नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
अॅग्रो विशेष
यंदा हिवाळ्यात गारठा जरा अधिकच राहणार
यंदा डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळा हंगामात महाराष्ट्रासह, उत्तर भारतात गारठा अधिक राहील. देशाच्या उत्तर, वायव्य, मध्य भागासह पूर्व भागातील काही उपविभागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुणे : चालू वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळा हंगामात महाराष्ट्रासह, उत्तर भारतात गारठा अधिक राहील. देशाच्या उत्तर, वायव्य, मध्य भागासह पूर्व भागातील काही उपविभागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीने २०१६ पासून उन्हाळा आणि हिवाळा हंगामात उपविभागनिहाय तापमानाचा अंदाज जाहीर केला जात आहे. मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टिम प्रारूपाच्या (मॉडेल) आधारे हवामान विभागाने डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या तीन महिन्यांतील तापमानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार यंदाच्या हिवाळ्यात देशाच्या उत्तर, वायव्य, मध्य भागासह पूर्व भागातील काही उपविभागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील.
तसेच ईशान्य भारत, पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिण भारतातील उपविभागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत दिवसाच्या कमाल तापमानाचा अंदाज व्यक्त करताना दक्षिण आणि मध्य भारतातील काही उपविभाग वगळता देशात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागातर्फे दर आठवड्याला कमाल व किमान तापमानाचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे.
मराठवाडा, विदर्भ अधिक गारठा
हवामान विभागाने प्रसिध्द केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यात तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे. तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरी इतके राहणार असून, कोकण विभागात किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता अधिक आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा कमी, कोकण, विदर्भात सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
प्रशांत महासागरात ला-निना स्थिती
मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातीस समुद्राचे पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा कमी असून, या भागात सध्या मध्यम ला-निना स्थिती आहे. हिवाळी हंगामात या भागात मध्यम ला-निना स्थिती कायम राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
- 1 of 657
- ››