वाइन उद्योजक बनलेल्या ज्योत्सनाच्या जिद्दीला सलाम !

वाइन उद्योजक बनलेल्या ज्योत्सनाच्या जिद्दीला सलाम !
वाइन उद्योजक बनलेल्या ज्योत्सनाच्या जिद्दीला सलाम !

येवला, जि. नाशिक : चार भिंतीच्या बाहेर येऊन ग्रामीण महिला विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेत आहेत. अशीच भरारी निफाड तालुक्यातील पिंपळसच्या ज्योत्सना सुरवाडे या ३४ वर्षीय महिलेने वाइन उद्योगामध्ये घेतली आहे. वाइन उद्योगाच्या प्रक्रियेतील सगळ्याच स्तरांवरील एकूण एक प्रक्रिया आत्मसात करून ती पूर्ण करणारी वाइन उद्योजक महिला म्हणून ज्योत्सनाची ओळख निर्माण झाली आहे. गिरणारे येथील ज्योत्सना थेटे हिचा २००७ मध्ये निफाड तालुक्यातील पिंपळस येथील अशोक सुरवाडे यांच्याशी विवाह झाला. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या ज्योत्सनाने लग्नानंतर पतीबरोबरीने पारंपरिक शेतीचा मार्ग सुरू ठेवला. पारंपरिक भुसार मालाच्या शेतीमध्ये काहीही परवडत नसल्याने दोन वर्षांतच म्हणजे २००९ मध्ये ज्योत्सनाने कांदा, ऊस यांसारख्या नगदी पिकाकडे आपला मोर्चा वळवला. त्यातही असलेल्या अनिश्चिततेच्या संकटामुळे आर्थिक स्थैर्यासाठी फळबागेकडे वळायचा निर्णय २०११ मध्ये पतीच्या सल्ल्याने घेतला. याच दरम्यान ज्योत्सनाने मुक्त विद्यापीठाकडून कला शाखेची पदवीही मिळवली. यासाठी पूर्वतयारी म्हणून पतीसह तीन वर्षे अभ्यास करीत २०११ ला वाइन द्राक्षाकडे आपला मोर्चा वळवला. दुर्दैवाने याच वेळी वाइन इंड्स्ट्रीचा फुगा फुटला अन् केवळ सबसिडीकरिता काढलेल्या वाइन उद्योगाची पडझड सुरू झाली. वाइन द्राक्षे आता कुठे विकायची हा प्रश्न उभा ठाकल्याने आपण स्वतःच प्रक्रिया उद्योगाकडे का वळू नये हा विचार ज्योत्सनाच्या मनात आला अन् त्याने मूर्त स्वरूप धारण करीत वायनरी उद्योगाची उभारणी सुरू करण्याची पावले उचलली.

२०१३ मध्ये ज्योत्स्नाने निफा वायनरी या उद्योगाची उभारणी केली. विशेष म्हणजे या उद्योगासाठी आदर्श कृषी शास्रज्ञ जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर यांचा आहे. त्या साधनसामग्रीचा वापर करीत प्रगती करावी, या सूत्राचा वापर करीत ज्योत्स्नाने जुने घर, स्थानिक ठिकाणाहून मशिनरी बनवून घेणे हा पर्याय निवडला. अनुदान, सवलतीच्या नादामध्ये मूळ उद्योगाची आस बाजूला राहते, हे सूत्र ज्योत्सनाने स्वीकारले. आहे त्या परिस्थितीत जे काही उपलब्ध आहे ते ते वापरत निफा वायनरी उभारली गेली.  पुरुषाच्या मक्तेदारी असलेल्या वाइन उद्योगामध्ये ज्योत्सना फक्त नावापुरतीच सहभागी नाही, वाइननिर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर जसे जसे वाइनसाठी द्राक्षे हार्वेस्टिंग करणे, क्रशिंग करणे, फर्मेंटेशन करणे, बॉटलिंग करणे, लेबलिंग करणे, मार्केटिंग करणे हे जे जे टप्पे आहे ते ज्योत्सना स्वतः पूर्ण करतात. ‘‘त्यात एक वेगळा आनंद आहे. या वाइन उद्योगामुळे माझी एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली आणि वेगळी ओळख निर्माण झाली स्वतःचा ब्रॅंड निर्माण झाला. हा आनंद वेगळाच आहे,’’ असे मत ज्योत्सना मांडते.  वायनरीची पाहणी करण्यासाठी  येणाऱ्या पर्यटकांना वाइनबद्दल जे काही गैरसमज आहेत, ते दूर करण्याचे कामही ज्योत्सना करते. विशेष म्हणजे लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या या वाइन उद्योगामध्ये सर्व प्रक्रिया ज्योत्सना स्वतः पतीला जोडीला घेत पूर्ण करते. एकही कामगार या उद्योगामध्ये नाही. सगळे कामे स्वतःच करत असल्याने उत्पादन खर्चात बचतीमुळे निफा वायनरीचा नफाही वाढताच आहे. संपर्क : अशोक सुरवडे +91 99227 93839

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com