agriculture news in marathi Winter advisory of goats and sheep | Page 2 ||| Agrowon

शेळ्या, मेंढ्यांचे हिवाळ्यातील संगोपन

डॉ. जी. एस. सोनवणे, डॉ. व्ही. के. कदम
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

शेळी-मेंढीची निवड करताना किंवा व्यवसाय सुरू करताना शक्यतो हिवाळ्यात सुरू करावा. कारण हिवाळा ऋतू हा आरोग्यासाठी पोषक मानला जातो. शेळ्या, मेंढ्यांना पुरेसा आहार द्यावा. आजारी शेळ्या, मेंढ्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन ठेवावे.
 

शेळी-मेंढीची निवड करताना किंवा व्यवसाय सुरू करताना शक्यतो हिवाळ्यात सुरू करावा. कारण हिवाळा ऋतू हा आरोग्यासाठी पोषक मानला जातो. शेळ्या, मेंढ्यांना पुरेसा आहार द्यावा. आजारी शेळ्या, मेंढ्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन ठेवावे.

शेळी -मेंढीपालन व्यवसायामध्ये संगोपन व व्यवस्थापन याला महत्त्व आहे. तसेच शेळ्यांचे आरोग्य सुद्धा महत्त्वाचे आहे. शेळ्या-मेंढ्यांना होणारे रोग, त्याची लक्षणे तसेच उपचार व प्रतिबंधात्मक उपाय माहिती असल्यास मरतुकीवर नियंत्रण ठेवता येते. हिवाळा हा ऋतू शेळी-मेंढीपालनामध्ये महत्त्वाचा मानला जातो. शेळी-मेंढीची निवड करताना किंवा व्यवसाय सुरू करताना शक्यतो तो हिवाळ्यात सुरू करावा. कारण हिवाळा ऋतू हा आरोग्यासाठी पोषक मानला जातो. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पावसाळ्यात चारा लागवड करून चारा खाण्यायोग्य झाला, की हिवाळ्यात शेळी-मेंढीची खरेदी करावी.

