कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
ताज्या घडामोडी
बुलडाण्यात बीजोत्पादनाचा भार महिलांच्या ‘हातात’ !
पूर्वापार होत असलेल्या शेतीत महिलांचे योगदान हे मोजता येणारे नाही. शेतीत महिला वर्षानुवर्षे राबत आहेत. आताच्या काळात शेतीचे स्वरूप बदलले, यंत्रांचा वापर वाढला तरीही महिलांचा वाटा तसूभरही कमी झालेला नाही.
बुलडाणा ः पूर्वापार होत असलेल्या शेतीत महिलांचे योगदान हे मोजता येणारे नाही. शेतीत महिला वर्षानुवर्षे राबत आहेत. आताच्या काळात शेतीचे स्वरूप बदलले, यंत्रांचा वापर वाढला तरीही महिलांचा वाटा तसूभरही कमी झालेला नाही. संरक्षित शेतीत तर तो आणखी वाढला आहे. या शेतीचा बहुतांश भार कुशल महिला मजूरच वाहत आहेत, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. बुलडाणा जिल्ह्यात आधुनिक पद्धतीने होत असलेल्या शेतीमध्ये हजारोंच्या संख्येने महिला दिवसभर राबताना दिसतात.
जिल्ह्यात घाटावरील तालुक्यांमध्ये मागील काही वर्षात बीजोत्पादनाचे क्षेत्र कमालीचे वाढत आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे बीजोत्पादन कार्य देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर, चिखली या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने होते. त्यातही देऊळगावराजा, सिंदखेडराजा हा परिसर बीजोत्पादनाचा ‘हब’ बनलेला आहे. जिकडे नजर जाईल तिकडे शेडनेट, पॉलिहाउस आपल्याला दिसून येतात. कमी जागेत अधिक उत्पन्न या शेतीतून शेतकरी मिळवत आहेत.
बीजोत्पादनाची शेती यशस्वी होण्यासाठी परपरागिकरणाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची राहते. हे किचकट स्वरूपाचे काम पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी प्रामुख्याने महिलांच्या खांद्यावर आहे. या एका जिल्ह्यात पाच हजारांवर नेटमध्ये तसेच उघड्या जमिनीवरही बीजोत्पादन केले जाते. प्रत्येक शेतात यासाठी काम करण्यासाठी कुशल महिलांची नितांत गरज राहते. ही कामे करण्यासाठी गावागावांत आता अशा कुशल महिला तयार झाल्या आहेत. खरे पाहता या महिलांनी अनुभवातून हे तांत्रिक स्वरूपाचे काम शिकून घेतले. अनेक महिला तर शाळेची पायरीही चढलेल्या नाहीत. तरीही त्यांनी यात कौशल्य प्राप्त केले आणि त्या अत्यंत सजगपणे हे काम हाताळतात.
कुशल मनुष्यबळाचा प्रश्न मिटला
१० गुंठे बीजोत्पादन क्षेत्रात चार ते पाच महिलांना दररोज काम मिळते. जिल्ह्यात सुमारे पाच हजारावर शेडनेट, नेटमध्ये बीजोत्पादनाचे वर्षभर काम सुरू असते. अशा ठिकाणी किमान २० हजारांवर कुशल बनलेल्या महिला राबत असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जातो. मुळात बीजोत्पादनाचे काम करताना प्रत्येक बाबीला महत्त्व राहते. कामात नीटनेटकेपणा, बारकावे समजणे गरजेचे असते. हे काम करण्यासाठी तरुणीपासून तर वयाची पन्नाशी, साठी ओलांडलेल्या महिला हे काम करताना बघायला मिळू शकतात. शेतातील इतर कामांसाठी मिळणारा मोबदला, कामाचे तास हे वेगळे असतात. तर या आधुनिक शेती पद्धतीत तासांवर कामाचे मोजमाप केले जाते. यासाठी मोबदलाही तुलनेने अधिक मिळतो. महिलांनी तंत्र शिकल्याने त्यांच्यात कुशलता निर्माण झाली आणि आधुनिक शेतीला लागणाऱ्या मनुष्यबळाचा प्रश्नही बऱ्याच अंशी मार्गी सुद्धा लागला.
- 1 of 1098
- ››