सांगितले. कमी पाण्यात उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करत आवर्षणप्रवण भागात ठिबक सिंचनासाठी ८० टक्के सबसिडी देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

प्रकल्पग्रस्तांना मदत  उजनी धरणाच्या कालव्यातील सहा हजार बाधित प्रकल्पग्रस्तांना मोबदला वितरित करण्यात येणार आहे. या प्रकल्पग्रस्तांपैकी ज्ञानू जासूत, कल्याण रोकडे, विजया हजारे, आबूराव होगाडे, रावसाहेब नागणे, दत्तात्रय हेंबाडे, भास्कर बिनवडे, नितीन धसाडे, हरिश्‍चंद्र कांबळे, मधुकर पाटील, शहाजी जाधव, रंजना जाधव, गोविंद दत्तू, प्रमिला जाधव यांनी प्रातिनिधीक स्वरूपात नुकसान भरपाईचे धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com