अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना

अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना

अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल स्वरूपातील पावसाचा लागवडीला फटका बसला आहे. जवळपास अडीच महिने लोटले असून, खरिपात नियोजित क्षेत्रापैकी ६० हजार हेक्टरवर पेरण्याच झालेल्या नाहीत. सरासरीच्या १३ टक्के क्षेत्र लागवडीविना राहिलेले आहे.   जिल्ह्यात आजवर एकूण पर्जन्यमानाच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे. खरीप हंगामात लागवडीसाठी ४ लाख ८० हजार ५८६ हेक्टरचे नियोजन करण्यात आले होते. त्यांपैकी आत्तापर्यंत ४ लाख १९ हजार ६१७ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ८७ टक्के एवढे आहे. लागवड झालेल्या क्षेत्रात कपाशी व सोयाबीन या पिकाची सर्वाधिक लागवड आहे.  जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी ४ लाख ८० हजार ५८६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. या वर्षी ४ लाख ८० हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणीचे लक्ष्य खरीप हंगामासाठी ठेवण्यात आले. जिल्ह्यात ४ लाख १९ हजार ६१७ हेक्टर म्हणजे ८७ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या. कापसाचे सरासरी क्षेत्र १०० टक्के; तर सोयाबीनची पेरणी सरासरी क्षेत्राच्या ८४ टक्के इतकी झाली आहे. जिल्ह्यात तृणधान्य पिकांखाली १ हजार ९०० हेक्टर इतके लक्ष होते. त्यांपैकी १० हजार हेक्टरवर म्हणजेच एकूण सरासरीच्या ४३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. तृणधान्य पिकांत सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारी पिकाखाली १८ हजार ६०० हेक्टर असून, त्यांपैकी ९ हजार ७१३.१३ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. मका पिकाचे ५०० हेक्टर क्षेत्राचे लक्ष्य होते. त्यांपैकी २४२.८ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली.  कडधान्य पिकांखाली एकूण सरासरी १ लाख ८११ हेक्टर इतके क्षेत्र असते. यंदा कडधान्य लागवडीसाठी १ लाख २४ हजार १०० हेक्टर इतके लक्ष्य ठरविण्यात आले. त्यांपैकी ८७ हजार ६५६.४ हेक्टर इतक्या क्षेत्रावर कडधान्य पिकांची लागवड झाली. कडधान्य पिकात खरिपात प्रामुख्याने तूर लागवड केली जाते. यंदा तूर लागवडीखाली ५८ हजार ३०० हेक्टरचे लक्ष्य असून ५३ हजार ५१२.७ हेक्टरवर तूर लागवड झाली. सरासरी क्षेत्राच्या ९१ टक्के लागवड झाली. उडीद पिकाखाली २५ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे लक्ष्य असून त्यापैकी १४ हजार ६८ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.  तेलबियांवर्गीय पिकांमध्ये एकूण १ लाख ६९ हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले होते. त्यांपैकी १ लाख ७० हजार २०९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. तथापि, तेलबिया पिकांखाली असणाऱ्या क्षेत्राची सरासरी ही २ लाख ४ हजार १७३ हेक्टर इतकी असून, त्यांपैकी ८३ टक्के इतकी पेरणी झाली. यात महत्त्वाचे सोयाबीनचे क्षेत्र सरासरी २ लाख ३ हजार ५ हेक्टर इतके असून, १ लाख ६५ हजार हेक्टर इतके लक्ष्य ठरविण्यात आले होते. त्यांपैकी प्रत्यक्षात १ लाख ६९ हजार ८६५ हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी झाली. कपाशीचे सरासरी क्षेत्र १ लाख ५२ हजार ३५३ हेक्टर इतके आहे. यंदा १ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवडीचे उद्दिष्ट्य ठरविण्यात आले होते. प्रत्यक्षात १ लाख ५१ हजार ७४७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली असून ही एकूण सरासरीच्या जवळपास १०० टक्के इतकी झाली आहे. पाऊस कमीच  पेरणीसाठी बाधक ठरलेल्या पावसामुळे सलग दुसऱ्यावर्षी लागवड क्षेत्र कमी झाले आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान हे ६९७.३ मिलिमीटर इतके असून मंगळवार (ता.२०) पर्यंत ५०६.९० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण एकूण सरासरी पर्जन्यमानाशी ७२.७० टक्के इतके आहे. जुलै अखेर व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्याने पिकांची सध्याची स्थिती चांगली आहे. शेतकऱ्यांनी आता डवरणी, खत देणे, निंदणी आदी कामांना प्राधान्य दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com