गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना मिळाला रोजगार

कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची क्षमता प्रत्येक महिलांमध्ये निश्‍चितच आहे. अशापैकीच एक उपक्रमशील महिला आहेत तेल्हारा(जि.अकोला) येथील दीपिका प्रकाश देशमुख. स्वतः पूरक उद्योगात स्वयंपूर्ण होत त्यांनी सूर्योदय संस्थेच्या माध्यमातून ३०० महिलांसाठी रोजगार निर्मितीचे मोठे काम उभे केले आहे.
प्रदर्शनात पदार्थांची विक्री करताना आणि बाजूला महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना  दीपिका देशमुख
प्रदर्शनात पदार्थांची विक्री करताना आणि बाजूला महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना दीपिका देशमुख

कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची क्षमता प्रत्येक महिलांमध्ये निश्‍चितच आहे. अशापैकीच एक उपक्रमशील महिला आहेत तेल्हारा(जि.अकोला) येथील दीपिका प्रकाश देशमुख. स्वतः पूरक उद्योगात स्वयंपूर्ण होत त्यांनी सूर्योदय संस्थेच्या माध्यमातून ३०० महिलांसाठी रोजगार निर्मितीचे मोठे काम उभे केले आहे. तेल्हारा(जि.अकोला) येथील दिपिका देशमुख यांचा सन २००२ मध्ये विवाह झाल्यानंतर सुखाने संसार सुखाने सुरु झाला होता. त्यांना दिशा व सार्थक नावाची दोन अपत्येही झाली. मध्यंतरीच्या काळात दिपिकाताईंचे पती प्रकाश यांच्या आजारपणामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा पेच तयार झाला. त्यांचे पती सायकल विक्री आणि दुरुस्तीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या आजारपणात सायकल विक्री दुकान सांभाळण्यासाठी दीपिकाताई पुढे आल्या. त्यांनी हा व्यवसाय खंबीरपणे सुरु केला. एक महिला सायकल दुकान चालवीत असल्याने त्याची ग्रामीण भागात चर्चासुद्धा झाली. दुकानामध्ये दोन कामगार असून देखील दिपिकाताईंनी पंक्चर काढणे, सायकल दुरुस्तीची कामे स्वतः शिकून घेतली. सायकल दुकानातून थोडीफार मिळकत व्हायची. मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह, पतीच्या औषधोपचाराचा खर्च निघत नव्हता. त्यामुळे सायकल दुकानात काम करतानाच जोडीला पूरक उद्योगाच्या उद्देशाने त्यांनी लाह्या आणि बत्तासे यापासून दागिने बनविले. हे दागिने पाहून एका ग्राहकाने मागणी केली. या मागणीमुळे त्यांना आपण हा व्यवसाय करू शकतो, याची दिशा मिळाली. महिलांसाठी रोजगार निर्मिती  दीपिका देशमुख यांनी परिसरातील महिलांची मागणी लक्षात घेऊन संक्रांतीसाठी लागणारे दागिने, डोहाळे डेकोरेशन, लग्नासाठी मेकअप अशा उपक्रमांना सुरुवात केली. या माध्यमातून महिला जोडत गेल्या. दिपिकाताईंनी २०१७ मध्ये सूर्योदय महिला बहुउद्देशीय मंडळ ही संस्था स्थापन केली. या माध्यमातून गृहोद्योग सुरु केला. तेल्हारा तालुक्यातील विविध गावातील महिला या गृहोद्योग संस्थेशी जोडल्या गेल्या. ज्या महिलांना जे काम चांगल्या पद्धतीने करता येत असेल तीने ते करावे, असे ठरले. यामुळे कुणी पापड, कुणी कुरड्या, कुणी इतर खाद्यपदार्थ निर्मितीमध्ये वाकबगार झाल्या. आज खाद्यपदार्थांसह घरगुती कार्यक्रमासाठी डेकोरेशन, डोहाळ्यांसाठी लागणारे साहित्य, फुलांचे दागिने, हळदीचे दागिने, सिल्क थ्रेड ज्वेलरी, संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने, रुखवत तसेच खाद्य पदार्थांची निर्मिती करून सूर्योदय ब्रॅंडने विक्री केली जाते. कागदी पिशव्या निर्मितीचे प्रशिक्षण  शासनाने प्लॅस्टिक वापरावर बंदी घातल्याने कागदी पिशव्यांची मागणी वाढली होती. ही संधी समजून दीपिका यांनी पुढाकार घेतला. ग्रामीण महिलांना स्वयंरोजगार म्हणून कागदी पिशव्या निर्मितीला दिपिकाताईंनी प्रोत्साहन दिले आहे. यासाठी तेल्हारा तालुक्यातील २७ गावातील महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम त्यांनी केले. माणुसकीची भिंत  सायकल दुकान सांभाळत असताना दिपिकाताईंनी माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविला. समाजातील उपेक्षित लोकांना या माध्यमातून मदत करण्यास सुरूवात केली. गावातील लोकांकडील वापरा योग्य जुने कपडे, पादत्राणे या ठिकाणी आणून ठेवले जाते. तेथून संबंधित व्यक्ती नेतात. या उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो गरजूंना त्यांनी कपडे पुरविले. बेघर महिलांना साडी चोळी वाटप केले. कोरोनाच्या काळात शोधली संधी

  • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये अनेकजण बेरोजगार झाले. या काळामध्ये त्यांनी मास्क आणि पाणीपुरीचा व्यवसाय सुरु केला. या काळात त्यांनी महिलांच्या मदतीने एक लाखांवर मास्क तयार केले. या उपक्रमामुळे परिसरातील तब्बल शंभरावर महिलांना रोजगार मिळाला. लॉकडाउनच्या काळात संकटाला संधी समजून सूर्योदय संस्थेमार्फत हे मास्क बनविण्यात आले. विविध डिझाइनचे मास्क, पैठणी मास्क, डायमंड मास्क असे प्रकार बाजारात ग्राहकांच्या पसंतीस उतरले.
  • मास्क बनवण्याच्या व्यवसायासोबतच त्यांनी सर्वोदय संस्थेमार्फत तयार पाणीपुरीचे पार्सल विक्री सुरु केली. लॉकडाऊनमध्ये दिवसाला दहा हजार पाणीपुरीची विक्री केली जात होती. ग्राहकांना वेटींगवर राहावे लागत होते. आज सूर्योदय महिलांचा परिवार मसाले, पापड, कुरड्या, मास्क, रेडीमेड पाणी पुरी, इंस्टंट इडली पीठ, इंस्टंट ढोकळा पीठ ही उत्पादने ग्राहकांना पुरवितो. दीपिका देशमुख या स्वतः ढोकळा, इडली पीठ तयार करून विक्री करतात.
  • तनिष्कातून झाली जडणघडण  ‘सकाळ'च्या तनिष्का व्यासपिठामध्ये दीपिकाताई कार्यरत आहेत. या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. तनिष्काच्या माध्यमातून त्यांना गृहोद्योगाची प्रेरणा मिळाली. तनिष्का आणि सूर्योदय महिला गृहउद्योगाच्या माध्यमातून भटकंती करणाऱ्या महिलांसाठी त्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात. यंदा त्यांनी एप्रिल महिन्यात महिलांसाठी व्हाटसॲपवर रांगोळी स्पर्धा घेतली. पुरस्कारांनी गौरव 

  • सायकल दुकान चालविणारी महिला ते सूर्योदय गृहउद्योगाची संचालिका अशी ओळख तयार झालेल्या दीपिका देशमुख यांनी ग्रामीण महिलांसाठी केलेल्या कामांची दखल विविध संस्थांनी घेतली आहे.
  • नाशिक येथील कर्मयोगी बहुउद्देशीय संस्था व तनिष्का डॉक्टर्स फोरमच्यावतीने राज्यस्तरीय कर्मयोगी महिलारत्न पुरस्काराने गौरव.
  • अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख समाजसेवी संस्था आणि स्वामिनी महिला युनिटी यांच्यावतीने महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सन्मान.
  • विविध जिल्ह्यांमध्ये महिला गटांच्या कार्यक्रमाला मार्गदर्शिका म्हणून निमंत्रण.
  • मुलीने केले तंत्रज्ञान साक्षर  दीपिका यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख त्यांची मुलगी दिशा हिने करून दिली. मोबाईल वापर तसेच इंग्रजी भाषेतील लिखाणाची त्यांच्या समोर अडचण होती. परंतु मुलगी दिशा हिने त्यांना तंत्रज्ञान साक्षर केले. प्रक्रिया उद्योगामध्ये पती आणि कुटुंबाचे पाठबळ मिळत असून मुलगा सार्थकही त्यांना विविध कामात मदत करत असतो. संपर्क- दीपिका देशमुख, ९१७५६३९००४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com