शेळ्या, मेंढ्यांचा गोठा 

 • गोठ्याची रचना ही इंग्रजी A अक्षरासारखी असावी. शेळ्या आणि मेंढ्यांना फार खर्चिक गोठ्याची आवश्यकता नसते. गोठे थोड्या उंचावर बांधणे आवश्यक असते. गोठे कोरडे, हवेशीर आणि सोपे असावेत. 
 • हिवाळ्यात सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे गोठ्यामध्ये ओलावा जास्त वेळ टिकून राहतो आणि तापमान कमी होते. गोठ्याची दिशा ठरवताना दक्षिण-उत्तर अथवा पूर्व-पश्‍चिम बाजूने ठेवल्यास सकाळी आणि सायंकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमुळे गोठ्यातील ओलसरपणा कमी होतो. उपलब्ध होणाऱ्या वैशिष्ठ्यपूर्ण सूर्यकिरणामुळे जंतुनाशक प्रक्रिया होऊन गोठे निर्जंतुक होण्यास मदत होते. 
 • गोठा कोरडा व स्वच्छ ठेवावा. गोठ्यातील जमिनीत चुनखडी किंवा मुरमाचा वापर केल्यास ओलसरपणा कमी होतो आणि जमिनीचे तापमान कमी करण्यास प्रतिबंध करता येतो. 
 • गोठ्यांच्या आजूबाजूला मोकळी जागा असावी. गोठ्याच्या दोन्ही बाजूंस जागा ठेवून कुंपण करावे. स्वच्छ पाण्याची सोय करावी. 
 • वयोमानाप्रमाणे शेळ्यांची/ बोकडांची आणि लहान करडांची व्यवस्था करावी.
 • आजारी आणि सांसर्गिक रोग झालेल्या (उदा. फुफ्फुसाचा रोग, जंत इत्यादी) करडांना ताबडतोब इतर करडांपासून वेगळे करावे.  
 • हिवाळ्यात करडांच्या तसेच कोकरांच्या निवारा उबदार असावा, अन्यथा त्यांच्या शरीराचे तापमान कमी होऊन ते जीवघेणे होऊ शकते.
 • दिवसा गोठ्याची दारे व खिडक्या खुली ठेवावीत जेणेकरून हवा खेळती राहील व रात्री गोणपाट किंवा पोते यांनी शेड नीट झाकावे. जेणेकरून थंड हवा आत येण्यास प्रतिबंध होईल. 
 • करडांचा/ कोकरांचा  बिछाना हा कोरडा, मऊ, उबदार असावा. करडांचा बिछाना साधारणपणे २ ते ३ दिवसांनी बदलावा. करडांचा निवारा हा नेहमी कोरडा, स्वछ आणि अमोनिया मुक्त असावा; कारण हा वायू करडांच्या फुफ्फुसांना दाह निर्माण करून खोकला, श्‍वसन संस्थेचे विकार व यातूनच जीवघेणा न्यूमोनियाचा आजार होतो.
 • कोकरांना थंडी जर जास्तच असेल तर छोटी शेकोटी, विजेचा दिवा किवा विजेची शेगडी वापरून गोठ्यातील हवा उबदार ठेवता येईल. त्यामुळे करडांना सर्दी, हगवण आणि न्यूमोनिया यांपासून संरक्षण होईल. शेकोटी करताना जास्त धूर होणार नाही याची काळजी घ्यावी आणि साधारणपणे गोठा एकदा उबदार झाल्यानंतर शेकोटी विझवावी. विजेचा दिवा साधारणपणे करंडापासून २० इंचांपेक्षा जास्त उंचीवर छताला टांगावा. विजेचा दिव्याला संरक्षक पिंजरा असावा कारण लहान करडे हे अतिशय उत्साही आणि कुतूहल ठेवणारी असतात. 
 •  करडांच्या तसेच कोकरांना स्वछ आणि कोमट पाणी हिवाळ्यात पिण्यासाठी दिले, तर त्यांची मूत्रसंस्था सुस्थितीत राहण्यास मदत होते. 
 • एखाद्या करडाला खूप थंडी लागली असेल, तर त्याचे शरीर कोमट पाण्यात (तापमान ४०-४५ अंश सेल्सिअस) ४ ते ५ मिनिटे बुडवून ठेवावे पण डोके पाण्याच्या वर ठेवावे. नंतर त्याचे शरीर व्यवस्थित चोळून त्याला स्वच्छ, कोरड्या कपड्यात किंवा गोणपाटात लपेटावे. कोरड्या जागी ठेवावे आणि जमले तर कोमट दूध पाजावे.
 • हिवाळ्यात लहान करडांचे मरतुकीचे प्रमाण सर्वांत जास्त असते. आपण त्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर आर्थिक नुकसान होऊ शकते. नवजात करडाला त्याच्या वजनाच्या १/१० इतका चकी (पहिले दूध) द्यावा, त्यामुळे करडात नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती येते. पोट साफ होण्यास मदत होते. चीक पाजल्यामुळे मरतुकीचे प्रमाण २ टक्के ते ३ टक्के कमी करता येते. 
 • शेळ्या- मेंढ्यांचे मुक्त संचार पद्धतीने संगोपन केले जात असेल, तर त्या ठिकाणी एका कोपऱ्यात एखादा बंदिस्त गोठा जरूर असावा. जेणेकरून रात्रीच्या वेळी शेळ्या व मेंढ्या तेथे जाऊन बसतील. थंडीपासून संरक्षण होईल. शेळ्या मेंढ्यांना आणि लहान करडांना सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हात मोकळे सोडावे जेणेकरून त्यांना सूर्यप्रकाशातून उब मिळेल.

