बीज परीक्षण करतात ‘मिळून साऱ्याजणी’ 

परभणी येथील कृषी विभागाच्या ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त बीज प्रयोगशाळेत ५० टक्क्यांहून अधिक महिला कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून बीज परीक्षण अधिकारीदेखील महिला अधिकारी आहेत.
Parbhani
Parbhani

परभणी ः परभणी येथील कृषी विभागाच्या ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त बीज प्रयोगशाळेत ५० टक्क्यांहून अधिक महिला कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून बीज परीक्षण अधिकारीदेखील महिला अधिकारी आहेत. अनेक वर्षांपासून अधिकारी- कर्मचारी मिळून साऱ्याजणी बीज परीक्षणातील कौशल्य सिद्ध करत जबाबदारीने कर्तव्य पार पाडत आहेत. 

कृषी विभागांतर्गत परभणी येथील बीज प्रयोगशाळेत एकूण २१ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. सध्या त्यापैकी १७ पदे कार्यरत असून, त्यापैकी ९ पदांवर महिला आहेत. त्यात बीज परीक्षण अधिकारी प्रियंका भोसले, कृषी अधिकारी संजीवनी राठोड, विश्‍लेषक एस. एम. खरवडे, यू. बी. शेरे, एस. यू. फाटक, ए. बी. भोसले, यू. एस. मुलगे, एस. आर. बेटकर, श्रीमती इंगोले आदींचा समावेश आहे. 

मराठवाडा विभागातील आठ जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत दरवर्षी विविध पिकांच्या बियाण्याचे १५ ते १६ हजार नमुने भौतिक शुद्धता, उगवणक्षमता चाचणी तपासणीसाठी येत असतात. बीज परीक्षण चाचण्यांचे काम हातोहात (मॅन्युअली) करावे लागते. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार शेतकऱ्यांना शुद्ध तसेच योग्य उगवणक्षमता असलेले बियाणे पुरवठा करण्याचे महत्त्व लक्षात घेऊन काम जबाबदारीने अंत्यत व्यवस्थितपणे करावे लागते. तत्कालीन बीज परीक्षण अधिकारी पी. जी. कुलकर्णी यांच्या कार्यकाळात २०१६ मध्ये या बीज परीक्षण प्रयोगशाळेस आयएसओ १७०२५ मानांकन प्राप्त झाले आहे. भारतीय गुणवत्ता नियंत्रण परिषदेचा गोल्ड ॲवॉर्डदेखील मिळालेला आहे. सप्टेंबर २०१७ पासून प्रियंका भोसले या बीज परीक्षण अधिकारी पदी रुजू झाल्या आहेत. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना आणखीनच बळ अन प्रोत्साहन मिळाले आहे.  कर्मचाऱ्यांमध्ये कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी वाराणसी येथील केंद्रीय बीज परीक्षण प्रयोगशाळा यांच्यातर्फे तसेच स्थानिकस्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. राज्यातील इतर ठिकाणच्या प्रयोगशाळेतील कर्मचारी या ठिकाणी अभ्यासासाठी येत असतात. गुणवत्तापूर्ण कामगिरीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.  प्रतिक्रिया शेतकऱ्यांना शुद्ध, उच्च उगवणशक्ती असलेल्या बियाण्याचा पुरवठा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठवाड्यातील पीक पद्धतीत वैविध्य आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने नमुने तपासणीसाठी येतात. बीज परीक्षणाचे किचकट काम महिलाच अधिक अचूकपणे करू शकतात हे आम्ही सातत्याने सिद्ध केले आहे.  - प्रियंका भोसले, बीज परीक्षण अधिकारी, कृषी विभाग, परभणी   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com