महिलांची शेतकरी कंपनीच्या माध्यमातून सक्षमतेकडे पावले 

महिला उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन करून तंत्रज्ञान विषयी माहिती पोहोचविणे, त्याचबरोबर उत्पन्न वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील महिला पुढाकार घेऊ लागल्या आहेत.
women day
women day

पुणे ः महिला उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन करून तंत्रज्ञान विषयी माहिती पोहोचविणे, त्याचबरोबर उत्पन्न वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील महिला पुढाकार घेऊ लागल्या आहेत. मागील पाच ते सहा वर्षांपासून ग्रामीण भागातील आठ ते दहा हजार महिलांनी एकत्रित येऊन जवळपास २६ हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या आहेत. कंपनीच्या माध्यमातून महिलांनी सक्षमतेकडे पाऊल टाकले आहे. 

जागतिक बँक अर्थसाह्यित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प, नाबार्ड अंतर्गत एकूण ५०० -६०० शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. राज्यात एकूण साडेतीन ते चार हजार शेतकरी कंपन्या आहेत. यात महिलांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या २६ हून अधिक शेतकरी महिला उत्पादक कंपन्याचा समावेश आहे. या उत्पादक कंपन्यांमार्फत कृषी विषयक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता, बीजोत्पादन कार्यक्रम, उत्पादित कृषिमालाची एकत्रित विक्री आणि साठवणुकीच्या सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी विस्ताराचे काम प्रभावीपणे करणे, असे विविध उपक्रम ते राबवीत आहेत. 

राज्यातील नगर, पुणे, सोलापूर, नंदुरबार, हिंगोली, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, जळगाव, वर्धा अशा जिल्ह्यातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. या महिलांनी डाळ मिल, हळद प्रकिया, राइस मिल, चिंच प्रक्रिया, मसाले उत्पादने, काजू प्रक्रिया, नाचणी प्रक्रिया असे प्रकल्प राबविले आहेत. त्यांना आर्थिक मदत म्हणून कृषी विभागाकडून अनुदानापोटी मदत केली जात आहे. त्यामुळे महिला स्वावलंबी होऊ लागल्या आहेत. याशिवाय कृषी विभागांतर्गत विविध अभ्यास दौरे, खरेदीदार विक्री संमेलने, जिल्हा कृषी महोत्सव, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान व्यवस्थापन प्रात्यक्षिके, बाजाराभिमुख प्रात्यक्षिके इत्यादी घटकांच्या माध्यमातून त्यांची क्षमता बांधणी करण्यात आली असून, तंत्रज्ञान व शेतीमालाच्या विक्रीची साखळी तयार केली जात आहे.  प्रतिक्रिया  आम्ही चार वर्षांपूर्वी राज्यातील पहिली महिला शेतकरी कंपनी स्थापन केली आहे. सध्या कंपनीत पाच ते सहा गावांतील ३९३ महिला सदस्य आहेत. कंपनीच्या माध्यमातून डाळ मिल व ग्रेडिंग क्लिनिंग प्रकल्प सुरू केला आहे. कोरोनामुळे काही अडचणी येत असल्या तरी कंपनीतील महिला शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीमालाला चांगले दर मिळू लागले असून, महिला सक्षम झाल्या आहेत.  - नंदा भुजबळ, अध्यक्ष, कृषिकन्या फार्मर प्रोड्यूसर कंपनी, पुणे  बदलत्या शेती तंत्रज्ञानामध्ये महिला हळूहळू सक्षम होत आहे. मागील काही वर्षांत राज्यात अनेक शेतकरी महिला कंपन्या स्थापन झाल्या आहेत. या कंपन्या शेतीमाल उत्पादनापासून ते विक्री आणि प्रक्रिया अशा विविध बाबतींत सक्षमपणे काम करत आहे. या कंपन्यांना शासनाच्या माध्यमातून चांगले प्रोत्साहन दिले  जात आहे.  - किसन मुळे, संचालक, ‘आत्मा’, पुणे  -----------------------  राज्यात कार्यरत असलेल्या महिला फार्मस प्रोड्यूसर कंपन्या ः  जिल्हा : महिला कंपनीचे नाव  नगर : श्रीगोंदा वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, पुण्यस्तंभ शेतकरी उत्पादक कंपनी  बुलडाणा : जीवनसंगिनी कृषी विकास वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, सिद्दी वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी  गडचिरोली : इकोवन सेल्फ रिलायंट वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी  नाशिक : गुनूतोला त्रिबाल वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, श्रीनिर्मल वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, विनेर्वा विनेयार्डस फार्मर प्रोड्यूसर कंपनी  गोंदिया : गिरीचा सेल्फ रिलायन्ट वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी,  इलदा त्रिबाल वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, पवनी त्रिबाल वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी  सिंधीबिरी त्रिबाल वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी  जळगाव : वसुंधरा वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी  लातूर :  फार्मगेट वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी  पुणे : भीमाशंकर वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, लवासा टेमघर वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, जुन्नर वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, जीएस वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, कृषिकन्या शेतकरी उत्पादक कंपनी  सातारा : फलटण तालुका वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी  सोलापूर : यशस्विनी अॅग्रो शेतकरी उत्पादक कंपनी,  वर्धा : दामिनी वूमन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी,  नंदुरबार : नंदनगरी शेतकरी उत्पादक कंपनी  हिंगोली : प्रज्ञशील करुणा शेतकरी उत्पादक कंपनी  औरंगाबाद : पूर्णा महिला शेतकरी कंपनी  कोल्हापूर : जिव्हाळा ॲग्रो शेतकरी कंपनी  रत्नागिरी : रत्नदुर्ग अॅग्रो शेतकरी उत्पादक कंपनी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com