शेळ्या-मेंढ्यांच्या आहार  

 • शेळ्या, मेंढ्यांच्या वजनवाढीसाठी हा काळ योग्य असल्यामुळे शेळ्यांना वजनाच्या अर्धा टक्के किंवा १०० ते २५० ग्रॅम खुराक देणे गरजेचे आहे. 
 • हिवाळ्यात वाढत्या वयाच्या करडांना जास्त चांगल्या प्रतीचा चारा आवश्यक असतो याशिवाय ३ ते ४ आठवड्यांनंतर करडांना दररोज प्रत्येकी ५० ग्रॅम आंबोण मिश्रण आणि खातील तेवढी हिरवी वैरण देणे आवश्यक आहे. आंबोणाचे रोजचे प्रमाण हळूहळू वाढवत जाऊन रोज प्रत्येकी २५० ग्रॅमपर्यंत आणावे. 
 • साधारणत: चार महिन्यांनंतर वयात येईपर्यंत, मटणासाठी विकण्यापर्यंत त्यांना चांगल्या प्रकारची वैरण पुरेशी असते. ती उपलब्ध नसल्यास वैरणीशिवाय २०० ते २५० ग्रॅम आंबोण मिश्रण करडांना मिळणे आवश्यक आहे. चरण्याच्या जोडीला घन आहार दिल्यास उच्चतम वाढ दर मिळतो.
 • करडांचे आहाराचे दोन भाग असतात. वैरण आणि आंबोण. आंबोण म्हणजे प्रथिने, ऊर्जा पुरवणारे खाद्य घटक म्हणजे वेगवेगळी धान्ये (मका, गहू, ज्वारी) आणि त्यांचे दुय्यम पदार्थ (उदा. कोंडा आणि पॉलिश गव्हाचा कोंडा वगैरे). प्रथिने पुरवण्याकरिता वेगवेगळ्या तेलबियांच्या पेंडीचा (उदा. शेंगदाणा, तीळ, सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, खोबरे, करडई वगैरे) समावेश करावा. याशिवाय डाळ तयार झाल्यावर उपलब्ध होणारी चुणी (तूर, चणा, उडीद चुणी इ.) सुद्धा प्रथिनांच्या दृष्टीने उपयुक्त आहे. त्यातून शरीर थंडीत उबदार राहण्यास मदत होते.  आहार बदल करताना हळूहळू करावा. अचानक करू नये नाहीतर त्यातून आजार आणि पोटफुगी होते. शेळ्यांना ओला व सुका चारा दोन्ही देणे गरजेचे आहे. आहार नेहमी जास्त ऊर्जा निर्माण करणारा ठेवावा कारण थंडीत शरीराचे तापमान नियमित ठेवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज भासते. 

हिवाळ्यातील शेळ्या-मेंढ्यांचे आजार आणि उपचार 

 • बऱ्याचशा आजाराचे मुख्य कारण म्हणजे जिवाणू, विषाणू आणि जंत यांचा प्रादुर्भाव.
 • थंडीमध्ये आजार लवकर पसरतात कारण जिवाणू व विषाणू थंड तापमानात जास्त वेळ टिकून राहतात, त्यामुळे गोठा जंतुनाशकाने आठवड्यातून १ ते २ वेळा धुऊन घ्यावा. 
 • बाह्य परजीवीची हिवाळ्यात अंधाऱ्या, थंड आणि ओलसर जागेत झपाट्याने वाढ होते. ज्या करडांमध्ये जंत प्रादुर्भाव असेल ती करडे  कमकुवत आणि संथ असतात.  शरीरातील लोह आणि धातूचे प्रमाण कमी होऊन वजनात घट होते आणि शरीर खंगते.
 • परजीवीमुळे लहान करडांना काही आजार होतात. रक्ती हगवणीमध्ये करडांची वाढ खुंटते किंवा ती अतिसाराने मरण पावतात. आतील आणि बाह्य परजीवीमुळे करडांना शरीराचे तापमान हिवाळ्यात स्थिर राखणे अवघड जाते.
 •  जंत हे अन्नद्रव्ये, अन्नरस आणि रक्ताचे शोषण करतात. तसेच आतड्यातील अन्नद्रव्ये शोषण करणाऱ्या ग्रंथीना इजा पोहोचवितात. त्यामुळे अनेमिया (पंडुरोग) होतो. आजूबाजूच्या परिसरात चरण्यासाठी गवतावर दव असताना सकाळी सकाळी सोडू नये. कारण या वेळात जंतांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते.
 • करडांना आजार झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे अधिक चांगले. म्हणून करडांना ठरल्यावेळी रोगप्रतिबंधक लस आणि जंतुनाशक औषधे द्यावीत. शेळ्यांना लस कधीही आजार आल्यानंतर देऊ नये, कारण आजारी व विशिष्ट  साथीमध्ये आजारी शेळीला लस दिल्यास तो आजार बरा न होता बळावतो.
 • हिवाळ्यात करडांवरील पिसू, गोचिड यांचे योग्य वेळेस नियंत्रण करणे आवश्यक आहे. अन्यथा, हे करडांच्या अंगावर, केसांच्या खाली राहून त्यांचे रक्त पितात. यामुळे करडू अस्वस्थ होते आणि त्यांना रक्तक्षय होण्याची शक्यता असते. त्यांच्या चावण्यामुळे खाज सुटते आणि करडू शरीरावर तोंडाने चावा घेते. यामुळे तेथील केस गळणे, जखमा होणे इ. घडते. 
 • उवा, पिसू, गोचीड यांचा उपद्रव टाळण्यासाठी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने गोचिडनाशकाचा वापर करावा. संपूर्ण अंगावर हे द्रावण लावावे. द्रावण तोंड, डोळे या ठिकाणी लावू नये. हे द्रावण पोटात गेल्यास विषबाधा होऊ शकते.

संपर्क ः  डॉ. जी. एस. सोनवणे, ८७९६४४८७०७ (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)


इतर कृषिपूरक
देशी गाईंमधील प्रजनन व्यवस्थापनावर द्या...देशी गाईंची निवडलेली जात, वंशावळ आणि...
स्पेंट मशरूम कंपोस्टचे मूल्यवर्धनपारंपरिक कंपोस्ट खतामध्ये अनेक प्रकारचे...
उन्हाळ्यातील कोंबड्यांचे आहार व्यवस्थापनउन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना उष्माघात होतो. यामुळे...
संधिवातावर निर्गुडी, निलगिरी उपयुक्तपशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी...
शेळ्यांची निवड पद्धतीशेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड...
प्राणिजन्य क्षयरोगाकडे नको दुर्लक्षजनावरांना क्षयरोग झाल्यास उत्पादनक्षमता १० ते २५...
योग्य खाद्य व्यवस्थापनातून उष्माघाताचे...उन्हाळ्याच्या काळात आहारामध्ये साधारणतः ५ ते ७...
शेतकरी नियोजन पीक : रेशीम शेतीउन्हाळ्यातील तापमानात देखील कोष उत्पादन घेता यावे...
जनावरांतील उष्माघात टाळण्यासाठी...जनावरे आपल्याकडे असलेल्या ऊर्जेचा वापर दूध...
कुक्कुटपालन नियोजन पिलांची (चिक्स) नवीन बॅच ५ मार्च रोजी...
उन्हाळ्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपनवाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारी...
लकवा आजारावर ब्राह्मी, वेखंड उपयुक्त लकवा  किंवा पॅरेलिसिस या आजारात अवयवांचे...
उष्ण वातावरणात टिकणारी बेरारी शेळी बेरारी शेळी रंगाने फिक्कट ते गडद तपकिरी असून,...
जनावरांमधील पायाचा वातया आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच...
कुक्कुटपालनामधील जैवसुरक्षा महत्त्वाची...कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांचे विषाणू, जिवाणू तसेच...
श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस...मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार...
निरोगी पशुधनासाठी शुद्ध, निर्जंतुक पाणीदुधाळ प्राण्यांचे आहारातील गवत आणि अन्य...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...
कासदाह तपासणीसाठी विविध चाचण्याकासदाहामुळे दुधाळ जनावराचे सड निकामी किंवा खराब...
कासदाहावर हळद, करंज, निर्गुडी उपयुक्तगाय, म्हैस, शेळी, मेंढी या प्राण्यांमधील सर्वांत...